🌟परभणी येथे शास्त्रीय सल्लागार समितीची आढावा बैठक संपन्न....!


🌟या बैठकीला जीवन ज्योत चॅरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा लक्ष्मीताई अशोकरावजी देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

परभणी :- परभणी येथील कृषि विज्ञान केंद्रात दि.२६ जुन २०२४ रोजी जीवन ज्योत चॅरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती लक्ष्मीताई अशोकरावजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शास्त्रीय सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी मा. डॉ.डी.एन.गोखले, संचालक, विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी हे उद्घाटक तसेच मा. श्री. रवी हरणे, उप विभागीय कृषि अधिकारी, परभणी आणि मा. श्री. संजय गायकवाड, प्रकल्प उप संचालक, आत्मा, परभणी हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

या आढावा बैठकीमध्ये जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधी दरम्यान घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा संक्षिप्त अहवाल व सन २०२४ या वर्षाचा वार्षिक कृती आराखडा सादर करण्यात आला. सदर बैठकीमध्ये डॉ. प्रशांत भोसले, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शास्त्रज्ञांनी विभागनिहाय घेतलेल्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. या सादरीकरणा अंतर्गत कृषि विज्ञान केंद्राचे विशेष उपक्रम, पिक प्रक्षेत्र चाचणी, आद्यरेषा पिक प्रात्यक्षिक, प्रशिक्षण व विस्तार कार्यक्रमांचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला, तसेच प्रक्षेत्रावर कार्यरत असलेल्या विविध प्रकल्पांच्या उत्पादनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

मा. डॉ. जी. डी. गडदे, व्यवस्थापक, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी सदर बैठकीमध्ये आपले अभिप्राय देताना कृषि विज्ञान केंद्रामार्फत बीबीएफ व टोकण पध्दतीने सोयाबीन पिकाची प्रात्यक्षिके घेण्याबाबत सुचविले. तसेच एकात्मिक किड, रोग व तण व्यवस्थापनाबाबत मोठ्या प्रमाणावर अभियान राबविण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली.  

मा. श्री. रवी हरणे व मा. श्री. संजय गायकवाड यांनी कृषि विभाग, आत्मा व कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विभागाच्या योजना, एकात्मिक शेती पध्दतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व इतर विस्तार विषयक विशेष मोहिम कशा प्रकारे राबविता येईल याबाबत मार्गदर्शन केले.   

मा. डॉ. पी. पी. नेमाडे, उपआयुक्त, पशुसंवर्धन विभाग, परभणी यांनी कृत्रिम रेतनाचे नविन तंत्रज्ञान, जनावरातील लंम्पी त्वचा आजारापुर्वी घेण्याची काळजी, जनावरांचे पशुखाद्य व चारा व्यवस्थापन तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्राची मदत व्हावी ही आशा व्यक्त केली. त्यानुसार कृषि विज्ञान केंद्र आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम राबविण्यात येतील अशी ग्वाही कृषि विज्ञान केंद्र, परभणी चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, डॉ. प्रशांत भोसले यांनी दिली.

मा. डॉ. डी. एन. गोखले, संचालक, विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी विद्यापीठाने विकसीत केलेले नवीन तंत्रज्ञान व नवीन वाणांचा प्रसार व प्रचार करण्याचे आवाहन केले. तसेच मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी व सेंद्रिय कर्बाचे जमिनीतील प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने विविध प्रात्यक्षिके, जैविक खतांचा वापर, बायोचार याबाबत अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. वाढविण्या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपुर्ण उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सदरील बैठकी दरम्यान कृषि विज्ञान केंद्रामार्फत तयार करण्यात आलेल्या दादा लाड कापुस लागवड तंत्रज्ञान या विषयाबाबतच्या डॉक्युमेंट्रीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले श्री. जनार्धन आवरगंड, श्री. प्रकाश हरकळ, श्री. रामेश्वर साबळे, श्री. दिगंबर अंभुरे, श्री. दिलीप अंभुरे, सौ. सविता शिंदे यांनी कृषि विज्ञान केंद्र, परभणी मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्यांची सविस्तर माहिती दिली. तसेच कृषि विद्यापीठ, कृषि विभाग व संलग्न विभागांनी एकात्रितरीत्या नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविण्यासाठी प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होईल अशी आशा व्यक्त केली.

सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. अरुणा खरवडे व आभार प्रदर्शन श्री. अमित तुपे यांनी केले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या