🌟विकास परिषद विकासाच्या नियोजनात ‘जिल्हा’ हा महत्त्वाचा घटक - प्रविणसिंह परदेशी🌟विकसित मराठवाडा २०४७’ या एक दिवसीय विकास परिषद संपन्न🌟


छत्रपती संभाजीनगर (दि.१९ जुन २०२४) :- आर्थिक उन्नतीसाठी  सर्वसमावेशक विकास आवश्यक असतो. त्यासाठी विकासाच्या नियोजनासाठी ‘जिल्हा’ हा महत्त्वाचा घटक मानून नियोजन करावे. प्रत्येक जिल्ह्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार विकासाचा आराखडा तयार करावा. त्याद्वारे विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेस प्रत्यक्ष साकारता येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांनी केले.


महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन ‘मित्र’ व एमईडीसी (महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ) आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकसित मराठवाडा २०४७’ या एक दिवसीय विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले.एमआयटीच्या ‘आनंद’ सभागृहात  आयोजित या कार्यक्रमास महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत , जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मित्र चे सहा. मुख्य कार्यकारी अधिकारी सुशिल खोडवेकर, सह सचिव अमन मित्तल, सॉफ्टवेअर टेक्निकल पार्कचे अजय श्रीवास्तव, शितल पांचाळ, प्रभारी आयुक्त जगदीश मिनीयार, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, एमआयटी ग्रुप ऑफ इन्टिट्युशनचे महासंचालक मुनिश शर्मा, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे उपाध्यक्ष आशिष गर्दे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ उपस्थित होते.


श्री. परदेशी म्हणाले की,  विकसित भारत २०४७ चा जिल्हानिहाय आराखडा तयार करताना आपल्या जिल्ह्यात कुठल्या वाव असलेल्या उद्योग, पर्यटन व रोजगार इ. क्षेत्रनिहाय विकासाचा आराखडा तयार  करावा. मराठवाड्यात पाणी, कृषी, रोजगार, उद्योग व पर्यटन वाढीसाठीचे नियोजन आवश्यक आहे. सकल उत्पन्न वाढवण्याचे नियोजन करतांना क्षेत्रनिहाय गुंतवणूक वाढवावी लागते. त्यासाठी गुंतवणुकीच्या क्षमतांमध्ये वाढ करावी लागते. जिल्हानिहाय विकास आराखडा तयार करताना ‘मित्र’ची समन्वयाची भूमिका हे. मित्र च्या माध्यमातून मराठवाड्यासाठी नविन धोरण तयार करून शासनाला शिफारस करण्यात येणार आहे. २/३ पेक्षा जास्त उत्पादन खाजगी गुंतवणुकीमुळे वाढते. त्यामुळे खाजगी गुंतवणुकीच्या वाढीसाठी प्रयत्न आवश्यक आहेत. सकल उत्पादनात कमी सहभाग असलेल्या  जिल्ह्यांना केंद्रीत करून  त्यांचा सहभाग वाढवावा लागेल असेही श्री. परदेशी यांनी सांगितले.

            मनपा आयुक्त जी.श्रीकांत म्हणाले, केंद्र शासनाने राज्याला दिशा देण्यासाठी विकसित मराठवाडा, विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत अशी महत्वपूर्ण रचना केली आहे. मराठवाड्यातील पाणी सिंचन यासह मूलभुत प्रश्नांची सोडवणूक होण्यास मदत मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे शहर असून अजिंठा वेरूळसह ऐतिहासिक शहर आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अनेक पिढ्यांनी पर्यटनाचा ऐतिहासिक वारसा जपला आहे. यापुढील काळातही तो पुढे नेण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आपला प्रयत्न असणार आहे.जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत २०४७ चा निर्धार केला आहे. त्याकरीता आपण विकसित जिल्हा हे उद्दिष्ट  समोर ठेवून जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करावयाचा आहे. प्रत्येक क्षेत्रात भरीव गुंतवणुकी साठी प्रयत्न करावे लागतील. मान्यवरांशी, विचारवंतांशी केलेल्या चर्चेतून विकसित भारत संकल्पनेला जिल्ह्याच्या विकासातून गती देण्यासाठी पाच क्षेत्र तयार केले आहे. जिल्ह्याचा सर्वांगिण विकासाचा आराखडा तयार करावयाचा आहे. सर्वांच्या प्रयत्नातून विकसित जिल्हा अशी ओळख निर्माण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदचे अध्यक्ष अतुल शिरोडकर म्हणाले, विकसित भारत संकल्पना राज्यातील ४८ जिल्ह्यात मांडली जाणार असून शहर, जिल्हा, राज्य यांचा सहभाग घेतला जाणार आहे.मुनिष शर्मा यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा तयार केलेला नियोजन आराखड्याबाबत माहिती दिली.विदर्भ व खान्देश लगत असलेला मराठवाडा हे आर्थिक केंद्र व्हावे यासाठी आपले सर्वांचे प्रयत्न महत्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एमआयटीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मराठवाडा सेंटर फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट; च्या आराखडा पुस्तिकेचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

            या विकास परिषदेत उद्योग, पर्यटन, कृषी, वॉटर ग्रीड, माहिती तंत्रज्ञान अशा पाच क्षेत्रनिहाय  उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, विषय तज्ञ, संशोधक, अर्थशास्त्रज्ञ, शासकीय वरिष्ठ अधिकारी यांना परिसंवादात मते नोंदविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी सूत्रसंचालन केले तर आशिष गद्रे यांनी आभार मानले. उद्घाटन सोहळ्यानंतर  उपस्थित तज्ज्ञांच्या क्षेत्रनिहाय गटचर्चा करण्यात येऊन त्याद्वारे शिफारशी व सुचनांचे संकलन करण्यात येणार आहे......


०००००

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या