🌟आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिवस : पालकांनो सावधान....तुमचे लाडके होताहेत व्यसनाधीन....!


🌟भारतात एनडीपीएस ॲक्ट-नार्कोटिक ड्रग्ज ॲन्ड सायकोट्राफिक सब्सटंन्सेस ॲक्ट-१९८५ नुसार नशीले पदार्थ वापरणे गुन्हा🌟

         अमली पदार्थ वेळेवर न मिळाल्याने किंवा महाग झाल्याने युवकांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. यात महाराष्ट्रातील युवकांचा क्रमांक वरचा आहे. आपले जीवन सुंदर आहे. ते एकदाच मिळत असते. अमली पदार्थांपासून दूर राहून आपले जीवन सुंदर बनवा. आरोग्याला महत्त्व द्या... व्यायाम करा...खेळ खेळा...पण बाळानो, अमली पदार्थांना थारा देऊ नका रे! असा संतचरणरज- श्रीकृष्णदास निरंकारी (बापू) यांचा सुंदर मार्गदर्शक लेख... संपादक.

      भारतात एनडीपीएस ॲक्ट- नार्कोटिक ड्रग्ज ॲन्ड सायकोट्राफिक सब्सटंन्सेस ॲक्ट-१९८५अनुसार नशीले पदार्थ वापरणे गुन्हा आहे. ड्रग्ज तुम्ही तुमच्यासाठी वापरा किंवा दुसऱ्या कामासाठी वापरा, तो गुन्हाच आहे. त्याला दंड हा ड्रग्स किती प्रमाणात वापरतो, याच्यावर अवलंबून असते. जर एखाद्याला ड्रग्स बाळगण्यासाठी किंवा सेवन केल्यामुळे शिक्षा झाली असेल आणि त्याची सुधारायची इच्छा असेल, तर तो एखाद्या डी-ॲडिक्शन सेंटरमध्ये उपचार घेऊ शकतो. त्याने उपचार मध्येच थांबवले आणि परत व्यसनाकडे वळला तर त्याला परत शिक्षा होऊ शकते. ग्रामीण भागात अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण कमी आहे. मात्र शहरांच्या ठिकाणी याचे प्रमाण वाढत आहे. हे चिंताजनक आहे. मुंबईत ग्रँट रोड स्टेशन, दाणाबंदरला जाणारा ब्रीज, डॉकयार्ड कॉलनीतल्या वस्त्या, माहीम कोळीवाड्याकडे जाणारा ब्रीज, कुर्ला-सांताक्रुझ जोडमार्गाच्या समोरील गल्ल्या, मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी आदी ठिकाणच्या झोपडपट्ट्या, खाडीच्या किनारीलगतच्या झोपडपट्ट्या इथं नशा करणारी टोळकी आपल्याला दिसतात. त्यांना आपण गर्दुले म्हणतो. हे गर्दुले आपली नशा भागविण्यासाठी कोणत्याही थराला जावून गुन्हेगारीकडे वळतात. चोरी, लुटमार, मोबाईल चोर, महिलांच्या गळ्यातील दागिने यातून ते पैसे मिळवून नशा करतात. शिवाय बलात्कार, मारामारी, खून करण्याची त्यांची प्रवृत्ती वाढत आहे. केवळ जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे आज या गर्तेत आपोआपच सापडले जात आहेत. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच उच्चभ्रू वर्गातील लोकही यात गुरफटू लागले आहेत. सुरुवातीला कोणीही अमली पदार्थ व्यसनाधीन होण्यासाठी सेवन करीत नाही. काही विद्यार्थी अभ्यास करताना झोप येऊ नये, म्हणून सुरुवातीला अमली पदार्थाचे सेवन करतात. मुलीही अमली पदार्थाच्या विळख्यात अडकू लागल्या आहेत. बाजारात नशा आणणारे अनेक पदार्थ मिळतात. काही औषधांनीही नशा येते. काहीजण अमली पदार्थ शरीरात टोचून घेतात, पण कोणताही अमली पदार्थ हा शरीरासाठी घातकच आहे. या विळख्यात गटांगळ्या खाणाऱ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामाविषयी जागृती करण्यासाठी २६ जून या दिवसाचे महत्त्व आहे. अनेक कार्यक्रमांनिमित्त याविषयी जनजागृती आणि या पदार्थांपासून दूर कसे राहावे, तसेच आपल्या प्रकृतीविषयी गंभीर राहण्याविषयी सावध केले जाते. शैक्षणिक संस्थांबरोबरच इतर सेवाभावी संस्थाही या कामात पुढाकार घेत आहेत. यात आता सामान्य माणसांचाही सहभाग असणे अपरिहार्य बनले आहे. इतकी ही समस्या जटील बनली आहे. आपल्या बॉलिवूडमध्ये नुकताच "उडता पंजाब!" हा चित्रपट येवून गेला. यात पंजाबमध्ये पाकिस्तान सीमेवरून अमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याचे दाखविले आहे. याचा अर्थ आपल्या शेजारील देशातून म्हणजेच पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, भूतान येथून अमली पदार्थ आपल्या देशात येतात. याची किंमतही लाखो रूपयात असते. याची खरेदी-विक्रीही सांकेतिक चिन्हे, खुना व भाषांच्या माध्यमातून होते. हशीशसारखे अंमली पदार्थ नेपाळमधून पुरविले जातात. नायजेरियनांकडून भारतात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जाते. नायजेरियन विद्यार्थी वा कपड्यांचे व्यापारी या माध्यमातून ही तस्करी केली जाते. नायजेरिया देशातील नागरिक किनारी भागात मोठ्या प्रमाणात वावरताना दिसतात.

