🌟विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनपा आयुक्त जी.श्रीकांत यांच्या सोबत विविध प्रश्नांवर व समस्यावर केली चर्चा.....!


🌟विरोधी पक्षनेते दानवे यांनी आयुक्तांकडून विकासात्मक योजनांची प्रशासन पातळीवरील स्थितीची घेतली माहिती🌟 

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल शुक्रवार दि.21 जून 2024 रोजी महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत यांच्यासमवेत चर्चा केली. मनपाच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळा, गुंठेवारी, स्वच्छता, पाणीपुरवठा, हॉस्पिटल व घरकुल सुविधांबाबत प्रशासन पातळीवर असलेल्या स्थितीची माहिती घेतली. तसेच मंत्रालयीन पातळीवर रखडलेल्या कामांची यादी माझ्याकडे सोपवावी त्यांना तातडीने मार्गी लावून घेतो,असल्याची सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. 

बंद पडलेल्या मनपाच्या शाळांचे समाययोजन करण्यापेक्षा मराठी माध्यमातून सीबीएससी शाळा सुरु करण्यात याव्यात. साधारणतः १४ महानगरपालिकेच्या शाळा बंद करण्यात आल्याची माहिती आयुक्त यांनी दिली. पट संख्या कमी असल्याच्या कारणास्तव मराठी शाळा बंद करून न टाकता त्याऐवजी पालकांच्या मागणीप्रमाणे सीबीएससी मराठी माध्यमांच्या गुणवत्तापूर्ण शाळांमध्ये रुपांतरित करण्यात याव्या, अशी सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

शहराच्या पाणी पुरवठा प्रश्नी अधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धारेवर धरले. जायकवाडी धरणातून शहरासाठी लागणारे पाणी मुबलक स्वरूपात पुरवठा केले जाते. तरीही एक दिवसा आड पाणी न देता पाच ते सहा दिवसांना का? पाणी मिळते असा जाब त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. तसेच पाणी पुरवठ्यात समस्या नसून मनपाच्या वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याची सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. 

मनपा बांधत असलेले मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे.सर्व राजकीय पुढार्‍ यांचे होर्डिंग्स समान वागणूक देऊन काढून टाकावे.सत्ताधाऱ्यांना प्राथमिकता आणि विरोधातील दुय्यमत्व अशी वागणूक देऊ नका असा गंभीर इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.

सुंदरवाडी येथे गरीब लोकांसाठी बांधण्यात येत असलेल्या घरकुलांसाठी  लागणाऱ्या जमिनीवरील आरक्षण हटवण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर मी प्रयत्न करतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच प्रस्तावित वीर सावरकर यांच्या स्मारकाचे कामकाज सुरू करण्यात यावे, अशी सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. 

  याप्रसंगी बैठकीस मनपा आयुक्त जी.श्रीकांत, माजी महापौर त्र्यंबक तुपे,नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख राजु वैद्य, नगरसेवक मकरंद कुलकर्णी व मनपा अधिकारी उपस्थित होते. 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या