🌟परभणी जिल्ह्यात विशेष मतदान पुनरीक्षण मोहिमेस सुरुवात.....!


🌟युवा मतदारांनी नावनोंदणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन🌟

परभणी (दि.28 जुन 2024) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकाधिक मतदारांची नोंदणी व्हावी या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पुनरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत दिनांक 25 जुन ते 24 जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) यांच्याव्दारे त्यांचे मतदार यादी भागामध्ये घरोघरी भेटी देवून मतदारांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी सांगितले आहे. 

तसेच वरील कालावधीत नवमतदारांची नोंदणी केली जाणार असून, गंगाखेड उप विभागातंर्गत गंगाखेड तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे उपस्थित होते. गंगाखेड तालुक्यातील सर्व केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांची उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी मार्गदर्शन केले व पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली.

तसेच 9 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती पत्रकार व राजकीय पक्ष यांना व्हावी म्हणून सर्व राजकिय पक्षाचे प्रतिनिधी व पत्रकार यांचे समवेत देखील बैठक आयोजित करण्यात आली होती. मतदार यादीतील दुबार नावांची व मयत मतदारांची नावे खात्री करून वगळली जाणार आहेत. त्याचप्रमाणे मतदारांचे मतदार यादीमधील फोटो योग्य त्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन अद्यावत केली जाणार आहेत.

या शिवाय मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, प्रमाणीकरण व तपासणी देखील करण्यात येणार आहे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी दिनांक 25 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच 25 जुलै ते 9 ऑगस्ट 2024 या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्या जाणार असून या काळातील शनिवारी, रविवारी दावे व हरकती स्विकारण्यासाठी विशेष मोहीम देखील राबविली जाणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत दि. 19 ऑगस्ट 2024 पर्यंत राहणार असून, 20 ऑगस्ट 2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे.

या मोहिमेत दि.01 जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे सर्व नागरिक मतदार म्हणून मतदार म्हणून मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी पात्र ठरणार आहेत. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नावे नोंदणी न झालेल्या व अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या नागरिकांना छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आपले नाव मतदार म्हणून नोंदविता येणार आहे. राजकिय पक्षानी प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ स्तरावर एजंट नेमणूक करावा असे जिवराज डापकर, मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागी अधिकारी गंगाखेड यांनी सूचित केले.

97- गंगाखेड विधानसभा मतदार संघातील गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांनी ह्या मोहिमेत सहभागी होवून, मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांनी केले आहे........

******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या