🌟आचार्य प्रल्हाद केशव अत्रे पुण्यतिथी विशेष : दहा नाटके प्रहसनात्मक व विनोदप्रचुर.....!


🌟आचार्य अत्रे यांचा जन्म दि.१३ ऑगस्ट १८९८ रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील कोडित खुर्द गावात झाला🌟

प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. अत्रे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जाहीर वाद होते. सदर महत्त्वपूर्ण संकलित लेख श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींनी खास वाचकांसाठी मांडला.... संपादक.

        आचार्य अत्रे यांचा जन्म दि.१३ ऑगस्ट १८९८ रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील कोडित खुर्द या गावी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिव होते आणि त्यांचे काका एमईएस वाघिरे हायस्कूल सासवड येथे शिक्षक होते. सासवडच्या एमईएस वाघिरे हायस्कूलमधून त्यांनी प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.  सन १९१९मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली. पदवीनंतर अत्रे यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केले. अत्रे यांनी सन १९२८मध्ये लंडन विद्यापीठातून टीडी. (शिक्षक पदविका) केले. भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी सिरिल बर्ट यांच्या हाताखाली प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि हॅरो येथे अध्यापन केले.

          ते पुढे मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ञ, चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते ठरले. सासवड जिल्हा पुणे या गावी जन्मलेले अत्रे सासवड, पुणे, मुबंई व लंडन या ठिकाणी बीए, बीटी, टीडी. पर्यंत शिक्षण घेऊन होते. नंतर पुण्यातील कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्रथम शिक्षक व पुढे प्राचार्य म्हणून काम केले. तेथे असतानाच राजा धनराज गिरजी हायस्कूल-१९२७ व मुलींचे आगरकर हायस्कूल- १९३४ या शाळांच्या संस्थापनेत भाग घेतला. पुण्याच्या नगरपालिकेचे काही काळ ते सदस्य होते. सन १९३३पासून नाट्यक्षेत्रात व पुढे चित्रपटसृष्टीतही त्यांनी प्रवेश केला. सन १९३९नंतर मुंबईला स्थलांतर झाले. सन १९४०मध्ये सुरू केलेल्या साप्ताहिक नवयुगपासून अखेरपर्यंत वृत्तपत्रक्षेत्रातच ते राहिले. याचबरोबरच अत्रे थिएटर्स या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशीही त्यांचे व्यावासायिक संबंध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपली वाणी व लेखणी यांद्वारे मोठे कार्य केले. प्रथम मकरंद व नंतर केशवकुमार या टोपणनावांनी काव्यलेखन. झेंडूची फुले-१९२५ हा त्यांच्या विनोदी व विबंडन-कवितांचा संग्रह होता. त्यात जुन्या वळणाचे विशेषत: रविकिरणमंडळाचे कवी व त्यांच्या कविता यांतील लकबांचे व वैगुण्यांचे विडंबन केलेले आहे. आधुनिक मराठीतील विडंबनकाव्याची परंपरा उपर्युक्त काव्यसंग्रहापासून मानण्यात येते. बालकवी व गोविंदाग्रज यांच्या कवितांचा ठळक परिणाम दाखविणारी त्यांची अन्य स्फुट कविता गीतगंगा-१९३५ या संग्रहात आहे. अत्र्यांच्या नाट्यलेखनाचा पहिला कालखंड १९३३ ते १९६० हा होय. मराठी रंगभूमीचा हा अवनतकाळ होता. संगीत नाटके व नाटककार तसेच गायक नटवर्ग यांची परंपरा खंडित व निष्प्रभ झाली होती. चित्रपटसृष्टीचा वाढता प्रभाव मराठी रंगभूमीस अनिष्ट ठरला होता. आर्थिक मंदीमुळेही रंगभूमीचा लोकाश्रय कमी होत होता. नाट्यविषयक अभिरुचीतही परिवर्तन घडत होते. अशा काळात अत्र्यांची मुख्यत: प्रहसनात्मक व विनोदी नाट्यदृष्टी आणि अवनत मराठी रंगभूमीच्या तात्कालिक गरजा यांचा चपखल मेळ बसला. विशेष यशस्वी झालेल्या त्यांच्या एकूण बारा नाटकांपैकी दहा नाटके प्रहसनात्मक व विनोदप्रचुर आहेत. गुरुस्थानी मानलेले गडकरी व फ्रेंच प्रहसनकार मोल्येर यांचा प्रभाव त्यांच्या नाटकांवर पडलेला दिसतो. त्या नाटकांत सामाजिक दोषदर्शन व दंभस्फोट आहेत पण उपहास, उपरोध, विडंबन व अतिशयोक्ती या विनोदसाधनांच्या द्वारा ते प्रकट केले आहेत. साष्टांग नमस्कार-१९३३, भ्रमाचा भोपळा-१९३५ व लग्नाची बेडी-१९३६ ही त्यांपैकी काही लोकप्रिय नाटके होत. घराबाहेर-१९३४ व उद्याचा संसार-१९३६ ही त्यांची विशेष गंभीर व सामाजिक समस्यात्मक नाटके आहेत. त्या काळात विशेष अनुकरणीय ठरलेल्या इब्सेन या नॉर्वेजियन नाटककाराचा संस्कार वरील दोन नाटकांवर झाल्याचे जाणवते. अवकळलेल्या मराठी रंगभूमीचा लोकाश्रय टिकवून ठेवण्यात अत्र्यांची नाटके यशस्वी झाली. १९६० नंतरच्या दुसऱ्या कालखंडातील त्यांची महत्त्वाची नाटके म्हणजे तो मी नव्हेच-१९६२ व डॉक्टर-१९६७ ही होत. सत्यसृष्टीतील खळबळजनक घटनांवर ती आधारलेली आहेत. तंत्रदृष्ट्या प्रगत मराठी रंगभूमीचे दर्शनही त्यांत घडते. वर्तमानकालीन अशा नाट्यात्म घटनांची अभिज्ञता अत्र्यांना स्वभावत: होती. या कालखंडातील अत्र्यांची लोकप्रिय नाटके पूर्वकालीन नाटकांच्या तुलनेने अधिक प्रत्यक्षदर्शी आहेत. मराठी रंगभूमीवरील अखंड प्रयोगशीलतेच्या व तीव्र स्पर्धेच्या या कालखंडातही त्यांची सर्वच नाटके लोकप्रिय ठरली.