       नशेची लक्षणे- वर्तणुकीत अचानक बदल घडतो. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या मुलांची शाळेत उपस्थिती कमी होऊ लागते. अभ्यासात, खेळ किंवा अन्य कार्यक्रमात त्याचे मन लागत नाही. पॉकेटमनी वाढविण्यासाठी सतत पालकांकडे तगादा लावतात. घरातील वस्तू हळूहळू गायब होणे. जुने मित्र सोडून नवीन मित्र बनविणे. बाथरुममध्ये जास्त वेळ घालविणे. घरात इंजेक्शन अथवा सिरिंज आढळणे. डोळे लाल, निस्तेज होणे, डोळ्यांखाली सूज येणे. बोलताना अडखळणे, उभे राहण्यासाठी त्रास होणे. भूक न लागणे. वजन कमी होणे. व्यक्तिगत स्वच्छता, कपड्यांबद्दल बेफिकिरीने वागणे. निद्रानाश, व्यसनाचा परिणाम फुप्फुस, स्मरणशक्ती, अवयव निकामी होतात, अस्वस्थता, मानसिक आजार वाढतात. यावर उपाय- पालकांनी आपल्या पाल्याला समजून घ्यावे. त्यांना तंबाखू, विडी, सिगारेट, खर्रा, गुटखा, दारू आणण्यास पाठवू नका. त्याच्याशी मित्र म्हणून वागा. काय वाईट..काय चांगले हे गोडीने व मित्रत्वाच्या नात्याने पटवून द्या. त्याच्याशी प्रेमाने वागा...त्याला विश्वासात घ्या. वाईट मित्रांची संगत करू देऊ नका. वेळीच सावध करायला हवे. शिक्षकांचे हुशार मुलांबरोबर कमी मार्क्स असलेल्या मुलाकडेही तितकेच लक्ष हवे. कोणत्याही मुलाला कमी लेखू नका. तसे झाले तर ते व्यसनाकडे वळली जातात. औषधोपचार- मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन, शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून मद्य आणि अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजना म्हणून स्वयंसेवी संघटनांना पुनर्वसन केंद्र चालवण्यासाठी अनुदान दिले जाते. व्यसनविरोधी शिबिरांचे आयोजन करणे, जनजागृती करणे, व्यसनाधीन युवकांचे पुनर्वसन करणे अशा उपाययोजनांसाठीही आर्थिक सहाय्य पुरवले जाते. शाळा- महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना अमली पदार्थाच्या घातक परिणांमाविषयी माहिती दिली जाते. शिवाय मुंबईत केईएम हॉस्पिटलनंतर आता राजावाडी हॉस्पिटलमध्येही अमली पदार्थ व्यसनाधीन झालेल्यांवर मोफत उपचार केले जातात.

            तरूणांना अमली पदार्थाचा विळखा...अमली पदार्थाची विक्री करताना टोळीला अटक...रेल्वे फूटपाथवर चालतो अमली पदार्थाचा धंदा... अमली पदार्थाच्या सेवनाने दोघांचा मृत्यू...विमानतळावर तीन कोटींचे ड्रग्ज सापडले...दोघांना अटक...अशा आशयाच्या बातम्या आपण रोज वर्तमानपत्रात व न्यूज चॅनेलवर वाचतो, ऐकतो. आजची बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. आपल्या देशाच्या हद्दीत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या देशाला लागून असल्यामुळे याचे प्रमाण वाढत आहे. पालकांना तरूणांना यापासून रोखण्याची समस्या सतावत आहे. शासनाने अशा पदार्थांवर बंदी घातलेली आहे. दरवर्षी २६ जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.

