🌟परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील मानोलीतील ढगफुटीत वाहून गेलेल्या ‘त्या’ महिलेचा मृतदेह अखेर सापडला...!


🌟वाहून गेलेल्या महिलेच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार🌟

परभणी (दि.११ जुन २०२४) :- परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील मानोली शिवारात काल सोमवार दि.१० जुन २०२४ रोजी सायंकाळी ०४.०० वाजता ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने त्या पावसात शेतातून येणार्‍या दोन महिला वाहून गेल्या होत्या.  त्यातील एका महिलेस सुखरूप बाहेर काढण्यात आले होते परंतु दुर्दैवाने दुसरी महिला वाहून गेल्याची हृदयविददारक घटना घडली होती त्या वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह १५ तासाच्या शोधमोहीमे नंतर झोडगाव शिवारात आज मंगळवार दि.११ जुन रोजी सकाळी ०७.०० वाजता आढळून आला.

           मानोली येथील रंजना भास्कर सुरवसे व सरस्वती धुराजी लव्हाळे या दोन महिला शेतातून घरी परतत असताना त्यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या रस्त्यातील ओढ्याला अचानक पाण्याची पातळी वाढली. या दोन्ही महिला त्यात वाहून गेल्या, त्यातील रंजना भास्कर सुरवसे या महिलेने झाडाचा सहारा घेतल्यामुळे या महिलेस बाहेर काढण्यात  यश आले.  तर सरस्वती लव्हाळे ही महिला त्या पाण्यात वाहून गेली. सोमवारी दुपारी ०४.०० वाजल्यापासून या महिलेचा शोध चालू होता. परंतु ती महिला रात्री अंधार पडेपर्यंत आढळून आली नाही.  अखेर मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा ०६.०० वाजल्यापासूनच शोध मोहीम चालू करण्यात आली होती. झोडगाव शिवारात एक शेतकरी दूध काढण्यासाठी शेतात जात असताना त्या शेतकर्‍यास या महिलेचा मृतदेह झोडगावच्या पूल व कालव्याच्या मध्ये  असलेल्या परिसरात आढळून आला.  तेव्हा त्या शेतकर्‍याने मानोली  येथे फोन करून  महिलेचा मृतदेह या ठिकाणी असल्याचे सांगितले.  लगेचच मानोली  येथील महिलेचे नातेवाईक व शोध पथक त्या ठिकाणी गेले. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन कोल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. या महिलेच्या मृतदेह उत्तरीय तपासणी नंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मानोली येथे शोकाकुल वातावरणात सरस्वती लव्हाळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या