🌟नांदेडची सायंटिस्ट भीमकन्या मनाली दामोधर हिच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक.....!


🌟स्त्री गर्भाशयाच्या पीसीओएस आजाराच्या निदानासाठी शोधली पहिली कीट🌟

नांदेड - येथील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या कु. मनाली गौतम दामोधर हिने आपल्या बुध्दी कौशल्याच्या जोरावर संशोधन क्षेत्रात अदभुत आणि असामान्य कामगिरी केली आहे. इयत्ता बारावी नंतर आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर येथे बॅचलर ऑफ सायन्स ,मास्टर ऑफ सायन्स हा पाच वर्षाचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना मनाली दामोधर हिने महिलांच्या गर्भाशयाच्या पीसीओएस या गंभीर आजाराचे अगदी सहज सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी स्वतःच्या कल्पकतेने यशस्वी केलेल्या प्रयोगाने चक्क जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविला असून त्याबद्दल त्यांच्या टीमने सुवर्णपदक पटकावले आहे.  त्यामुळे नांदेडच्या या सायंटिस्ट भीम कन्येने संशोधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा भीम पराक्रम केला आहे, त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


 सध्या तरोडा सांची नगर येथील रहिवाशी मनाली गौतम दामोधर ही  हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण या गावाची मूळ रहिवासी असून  वडीलांच्या नौकरी निमित्ताने कुटूंब किनवट येथे  अनेक वर्षे वास्तव्यास असल्याने मनालीने इयत्ता दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा किनवट येथील  महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल येथून विशेष प्राविण्यासह उतीर्ण केली.  इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना साधारणतः डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची इच्छा असते. नव्हे तर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्र जणू त्यांना खुणावत असते.परंतु आजघडीला मोठे वलय असलेल्या या दोन्ही हायटेक करिअरचा मोह न करता मनालीने आपली मोठी बहीण डॉ.सांची दामोधर यांच्या मार्गदर्शनाखाली आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर येथे बॅचलर ऑफ सायन्स ,मास्टर ऑफ सायन्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तसेच केवळ जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारीच्या जोरावर मनालीने गेल्या पाच वर्षांत पदवी आणि पदव्युत्तरची परीक्षा उतीर्ण केली. या अभ्यासक्रमाचा एक भाग असलेल्या प्रोजेक्टमध्ये महिला वर्गांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पीसीओएस या स्त्री रोगावर सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी स्वतःच्या कल्पकतेने तिने आपल्या टीमला संशोधन करण्याची डिटेक्शन किटची आयडिया दिली. खरेतर महिलांच्या गर्भाशयातील पीसीओएस गंभिर आजाराचे निदान  आजघडीला सोनोग्राफी आणि काही हार्मोन्स टेस्टिंगच्या मदतीने हा आजार कन्फर्म करता येतो. परंतु त्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारे महिलांच्या गंभिर मोठ्या जीवघेण्या आणि तेवढ्याच चिंताजनक समजल्या जाणाऱ्या या आजाराचे सहज आणि सोप्या पद्धतीने निदान करण्यासाठी मनाली दामोधर हिने आपल्या टीमला डिटेक्शन किटची आयडिया दिली. तसेच टीममधील सर्वाँना ती आवडल्यामुळे लगेच त्यांनी त्यावर सातत्याने अभ्यासपूर्ण संशोधन करून हा प्रयोग यशस्वी केला. रुग्ण महिलेच्या रक्ताचे सँपल घेवून त्यावर टेस्टिंग प्रकिया करून या स्त्री रोगाचे निदान करणारे जगभरातील यावरील हे पहीले संशोधन ठरले आहे. विशेष म्हणजे टीममधील सर्वाँच्या अथक परिश्रमामुळे हा प्रयोग यशस्वी ठरला असून जागतिक स्तरावरील स्पर्धेत तो बक्षीस पात्र ठरला आहे. फ्रान्स देशातील पॅरिस या शहरात गतवर्षी घेण्यात आलेल्या नवोदित संशोधकांसाठीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिरुपती येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर ( IISER) यांच्या टीमने उल्लेखनीय कामगिरी केली असून त्याठिकाणी त्यांनी सादर केलेल्या डिटेक्शन किट या संशोधनास सुवर्ण पदक मिळाले आहे. या टीममध्ये नांदेडच्या मनाली दामोधर या तरुण सायंटिस्ट भीम कन्येचा समावेश असून तिच्या या अदभुत यश आणि चमकदार कामगिरी बद्दल समाजाच्या सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

* मंगळवारी फ्रान्सला प्रयाण करणार :-

बी.ए.बीएड अभ्यासक्रम पूर्ण करूनही केवळ मुलांचे शिक्षण आणि उज्ज्वल करिअर यावर कुठलाही परिणाम होवू नये,यासाठी शिक्षिकेच्या नोकरीची ऑफर येवूनही जॉब न करण्याचा निर्णय घेणारी आई आशाताई दामोदर, शिक्षक वडील गौतम दामोदर, संस्था चालक इंजि.प्रशात ठमके ,बहीण डॉ. सांची दामोदर आणि काका शिवाजी दामोदर ,मामा साहेबराव पवार यांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले, त्यामुळे माझ्या या उल्लेखनीय यशाचे खरे श्रेय मी त्यांनाच देते, असे नमूद करून कु. मनाली दामोदर हिने महिलांच्या गर्भाशयाच्या गंभीर आणि पुढ कॅन्सरमध्ये परावर्तित होणाऱ्या आजाराचे वेळीच निदान होणार असल्याने रोगांवर प्राथमिक अवस्थेत उपचार करणे शक्य होणार आहे. 

 फ्रान्समधील युनिव्हर्सिटी ऑफ बोर्डिअक्स या लॅबने तिच्या संशोधनाची दखल घेवून लिव्हर कॅन्सर वरील संशोधनासाठी निमंत्रित केले आहे.त्यामुळे तेथील रिसर्च कोर्स करण्यासाठी येत्या मंगळवार दि.४ जुन रोजी मी फ्रान्सला जाणार आहे. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमान तळावरून फ्रान्ससाठी प्रयाण करणार आहे, तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्या मुळेच मला हे यश मिळविणे शक्य झाले, असेही मनालीने यावेळी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या