         भावी तरूण पिढीला वाचविण्यासाठी शासनच सरसावले आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद ४७मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी (औषधीय प्रयोजनाव्यतिरिक्त) मादक पदार्थावरील बंदीची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार राज्यांचे व्यसनमुक्ती धोरण निश्चित करण्यात आले असून या विभागाच्या दिनांक १७ ऑगस्ट २०११च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याचे व्यसनमुक्ती धोरण जाहीर करण्यात आले आहे.

          संयुक्त राष्ट्राने सन १९८७पासून अमली पदार्थ हा विषय महत्वाचा मानला आहे. भारतात नार्कोटिक ड्रग्स ॲण्ड सायकोट्रॉपिक सबटंन्स ॲक्ट-१९८५- एनडीपीएस हा अंमली पदार्थ विरोधी कायदा आहे. मालद्वीप सरकारने संयुक्त राष्ट्रांना मादक पदार्थांच्या संबंधित संमेलनासाठी अनुमोदन दिले आणि पहिले अंमली पदार्थावर आधारित संमेलन सन१९६१ला झाले. दुसरे संमेलन १९७१मध्ये अवैध सायकोट्रापिक पदार्थ यावर झाले. गैरकानुनी धंद्याच्या विरोधात सन १९८८मध्ये तिसरे संमेलन झाले. या कायद्यांतर्गत अमली वस्तू किंवा औषधाचे उत्पादन, वितरण, सेवन, विक्री, वाहतूक, साठा, वापर, आयात-निर्यात यावर देशात बंदी आहे. प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक व विशेष सहाय विभागाने उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. राज्यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांनी 26 जून या दिवशी आपल्या परिसरातील शाळा व स्वयंसेवी संस्थांमार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे. गावात/शाळामधून अमली पदार्थ विरोधी फेरी काढणे, अमली पदार्थावर बंदी याविषयी निबंध स्पर्धा आयोजित करणे, व्यसनमुक्ती हीच राष्ट्रभक्ती याविषयी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे, अमली पदार्थावर पथनाट्याचे आयोजन करणे, अमली पदार्थ विरोधी जनजागृती करणे, अमली पदार्थाच्या सवयी सोडविण्यासाठी या दिवशी निर्धार प्रतिज्ञा देणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवाय अमली पदार्थाच्या विरोधी काम करणाऱ्या व्यक्ती, सामाजिक संस्था, संघटना यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी मदत करावयाची आहे, याबाबतचे शासन परिपत्रक १९ जूनला पारित झाले आहे.

           ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते. त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ.पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस- हशिश वगैरे पदार्थाचा मादक पदार्थात समावेश केला जातो. ब्राऊन शुगर, झंडूबाम रुमालावर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात. यातून त्यांना नशा येते. स्पिरीटचाही नशेसाठी अशाचप्रकारे वापर केला जात आहे. यापुढेही जाऊन श्रीमंत लोक सिंथेटीक अमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडी- मेफेड्रॉनचा वापर होऊ लागला आहे. शिवाय मॅजिक मश्रूम, एलसीडी, मारिजुआना, म्याव-म्याव, डॅरनेक्स, शिलावती, वेदनाशामक गोळ्या, व्हाईटनर ते औषधे याचाही वापर नशेसाठी केला जाऊ लागला आहे. तज्ज्ञ म्हणतात, की अमली पदार्थांचे सेवन हा एक मानसिक आजार आहे. याचे सेवन करणारे चटावलेले असतात. याचा वाईट परिणाम हा त्या व्यक्तिच्या आयुष्यावर तर होतोच, मात्र कुटुंब आणि समाजावरही होत असतो. सर्व व्यसनांवर निश्चित उपचार आहेत. अमली पदार्थांच्या विळख्यातून सहजपणे बाहेर येण्यासाठी योग्य तज्ज्ञ व योग्य कालावधीमध्ये उपचार व्हायला हवेत. अमली पदार्थ वेळेवर न मिळाल्याने किंवा महाग झाल्याने युवकांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत आहे. यात महाराष्ट्रातील युवकांचा क्रमांक वरचा आहे. आपले जीवन सुंदर आहे. ते एकदाच मिळत असते. अमली पदार्थांपासून दूर राहून आपले जीवन सुंदर बनवा. आरोग्याला महत्त्व द्या... व्यायाम करा...खेळ खेळा...पण बाळानो, अमली पदार्थांना थारा देऊ नका रे!

!! जागतिक मादक पदार्थ नकार दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी !!

                 - संकलन व सुलेखन -

                  संतचरणरज- श्रीकृष्णदास निरंकारी (बापू).

                  रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                 फक्त दूरभाष- ७१३२७९६६८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या