🌟पावसाळ्याच्या काळात संपर्क, संवाद साधून योग्य समन्वय ठेवा - निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे


🌟एकबुर्जी प्रकल्पावर दिले मान्सुनपूर्व प्रशिक्षणाचे धडे : वाशिम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा पुढाकार🌟


फुलचंद भगत

वाशिम : पावसाळ्यातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांनी आपापसात योग्य समन्वय ठेवून संपर्क, संवाद ठेवावे जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत आपत्तीमध्ये हानी होणार नाही हे बघावे. असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले. वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पावर आज २८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिमच्या वतीने एक दिवशीय मान्सूनपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री . घुगे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आधिकारी शाहू भगत, नायब तहसीलदार श्री. नप्ते, कारंजा ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रविण खंडारे, अग्नीशमन अधिकारी अक्षय तिरपुडे, पोलिस उपनिरीक्षक श्री झुंगे, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक अनिल वाघ, अशांत कोकाटे, आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे दीपक सदाफळे व श्याम सवाई, गजानन मेसरे यांची उपस्थिती होती.

       आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.भगत यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, वृत्तपत्रात नेहमी वाचतो, अतिवृष्टी झाली, पुर आला, वीज पडली, भूकंप झाला त्यातून नुकसान झाले. अलीकडे हवामान बदलामुळे विविध आपत्तींचा आपल्याला सामना करावा लागत आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन केले जात असल्याचे सांगितले. स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडा निश्चित करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास सादर करावा. कोणतीही आपत्ती सांगून येत नसते. त्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे प्रशिक्षक श्री.वाघ यांनी आपत्ती निवारण, प्रथमोपचार,पूर्वतयारी,सीपीआर आदींबाबत मार्गदर्शन केले श्री.नप्ते यांनी आपत्ती व्यवस्थापन निवारणासाठी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात.जिल्हा प्रशासनासोबत समन्वयाची भूमिका असते.‍कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता कार्य करतात हे वाखाणण्याजोगे कार्य असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

          प्रशिक्षक श्री. कोकाटे म्हणाले, आताच आपण कोरोना महामारीचा सामना केला. यामध्ये समुदाय संघटित करून निर्बंध घालून नियमावली लावली. या महामारीपासून आरोग्याचे व्यवस्थापन केले. मानवी जीवनात येणाऱ्या मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करून त्याचे नियोजन व व्यवस्थापन केले जाते. अचानक आलेल्या आपत्तीचा सामना करतांना त्यावर प्रथमोपचार कसा केला पाहिजे. हार्ट अटॅक, रोड एक्सीडेंट, सर्पदंश, त्सुनामी, आग, वीज, एखादा व्यक्ती पुरात वाहून गेला, तलावात बुडाला, विहिरीमध्ये पडला असेल तर त्याला बाहेर कसे काढले पाहिजे आणि त्याला प्रथमोपचार कशा पद्धतीने दिला पाहिजे अशा अनेक मुद्यांवर यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.गावपातळीवर ग्रामपंचायतीच्या भिंती ह्या बोलक्या असाव्यात.प्रशासनावर अवलंबून न राहता प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारी ओळखून आपत्ती निवारणासाठी सज्ज राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले

          यावेळी श्री. कल्ले, श्री मेसरे व श्री. सवाई यांनी देखील आपत्तीविषयक विविध विषयावर मार्गदर्शन केले. श्री सवाई म्हणाले नदी,नाले,तलाव असणारीच गावे बाधीत होतील असे नाही. येणाऱ्या ९० दिवसांसाठी सज्ज राहुन आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांची अंमलबजावणी करावी श्री.सदाफळे व चमुंनी उपस्थितांना बोट प्रात्यक्षिक करून दाखविले श्री.खंडारे यांनी सायबर सेफ्टी बाबत मार्गदर्शन केले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने आयोजित केलेल्या या एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नदी काठावरील गावचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व पट्टीचे पोहणारे व्यक्ती यांचा सहभाग होता हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या मार्गदर्शनात व निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन उगले, विनोद मारवाडी,मारोती खंडारे, तौफिक बेनीवाले यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक गजानन उगले यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाची माहिती दिली.

          आपत्ती व्यवस्थापनाचा उद्देश स्थानिक लोकांमध्ये आपत्तीशी सुनियोजित लढा देण्याची संस्कृती निर्माण करणे. आपत्ती पूर्व नियोजन हा संस्कृतीचा एक भाग आहे, हे स्थानिकांच्या मनात बिंबवणे. आपत्ती तयारीचा स्तर उंचावणे. धोका व वाईट परिस्थितीचे योग्य विश्लेषण करून आपत्ती प्रसंगातील जीवित व वित्त हानी कमीत कमी स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न करणे. उपलब्ध संसाधनांची जाणीव करुन देणे. प्रशासन व गाव यामध्ये समन्वय साधून गाव प्रशासनास मजबूती प्राप्त करुण देणे हा आहे. प्रशिक्षणादरम्यान आपत्ती निवारण माहिती पत्राचे वाटप यावेळी करण्यात आले. संचालन व उपस्थितांचे आभार श्री भगत यांनी मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या