         त्यांचे कथात्मक साहित्य त्यांच्या विडंबनकाव्यासारखे वा नाटकांसारखे प्रभावी ठरले नाही. विनोदी कथा लिहूनही विडंबनकाव्याप्रमाणे अशा कथांची परंपरा मात्र त्यांना निर्माण करता आली नाही. त्यांचे चांगले कथात्मक साहित्य काहीसे गंभीर व वास्तवपूर्णच आहे. त्यात चांगुणा-१९५४ ही कादंबरी व बत्ताशी व इतर कथा-१९५४ यांचा समावेश होतो. विविध विषयांवर अत्र्यांनी केलेल्या लेखनात लहानमोठी चरित्रे, व्यक्तिदर्शने, मृत्यूलेख, प्रवासवर्णने, वृत्तपत्रीय लेख, साहित्यविषयक लेख आणि भाषणे, शालेय पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश होतो. महात्मा फुले-१९५८, पंडित जवाहरलाल नेहरूंवरील सूर्यास्त-१९६४, समाधीवरील अश्रू-१९५६, केल्याने देशाटन-१९६१, अत्रे उवाच-१९३७ ललित वाङ्‌मय-१९४४, हशा आणि टाळ्या-१९५८ ही त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके होत. त्यांच्या नवयुग वाचनमाला-१९३७ व सुभाष वाचनमाला-१९६२ यांनी-विशेषत: पहिल्या मालेने-मराठी भाषासाहित्यविषयक शालेय पाठ्यपुस्तकाचा मराठीत एक आदर्शच निर्माण केला. अप्रकाशित गडकरी-१९६२ हा त्यांनी संपादित केलेला ग्रंथ अभ्यसनीय आहे. मी कसा झालो?-१९५३ हे त्यांचे वाङ्‌मयीन आत्मशोधन होय. अत्र्यांनी आपले जीवननाट्य अत्यंत रसाळ व भावपूर्ण शैलीने प्रस्तुत पुस्तकात निवेदन केले असल्याने मराठी आत्मचरित्रपर साहित्यात त्यास विशेष महत्वाचे स्थान आहे. कऱ्हेचे पाणी या पाच खंडांतील-१९६३, १९६४, १९६५, १९६७ व १९६८ विस्तृत आत्मचरित्रात आपली जीवनकथा त्यांनी सांगितली आहे.

