🌟गंगाखेड तालुक्यातील ग्रामिण भागातल्या विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी मिळणार एसटी बस.....!


(रस्ता चाचणी वाहन अधिकारी श्री वलेकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा दत्तवाडी देवस्थान व गावकऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ईन्सेट मध्ये निवेदन सादर करताना गोविंद यादव व शिक्षक वृंद.)

🌟कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांच्या पाठपुराव्यानंतर झाली रस्ता चाचणी🌟 

गंगाखेड : गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथे आसपासच्या खेड्यांमधील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. परंतू, वाहतूक व्यवस्था नसल्याने बरेच  विद्यार्थी खाजगी वाहनांतून प्रवास करतात तर काही मात्र शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्याची विनंती शिक्षकांनी केल्यानंतर कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांच्या प्रयत्नांतून महातपूरी- दत्तवाडी मार्गावर एस टी बसची आज रस्ता चाचणी घेण्यात आली. या मार्गावरील अडथळे दूर केल्यानंतर नियमित बससेवा सुरू करण्याचे अश्वासन परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. 

गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथे शासकीय व खाजगी शाळा कार्यरत आहेत. आसपासच्या गावांमधील अनेक विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी बस व्यवस्थाही आहे. परंतू, शंकरवाडी, दत्तवाडी या भागात बससेवा सुरू नसल्याने येथील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण झालेला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होवून अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहत आहेत. 

ही बाब महातपुरी येथील कै.रामकृष्ण बापू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री परमेश्वर तळेकर व त्यांचे सहकारी श्री गोविंद मानकर, श्री शेख यांनी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांच्या निदर्शनास आणून दिली. श्री यादव यांनी शाळेच्या शिक्षकांसह गंगाखेडचे आगार व्यवस्थापक श्री हडबे यांची दिनांक २७ मे रोजी  भेट घेवून या भागासाठी तातडीने बस सुरू करण्याची मागणी केली. श्री हडबे यांनीही मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत आपला अहवाल वरीष्ठांना लगोलग सादर केला. 

सदर मागणी जिल्हा कार्यालयाकडे गेल्यानंतर तेथील कार्यालयीन अधिकारी श्री एल. आर. औसेकर, चाचणी अधिकारी श्री वलेकर यांचेकडे गोविंद यादव यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्यानंतर आज दि. २८ जुलै रोजी राज्य परिवहन महामंडळाचे रस्ता चाचणी वाहन महातपुरी ते दत्तवाडी रस्त्यावरून धावले. यानिमित्ताने गावात आलेल्या अधिकाऱ्यांचा दत्तवाडी देवस्थानचे महंत नागनाथ पुरी यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. चाचणी अधिकारी श्री वलेकर यांनी या मार्गावर काही दुरुस्त्या सुचवल्या असून त्यांची पुर्तता करताच नियमीत बस वाहतूक सुरू केली जाणार आहे. 

* त्रुटी दुर करण्यासाठी प्रयत्न करणार - गोविंद यादव

या मार्गावर बस सुरू व्हावी यासाठी यापूर्वीही प्रयत्न केले आहेत. आता मात्र रामनगर, आनंदवाडी येथील २५ तर दत्तवाडी, दत्तवाडी तांडा आणि शंकरवाडी येथील ४० अशा जवळपास ६५ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तो सोडवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. परिवहन अधिकाऱ्यांनी रस्ता रुंदीकरणासह सुचवलेल्या सर्व सुधारणा तातडीने करण्याचे प्रयत्न करू. यासाठी स्थानिक आमदार, खासदारांची भेट घेणार असल्याची माहीती कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी दिली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या