🌟परभणी ते परळी रेल्वे लोहमार्गाच्या दुहेरीकरणासाठी जमीन अधिग्रहणाची रेल्वे प्रशासनाने निश्‍चित रूपरेखा स्पष्ट करावी....!


🌟शिवसेना (उबाठा) आमदार डॉ.राहुल पाटील यांची मागणी : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची घेतली भेट🌟


परभणी (दि.24 मे 2024) : परभणी ते परळी वैजनाथ रेल्वे लोहमार्ग दुहेरीकरणा करीता जमीन अधिग्रहणाची निश्‍चित रूपरेखा स्पष्ट करून संभाव्य प्रकल्पग्रस्त लोकांचा सामाजिक प्रभाव मूल्यांकन करावा अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन केली आहे.


           परभणी ते परळी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणार असल्याने रेल्वे मंत्रालयाने वर्तमानपत्रांमध्ये अधिसूचना प्रकाशित केली आहे. या अधिसूचनेनुसार शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील सर्वे नंबर 508 व 510 मधील मूळ मालकांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, त्यामुळे सध्या वास्तव्यात असणार्‍या नागरिकांमध्ये विस्थापित होण्याच्या भीतीने अस्वस्थता निर्माण झाली आहे. मागील 50 ते 60 वर्षापासून येथे राहत असलेले नागरिक वास्तव्यास आहेत, त्यामुळे या नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम होणार असल्याने आमदार राहुल पाटील यांनी शुक्रवारी (दि. 24) जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्याद्वारे, सदर सर्वे क्रमांकावरील जागांची तत्कालीन शासन नियमानुसार कालांतराने विक्री खरेदी व्यवहार करण्यात येऊन आज घडीला निवासी उद्देशाने तिथे मोठ्या कालावधीपासून वास्तव्य आहे. या वास्तव्यात असणार्‍या रहिवाशांच्या आर्थिक तथा सामाजिक ऐपतीनुसार बहुसंख्य वास्तव्यास असणार्‍या रहिवाशांना ताबा असणार्‍या जमिनीचे मालकी कागदपत्रे परिपक्व आहेत तर अनेकांकडे कागदपत्र नाहीत. त्यामुळे सर्वे नंबर 508 मधील गुंठेवारी नियमित करून पी आर कार्डला नोंद घ्यावी व अधिसूचनेनुसार नमूद सर्वे क्रमांकावरील रेल्वेद्वारे भविष्यात प्रत्यक्षात अधिग्रहित होणार्‍या क्षेत्रफळाचे स्वरूप स्पष्ट करून प्रकल्पाचा जमिनीवरील आणि तिथे राहणार्‍या लोकांच्या जीवनावर होणार्‍या परिणामाची सामाजिक प्रभाव मूल्यांकन पद्धतीनुसार कार्यवाही करण्यात यावी व या बाबींचा गांभीर्याने विचार करुन तोडगा काढावा, अशी मागणी आ. पाटील यांनी या निवेदनात केली आहे.


एक इंचही जागा जाऊ देणार नाही...

        शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील साखला प्लॉट, आनंद नगर, ज्ञानेश्‍वर नगर या भागातील रहिवाशांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे आहोत, एक इंचही जागा रेल्वे दुहेरीकरणासाठी जाऊ देणार नाही, अशी भूमिका आमदार डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या