🌟परभणी तालुक्यातील मौजे धारणगावातील माता-भगिनींनी दुधना नदीवर पुल बांधून देण्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शनं....!


🌟पावसाळ्यात दुधना नदीतून गावातील नागरिकांना शेतकऱ्यांना माता-भगिनींना करावे लागते धोकादायक पध्दतीने जाणे येणे🌟


परभणी (दि.24 जुन 2024) : परभणी तालुक्यातील मौजे धारणगाव येथील संतप्त शेकडो माता-भगिनींनी आज सोमवार दि.24 जुन रोजी दुधना नदीच्या पात्राच्या काठावर पुलाच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली.

           मौजे धारणगाव हे दुधना नदीच्या काठावर आहे. या नदीवरच मौजे साटला या ठिकाणी एक बंधारा आहे व नव्याने मौजे समसापूर याही ठिकाणी बंधार्‍याचे काम सुरु आहे. या दोन्ही बंधार्‍यामुळे मौजे धारणगाव शिवारातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबत आहे. त्याचा परिणाम मौजे धारणगावच्या ग्रामस्थांना नदी पलीकडील शेताकडे ये-जा करतांना अक्षरशः नदीपात्रातून तेसुध्दा थर्माकॉलचा आधार घेवून धोकादायक पध्दतीने वाहतूक करावी लागत आहे. विशेषतः वृध्द, महिला व ग्रामस्थांना तुंबलेले हे पाणी जीवघेणे ठरले आहे. गायी, म्हशी, गुर्‍हे यांचीही ये-जा कसरत ठरली आहे. नदीपलीकडील शेताकडे अवजाराची, बि-बियाणांसह शेतमालाची ने-आण करनेसुध्दा अक्षरशः मुश्किल झाले आहे. पाणी तुंबल्यामुळे ग्रामस्थांना पंधरा ते सोळा किलो मीटर वळणरस्ता घेवून दुसर्‍यांच्या शेत गटामधून ये-जा करावी लागत आहे.

            दररोजच्या या धोकादायक प्रवासासह कटकटीमुळे ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत. कारण, 80 टक्के शेतजमीन ही दुधना नदीच्या पात्राच्या पलीकडील भागात आहे. त्यामुळे धोकादायक प्रवासामुळे शेतीच्या मशागतीसह रोजच्या उदरनिर्वाहावरच त्याचा मोठा परिणाम झाला आहे. वर्षानूवर्षापासूनचा हा नाहक त्रास प्रशासनाने पूल बांधून कायमचा सोडवावा या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. ये-जा करण्याकरीता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी केली. परंतु ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या या मागणीकडे कोणीही ढुंकूनही पाहिले नाही. त्याचा परिणाम सोमवारी संतप्त महिलांसह शेकडो ग्रामस्थांनी नदीपात्राच्या काठावर जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

           दरम्यान, येथील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हा प्रशासनास आपल्या मागणी संदर्भात निवेदन सादर केले.

दरम्यान, येथील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हा प्रशासनास आपल्या मागणी संदर्भात निवेदन सादर केले. या निवेदनावर बळीराम वायभासे, श्रीधर डोंबे, माधव वायभासे, रंगनाथ वायभासे, रमेश साळवे, ज्ञानोबा डुकरे, दौलत डोंबे, रामराव डोंबे,, मधुकर डुकरे, बाळासाहेब डुकरे, जगन्नाथ डुकरे, गजानन डुकरे, अनंता वायभासे, गजानन डुकरे, राजाराम वैद्य, प्रभाकर इक्कर, विठ्ठल वायभासे, वामन वायभासे, गौतम साळवे, बाबुराव डोंबे, नितीन साळवे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या