🌟वाशिम जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,कनिष्ठ अभियंत्याचे निलंबन करा....!


🌟आम आदमी पार्टीच्या वतीन सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुख्य अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे मागणी🌟


 
फुलचंद भगत

वाशिम : वाशिम शहरात मे.अजयदीप इन्फ्राकॉन प्रा. लि. औरंगाबाद या कंपनीने अर्धवट,निकृष्ट दर्जाची कामे केली याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्याकडे तक्रार करूनही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी व कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे निलंबन करून त्यंच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंत्यांकडे मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

आम आदमी पार्टीच्यावतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की,  सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांचे निविदा मंजुरी पत्र क्रं. निविद-२०२१ / व्र.क्र. ३९/ रस्ते-५ दि.०२.०३.२०२१ कार्यारंभ आदेश दि. ०४/०३/२०२१ काढून मे. अजयदिप इन्फ्राकॉन प्रा. लि. औरंगाबाद ४०७ अक्षयदिप ९ टाऊन सेंटर सिडको औरंगाबाद या कंपनीला देण्यात आला आहे. करारनाम्याची मुदत हे आदेश दिल्या पासून ४०० (चारशे) दिवस राहिल. आपण हे काम दिलेल्या मुदतीतच पूर्ण करण्याचे नमूद आहे. मात्र, कार्यारंभ आदेश काढून ११०० दिवस उलटून सुद्धा वाशिम नगर परिषद हद्दीमध्ये सिमेंट कॉक्रिट रस्ते, पेव्हर ब्लॉक रस्ते व डांबरीकरणाचे रस्त्यांचे बांधकाम (रु. ४७,३७,६७,४७१/-) पूर्ण झालेले नाही. तसेच तक्रार व उपोषण करूनही ही कामे करून घेऊ शकले नाहीत. निकृष्ट दर्जाची झालेली कामे, कामामध्ये दिरंगाई यावरून असे दिसून येते की, कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम व संबंधित कपंनीमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. अभियंता व कंपनी वाशिम शहरातील जनतेच्या जीवाशी खेळत आहेत रखडलेल्या व निकृष्ट रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास  संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात का येऊ नये? अशा कामचुकार अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करून त्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी आम आदमी पार्टीकडून करण्यात आली आहे. अन्यथा दिनांक २० जून पासून मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कॅम्प, अमरावती येथे बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या