       अत्र्यांच्या स्वतंत्र वृत्तपत्रव्यवसायाचा आरंभ साप्ताहिक नवयुगपासून-१९४० ते १९६२ झाला. १९४३-१९४४ समीक्षक मासिकाच्या गडकरी विशेषांकाचे व दिवाळी अंकाचे संपादनही त्यांनी केले. १९४७-१९४८ या वर्षांत जयहिंद नावाचे एक सायंदैनिकही त्यांनी चालविले. तुकाराम-१९५४ नावाचे साप्ताहिकही त्यांनी काढले होते. सन १९५६मध्ये सुरू केलेल्या दैनिक मराठाचे ते अखेरपर्यंत संपादक होते. त्यांच्या वृत्तपत्रीय शैलीवर संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकरांचा फार मोठा परिणाम जाणवतो. मराठी चित्रपटसृष्टीत पटकथालेखक म्हणून व पुढे स्वतंत्र निर्माते म्हणून अत्र्यांनी महत्त्वाचे कार्य केले. धर्मवीर, प्रेमवीर, ब्रह्मचारी व ब्रँडीची बाटली  हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट होत. त्यांच्या श्यामची आई या चित्रपटास राष्ट्रपतींचे सुवर्णपदक-१९५४ व महात्मा फुले  या चित्रपटास रौप्यपदक-१९५५ मिळाले. नाटकांप्रमाणेच अत्र्यांच्या चित्रपटांचा आरंभ विनोदाने झाला व परिणती गांभीर्यात झाली. त्यांनी लिहिलेल्या काही चित्रकथा-१९५८ प्रसिद्ध झालेल्या आहेत.

         त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात झाला. वक्तृत्व व वृत्तपत्र ही राजकीय कार्याची त्यांची प्रभावी साधने होती. लोकप्रिय वक्ते म्हणूनही अत्र्यांचा लौकिक होता. त्यांचे वक्तृत्व हशा व टाळ्या यांनी गाजत असे. प्रक्षोभक वादांसाठीही अत्रे प्रसिद्ध होते. भा.वि.वरेरकर, श्री.म.माटे, ना.सी.फडके, पु.भा.भावे वगैरे व्यक्तींशी झालेले त्यांचे तीव्र वाद महाराष्ट्रात गाजले होते. अत्र्यांचे व्यक्तिमत्व गतिमान होते. अशा व्यक्तिमत्वाची स्वाभाविक गरज म्हणूनच त्यांचे अनेकांगी कर्तृत्व निर्माण झाले. त्यांची विनोदबुद्धी त्यांच्या सर्व कर्तृत्वक्षेत्रांत आढळते. विनोदकार म्हणूनच ते अधिक लक्षात राहतात. त्यांची लेखनशैली त्यांच्या व्यक्तिमत्वाची निदर्शक असून तिच्यात एक प्रकारचा अस्सल मराठमोळेपणा जाणवतो. नाशिक येथे सन १९४२मध्ये भरलेल्या सत्ताविसाव्या महाराष्ट्र साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अडतिसावे नाट्यसंमेलन बेळगाव-१९५५, दहावे मराठी पत्रकार-संमेलन-१९५० आणि बडोदे, इंदूर व ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्यसंमेलने यांची अध्यक्षपदेही त्यांनी विभूषित केली होती. वरळी, मुंबई येथे ते दि.१३ जून १९६९ रोजी निधन पावले.

!! आचार्य अत्रे यांना त्यांच्या पावन पुण्यस्मरण निमित्त विनम्र अभिवादन !!

                    - संकलन व सुलेखन -

                    श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                    रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                   फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या