🌟परभणी जिल्हा पोलिस दलांतर्गत १११ जागांसाठी ६ हजार ४६४ अर्ज....!


🌟जिल्हा पोलिस दलात शिपाई आणि चालक पदाची होणार भरती🌟 

परभणी (दि.१७ जुन २०२४) : परभणी जिल्हा पोलिस दलांतर्गत शिपाई पदाच्या १११ जागांसाठी ६ हजार ४६४ व चालकांच्या ३० पदांसाठी ४ हजार ५४० अर्ज दाखल झाले आहेत.

     परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी आज सोमवार दि.१७ जुन रोजी पोलिस दलातील शिपाई व चालक या दोन पदांसाठीच्या भरतीची पत्रकार परिषदेतून माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड व अन्य अधिकारी उपस्थित होते.

             जिल्हा पोलिस दलांतर्गत शिपाई या पदाच्या १११ जागा आहे. त्यासाठी ऑनलाईन पध्दतीने ६ हजार ४६४ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी १ हजार ४६७ अर्ज महिलांचे आहेत. तर ४ हजार ९९७ अर्ज हे पुरुषांचे आहेत. चालक पदाच्या ३० जागांसाठी ४ हजार ५४० अर्ज दाखल झाले असून त्यात १९२ अर्ज हे महिलांचे आहेत व ४ हजार ३४८ अर्ज हे पुरुषांचे आहेत, असे पोलिस अधिक्षक परदेशी यांनी नमूद केले.

* विद्यापीठाच्या संकुलात भरतीची प्रक्रिया :-

            जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई व चालक या दोन पदासाठीच्या भरतीची प्रक्रिया वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत क्रिडा संकुलात होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरि तयारी पूर्ण केली आहे १९ जून पासून ही प्रक्रिया सुरु होणार असून पहिल्या टप्प्यात शारिरीक चाचणी तर दुसर्‍या टप्प्यात लेखी परीक्षा होणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, असे ते म्हणाले.

* भरतीची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक :-

             शिपाई व चालक पदासाठीची भरतीची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असणार आहे. यात कोणीही कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये किंवा गैरप्रकाराचे प्रयत्न करु नयेत, असा इशारा पोलिस अधिक्षक परदेशी यांनी पत्रकार परिषदेतून दिला. संपूर्ण भरतीची प्रक्रिया ही अत्यंत सुरळीत, पूर्णतः पारदर्शक पध्दतीने आणि गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे, असेते म्हणाले.

* मॉर्निंग वॉक वर गदा :-

           विद्यापीठाच्या क्रिडा संकुलात १९ जून पासून होणार्‍या या पोलिस भरती प्रक्रिये दरम्यान विद्यापीठात मॉर्निंग वॉकसाठी जाणार्‍या नागरीकांना जिल्हा पोलिस दलाने त्या काळापुरती मनाई केली असून सायाळा व बलसाकडे ये-जा करणार्‍या नागरीकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाने केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या