🌟वाशिम जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांना प्रथम प्राधान्य द्या : दिरंगाई निदर्शनास आल्यास कारवाई....!


🌟मानसूनपूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचे निर्देश🌟

फुलचंद भगत

वाशिम :- आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांना सर्व विभागांनी प्रथम प्राधान्य देणे अपेक्षित असून यासंदर्भात कोणत्याही प्रकारची दिरंगाई निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी आज जिल्हधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत दिल्या. या आढावा सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,राजेंद्र जाधव,  कैलास देवरे, सर्व तहसीलदार व जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते.तसेच यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राम लंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यातील धोकादायक इमारती व भिंती शोधुन त्या पाडाव्यात,होर्डिंग स्ट्रकचर सुस्थितीत असल्याचे नगर प्रशासनाने अहवाल सादर करावे,पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वचछ करून पाणी पुरवठा करणे तसेच ग्रामीण भागातील प्रकल्प, बंधारे, रस्ते आणि पुल हे सुस्थितीत असल्याचे सुनिश्चित करुन तसे लेखी कळविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचित केले. विशेष करुन शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारती व्यवस्थित असल्याची शिक्षण विभागाने खात्री करावी. खाजगी शाळांकडून शाळा व परिसर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र घेण्याबाबतही शिक्षण विभागाने कार्यवाही करण्याचे आदेशित केले.

      मान्सून पूर्व तयारी म्हणून काय उपाय योजना व काय खबरदारी घ्यावी तसेच संभाव्य धोके निवारण करण्यासाठी काय काम केले आहे. केलेल्या कामाचा आणि सर्व विभागाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडयाचा मुद्दे निहाय आढावा घेत जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व विभागाचे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावे. सदर कक्ष २४ तास सुरू राहील याची दक्षता घ्यावी. याकरिता कर्मचारी यांची नियुक्ती करुन सर्व विभागाचे दूरध्वनी क्रमांक सुरू आहे किंवा नाही याची खात्री करावी. सदर दूरध्वनी क्रमांक नागरीकांमध्ये प्रसिद्ध करण्यात यावे.तसेच आपल्याकडे असलेले आपत्ती व्यवस्थापन साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करा.जिल्हा, तालुका व गावस्तरावरील सर्व कामे तातडीने गावातील व शहरातील नाल्या,नाले साफ सफाई, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, पुल, वाकलेले इलेक्ट्रिक पोल, तार, धोकादायक वाळलेली झाडे झुडपे काढणे, धोकादायक इमारती, शाळा, घरे, वेशी, पुल, रस्ते, धरण, गाव तलाव, पाझर तलाव, नाला खोलीकरण ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी.असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, की सर्व तहसील कार्यालयात तालुका स्तरावरील शोध व बचाव पथक गठित करण्यात यावे.नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे व उष्मालाट बाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांतर्गत माहिती पत्रक तयार केले आहे याबाबत गावात व शहरात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. तसेच जिल्हा पुरवठा विभाग व आरोग्य विभाग यांनी नदीकाठच्या गावांना पुरेशा प्रमाणात अन्न धान्य साठा व औषध साठा ठेवण्यात यावा.पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्भवल्यास नदी काठच्या गावांना दुसरे पर्यायी मार्ग आहे किंवा नाही याची तातडीने पाहणी करावी. शासकीय कार्यालय, इमारती, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालये इमारती मध्ये पाणी गळत असेल तर तातडीने दुरुस्ती करून घेण्यात यावी. पोलीस पथके, आरोग्य पथके, विज वितरण कंपनीचे पथके, अग्निशमन दलाचे पथके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथके, तहसील कार्यालयाचे पथके, कृषी विभागाचे पथके, परिवहन विभागाचे पथके, पंचायत विभागाचे, शिक्षण विभागाचे पथके, नगर परिषदचे पथके, पाणी पुरवठा विभागाचे पथके २४ तास मदत व सहकार्य करण्यासाठी तैनात राहतील याची दक्षता घ्यावी.असेही जिल्हाधिकारी यांनी आदेश संबंधित यंत्रणेला यावेळी दिले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या