जॉर्ज फर्नांडिस जयंती विशेष : स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी नेतृत्व....!


🌟सर्वप्रथम १९६७ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे स.का.पाटिलांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश🌟 

जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस कामगार नेते,पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल (संयुक्त) पक्षातील एक ज्येष्ठ होते. याशिवाय त्यांनी १९९४ साली नितीश कुमार ह्यांच्या सोबत समता पक्षाची स्थापना केली होती. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. त्यांच्याबद्दल महत्वपूर्ण संकलित माहिती  KGN - श्री के. जी. निकोडे गुरूजींच्या याच लेखात.... संपादक.

         जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म दि.३ जून १९३०ला जॉन जोसेफ फर्नांडिस आणि एलिस मार्था फर्नांडिस या धार्मिक वृत्तीच्या मध्यमवर्गीय मंगलोरी कॅथॉलिक ख्रिश्चन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे वडील एका खाजगी विमा कंपनीत अधिकारी होते. सहा भावंडांमध्ये जॉर्ज सर्वात मोठे होते. त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोळाव्या वर्षी त्यांना रोमन कॅथॉलिक धर्मगुरू होण्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र जॉर्ज यांनी ते पूर्ण करण्याऐवजी, वयाच्या १९ व्या वर्षी मंगलोरमधील हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्याचे काम केले. ही त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होती. सन १९४९ मध्ये जॉर्ज नोकरीच्या शोधात मुंबईत आले. तेथे त्यांचे सुरुवातीचे दिवस अत्यंत खडतर गेले. पुढे कामगार नेते डिमेलो आणि समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते आले, त्यांचा जॉर्ज यांच्या विचारांवर आणि जीवनावर मोठा प्रभाव पडला.

            जॉर्ज फर्नांडिस सर्वप्रथम इ.स.१९६७मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स.का.पाटिल यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. मात्र इ.स.१९७१च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी इ.स.१९७४मध्ये नेतृत्व केले. आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला. इ.स. १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्री म्हणून काम बघितले. जुलै १९७९ मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास राहिला नाही असे जाहीर करून मंत्रीमंडळातून राजीनामा दिला. इ.स.१९८४च्या निवडणुकीत त्यांचा मंगलोर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. पण इ.स.१९८९मध्ये ते बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले. विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या संयुक्त आघाडी सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते. इ.स.१९९१च्या लोकसभा निवडणुकांतही त्यांनी मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला. इ.स.१९९४ मध्ये बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या नितीश कुमार आणि रवी रे यांच्यासारख्या नेत्यांनी समता पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. फर्नांडिस यांनी बिहारमधील नालंदा मतदारसंघातून विजय मिळवला. पुढे इ.स.१९९८ आणि इ.स.१९९९च्या लोकसभा निवडणुकींत त्यांनी नालंदा मतदारसंघातूनच विजय मिळवला. इ.स.१९९९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडे यांचा लोकशक्ती या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल (संयुक्त) हा नवा पक्ष अस्तित्वात आला.

         इ.स.१९९८मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम बघितले. इ.स. २००१ मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे ते मार्च ते ऑक्टोबर २००१ मंत्रिमंडळाबाहेर होते. पण ऑक्टोबर २००१मध्ये त्यांची परत संरक्षणमंत्रीपदी नेमणूक झाली. इ.स.२००४च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी बिहार राज्यातील त्यांच्या पूर्वीच्या मुझफ्फरपूर मतदारसंघातून विजय मिळवला. नंतरच्या काळात ते आजारपणामुळे लोकसभेत फारसे सक्रीय राहिले नाहीत. त्यांना इ.स.२००९च्या लोकसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त) पक्षाने तिकीट नाकारले. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षनेतृत्वाबरोबरचे त्यांचे मतभेद मिटले आणि ते राज्यसभेत पक्षातर्फे बिहारमधून निवडून गेले. त्यांचे दि.२९ जानेवारी, इ.स.२०१९ रोजी स्वाइन इन्फ्लुएन्झा झाल्याच्या कारणाने नवी दिल्ली येथे निधन झाले. इ.स.२०२० चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आले.

!! पावन जयंतीनिमित्त जाॅर्ज फर्नांडिस साहेबांना अनेक विनम्र अभिवादन जी !!

                    - संकलन व शब्दांकन -

                      KGN - श्री के. जी. निकोडे गुरूजी.

                     रामनगर वॉर्ड,  गडचिरोली.

                     फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या