🌟जिंतूर तालुक्यातील बामणी या गावातील दलित वस्तीमध्ये रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट : लालसेना करणार बोंबाबोंब आंदोलन....!


🌟बामणीतील रस्ते कामाची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची लालसेनेची मागणी🌟

परभणी :- परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील बामणी या गावातील दलित वसाहती मध्ये संबंधित गुत्तेदाराने रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व बोगस केल्याने झाले या  बोगस कामाची चौकशी करुन खर्च झालेली रक्कम संबंधित गुत्तेदाराकडून वसूल करावी व गुत्तेदारासह अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी लालसेनेच्या वतीने गुरुवार ३० मे २०२४ रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे.

             लालसेनेचे कॉ. गणपत भिसे, कॉ.उत्तम गोरे,कॉ.अशोक उबाळे,कॉ.विजय पाणबुडे आदींनी शुक्रवार दि.२४ में २०२४ रोजी जिल्हा प्रशासनास एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, बामणी ग्रामपंचायतद्वारे होणार्‍या विविध विकास कामांतर्गत रोडची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत, असे नमूद करीत येथील ग्रामपंचायत सदस्य अमोल पांडुरंग रणखांब यांनी ०३ मे रोजी एक अर्ज दाखल करुन या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत गंभीर स्वरुपाच्या तक्रारी केल्या होत्या. त्यामध्ये दलित वस्ती सुधारणा निधी अंतर्गत दलित वस्ती मधील अंदाजे ३०० चौरस फुटाचा गट्टूचा रस्ता अति अरुंद झाला असून या रस्त्यावरुन एका वेळेस एकच गाडी जावू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कहर म्हणजे जूना खराब झालेला सिमेंटचा रस्ता पूर्णतः उकरुन त्यावर गट्टू अंथरण्याऐवजी, आहे त्याच स्थितीत रस्त्यावर गट्टू अंथरण्यात आल्यामुळे रस्ता उंच झाला आहे. हा उंच रस्ता वयोवृध्द व लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यातच  रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्याही न भरल्यामुळे सर्व गट्टू खिळखिळे झाले आहेत तर काही तुटली आहे, असे निदर्शनास आणून दिले होते. त्याचबरोबर स्थानिक आमदारांच्या निधीतून अंदाजे १० लक्ष रुपयांचा २०० चौरस फुट सिमेंटचा रस्ता करण्यात आला असून तोही अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला आहे. काही दिवसातच या रस्त्यावरची गिट्टी उघडी पडत आहे. याही रस्त्याच्या बाजूच्या साईडपट्ट्या भरण्यात आल्या नसल्यामुळे हा रस्ता बाजूने पूर्णतः खचला आहे, अशी तक्रार रणखांब यांनी केली होती.

             या तक्रारीची दखल घेत संबंधित कामाची चौकशी करुन गुत्तेदारावर गुन्हा दाखल करणे गरजेचे असतांना संबंधित विभागाकडून गुत्तेदाराला पाठीशी घालण्यात येत असून भ्रष्ट व्यवस्थेची पाठराखण करण्यात येत आहे, असे नमूद करीत या बाबीचा निषेध करण्यासाठीच लाल सेनेच्या वतीने गुरुवार 30 मे रोजी सकाळी ११.०० वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या