🌟आमची परभणी फाऊंडेशनच्या स्वच्छता अभियानात ‘प्लास्टिक’चा मोठा अडथळा.....!🌟जिल्हा प्रशासनाकडे केली तक्रार : महानगर पालिकेकडून अपेक्षा व्यक्त🌟


परभणी : ‘आपली परभणी, स्वच्छ परभणी’ हे अभियान राबविणार्‍या आमची परभणी फाऊंडेशनच्या सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे स्वच्छता अभियानात प्लास्टिकच्या कॅरीबॅगसह अन्य वस्तू मोठा अडथळा ठरत असल्याची खंत व्यक्त केली.
              गेल्या चाळीस आठवड्यापासून ‘आपली परभणी, स्वच्छ परभणी’ हा उपक्रम मोठ्या जिद्दीने, चिकाटीने राबविणार्‍या आमची परभणी फाऊंडेशनच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची मंगळवार दि.२८ मे २०२४ रोजी भेट घेतली. त्यातून गेल्या चाळीस आठवड्यापासून विविध सार्वजनिक ठिकाणे, चौक, रस्ते, सरकारी कार्यालये, दवाखाने, उद्याने व अन्य परिसरात लोकसहभागातून स्वच्छतेचे उपक्रम राबवित आहेत. या काळात या अभियानात सिंगल युज प्लास्टिक बॅगांचाच मोठा प्रमाणावर होणारा वापर अडथळा ठरतो आहे, असे या सदस्यांनी नमूद केले. प्लास्टिकच्या कॅरीबॅगसह अन्य वस्तूंचा वापर कमी व्हावा किंवा बंद व्हावा यासाठी काही पाऊले उचलता येतील का? या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने, महानगरपालिका प्रशासनाने पाऊले उचलावीत, असा आग्रह करीत परभणी शहराच्या स्वच्छ आणि उज्ज्वल भविष्यासाठी हे सहकार्य क्रमप्राप्त आणि गरजेचे आहे, असे म्हटले.
           शहरवासीयांनीसुध्दा प्लास्टिकच्या कॅरीबॅगसह अन्य वस्तूंचा दैनंदिन जीवनातील वापर पूर्णतः बंद करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करतेवेळी या सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवितांना कचरा गोळा करणार्‍या गाड्यांमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येवू लागल्या आहेत, अशीही खंत व्यक्त केली व महानगरपालिका प्रशासनास कचरा गाड्यांच्या नियमित  फेर्‍या होतील, या दृष्टीने निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. पावसाळ्याच्या तोंडावर छोट्या मोठ्या नाल्या, गटारे तुंबू नयेत यासाठी मान्सूनपूर्व साफसफाईची कामे युध्दपातळीवर करावी व त्यातून संभाव्य रोगराई टाळावी, अशीही अपेक्षा या सदस्यांनी व्यक्त केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या