🌟धैर्यवान अन् बलशाली समाजच बलवान राष्ट्र निर्मितीस कारणीभूत ठरणार....!


🌟परभणीत नितीन गडकरी प्रतिष्ठानतर्फे आयोजित व्याख्यानात ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांचे प्रतिपादन🌟


परभणी : धैर्यवान अन् बलशाली समाजच बलवान राष्ट्र निर्मितीस कारणीभूत ठरणार आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले वसमत रस्त्यावरील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ना.नितीन गडकरी प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार दि.२८ मे २०२४ रोजी सायंकाळी आयोजित केलेल्या व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश देशमुख हे अध्यक्षस्थानी होते. शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा राज्य कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य तथा आयोजक प्रविण देशमुख हे व्यासपीठावर विराजमान होते.


        ‘विकसित भारत’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. निरगुडकर यांनी सद्यस्थितीवर अत्यंत परखडपणे मते व्यक्त केली. यथा राजा तथा प्रजा हे सूत्र आता राहिलेले नाही, तर यथा प्रजा तथा राजा हे लोकशाहीचे वैशिष्ट्य ठरले आहे, असे ते म्हणाले. समाज व्यवस्थेत ठेकेदारीची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, अशी खंत व्यक्त करतेवेळी स्वतःवरच्या जबाबदार्‍या पध्दतशीरपणे झटकण्याचे काम प्रत्येकामार्फत दिवसेंदिवस सुरु आहे. ते एवढे की, राज्य व देश चालविण्याकरीता सुध्दा ठेकेदारी दिल्याचा आव समाज आणतो आहे. त्यातून स्वतःची जबाबदारी समाज पध्दतशीरपणे टाळतो आहे. समाजाचे हे वर्तन पूर्णतः चुकीचे आहे. समाज दिवसेंदिवस अलिप्तवादी भूमिका घेतो आहे. त्यातून अनेक प्रश्‍न उद्भवत आहेत, चिघळत आहेत. समाजातील या फोफावलेल्या वृत्तीमुळे प्रशासक वा राज्यकर्त्यांना जाब विचारण्याचेसुध्दा भान समाजव्यवस्थेस राहिले नाही. त्यामुळेच प्रशासन असो, राज्यकर्ते निरंकुश बनत आहेत, असे ते म्हणाले. समाजाने अलिप्तवादी पणाचे धोरण सोडले पाहिजे, सक्रियता वाढवली पाहिजे, समाजाभिमुख विषयांमध्ये लक्ष केंद्रीत केले पाहिजे, वेळप्रसंगी रोखठोक भूमिका घेतल्या पाहिजेत, जाब विचारला पाहिजे, तरच  सुधारणेकडे आपण वाटचाल करु, आमूलाग्र असा बदल करु, असा विश्‍वास व्यक्त करतेवेळी निरगुडकर यांनी प्रशासन असो सत्तेवर समाजाचा अंकुश असलाच पाहिजे, समाजाने सिंहासारखे वागले पाहिजे, असे आवाहन केले.


           आज समाजात संघ भावना राहिली नाही, अशी खंत व्यक्त करतेवेळी डॉ. निरगुडकर यांनी प्रत्येकजन माझे कुटूंब व त्याचा वैयक्तिक विकास या गोष्टीवरच लक्ष केंद्रीत करतो आहे. त्याचा परिणाम सांघिक भावना ढासळली आहे. आज समष्टी विकासाऐवजी वैयक्तिक विकासाकडेच वाटचाल सुरु आहे, हे चित्र बदलले पाहिजे, संघ भावना वाढीस लागावी यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली विकसित राष्ट्राची संकल्पना विकसित समाजाशिवाय कदापिही शक्य नाही, असे स्पष्ट करतेवेळी डॉ. निरगुडकर यांनी सत्तेतून विकास होण्यापेक्षापेक्षा समाज जागृतीतून राष्ट्राची सुधारणा हीच शाश्‍वत सुधारणा आहे, असे म्हटले. जपान, जर्मनी, इंग्लंड आदी देश याचे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले. देशावर सत्ता कोणाची यापेक्षा त्या देशातील नागरीक किती उद्यमशील व राष्ट्रभक्त आहेत, यावर त्या देशाची उन्नती ठरते, नागरीकांच्या प्रत्येक कृतीतून राष्ट्रहीताची भावना जोपासली जाणे त्यासाठी महत्वाचे ठरते, असे नमूद करतेवेळी  भारतासोबत स्वतंत्र झालेल्या इतर राष्ट्रांच्या तूलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशातील लोकशाही व्यवस्था सुरुवातीपासूनच प्रगल्भ राहिली. त्या लोकशाही व्यवस्थेमुळेच नजीकच्या काळात देशाची विकसित राष्ट्राकडील वाटचाल वेगाने व दमदारपणे होत आहे, हे मान्य करावेच लागेल, असेही ते म्हणाले.

           राष्ट्रीय शिक्षण धोरणात इतिहासकालीन अनेक गोष्टी तथ्यांशाने न शिकविता विपरित इतिहास शिकविला गेला. त्यामुळे देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे ‘विना खड्ग विना ढाल’ न मिळालेले असून थोर स्वातंत्र्यसैनिकांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. व ते मिळालेले स्वातंत्र्य जोरकसपणे राखून जागतिक व्यापारामध्ये भारताचे स्थान पुन्हा वाढविण्याची जबाबदारी येणार्‍या पिढीवर आहे, असेही ते म्हणाले.आपल्या भाषणातून डॉ. निरगुडकर यांनी गडकरी या व्यक्तीमत्वाचे मुक्तकंठाने कौतूक केले. गडकरी हे दृष्ट्ये नेते आहेत. लोकाभिमुख आणि विकासाभिमुख भूमिका सदैव बाळगत आले आहेत. गडकरींचा आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव राहिला आहे. विशेषतः परदेशाऐवजी देशातच अन्य अन्य क्षेत्रात काम करावं, असा गडकरी यांच्या प्रेरणेनेच आपण परदेशातील मोठ्या संधी सोडून  देशातच वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे, जिद्दीने, चिकाटीने संशोधनासह दुरगामी विकास कामात योगदान देवू शकतो, असे ते म्हणाले.

           आपल्या अध्यक्षीय भाषणातून माजी आमदार देशमुख यांनी गडकरी ही सात अक्षरांची जादू आहे, असे स्पष्ट करतेवेळी पदांची झूल पांघरुन माणसे मोठी होतात, जे पदाला मोठे करतात ते गडकरी असतात. उद्यमशीलता हा गडकरींचा स्वभाव आहे. पर्यावरण रक्षण, विषमतेला विरोध हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले आहे. एक दिलदार व अजातशत्रू असं व्यक्तीमत्व म्हणजे गडकरी होय, असे नमूद केले दरम्यान, प्रमुख वक्ते डॉ. निरगुडकर यांचे प्रविण देशमुख यांनी तर अध्यक्ष माजी आमदार देशमुख यांचे मल्हारीकांत देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्‍या 100 विद्यार्थ्यांना हभप माधवराव आजेगावकर यांच्याहस्ते पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी शंकर आजेगांवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर उपेंद्र दुधगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. प्रदिप मारमवार यांनी आभार मानले. यावेळी संयोजक प्रविण देशमुख, मल्हारीकांत देशमुख, संतोष धारासूरकर, श्रीधर देशमुख, रितेश जैन, संजय ठकारे, अरविंद पानपट्टे, शंकर आजेगावकर आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या