🌟परभणी शहरातील नाल्यांची मान्सून पूर्व तात्काळ सफाई करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश....!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे मनपा आयुक्तांना आदेश🌟


परभणी - मान्सून अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपलेला असतानाही परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मुख्य नाल्याची व गटारांची मान्सून पूर्व नालेसफाई करण्यात आली नाही. नियमाप्रमाणे ही नालेसफाई एप्रिल महिन्यातच पूर्ण करणे अपेक्षित असताना ही परभणी शहर महानगरपालिका प्रशासन मात्र नालेसफाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.


मनपा प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी करूनही मनपा प्रशासन शहरातील मान्सून पूर्व नालेसफाईकडे दुर्लक्ष करत आहे करिता मनपा प्रशासनाला तात्काळ मान्सून पूर्व नालेसफाई करण्याबाबत सूचना द्यावी याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार निवेदनाद्वारे करण्यात आली होती. शहरातील मान्सूनपूर्व नालेसफाई न झाल्याने पावसाळ्यात जर नाल्यात पाणी तुंबल्याने शहरात आपत्ती निर्माण झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी परभणी मनपा आयुक्त तथा मनपा प्रशासन यांच्यावर राहील असेही या निवेदनात म्हटले होते.


या तक्रारीची तात्काळ दखल घेत परभणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी श्री. रघुनाथ गावडे यांनी परभणी शहरातील मुख्य नाले व शहरातील इतर गटारांची तात्काळ मान्सून पूर्व नालेसफाई करून केलेल्या नालेसफाईचा अहवाल तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडे सादर करावा असा आदेश  परभणी मनपा आयुक्तांना दिला आहे. सोबतच जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी मागील महिन्यात झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशाची आठवण ही या पत्राद्वारे मनपा आयुक्ताना करून दिली.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतरही परभणी मनपा प्रशासनाने मान्सूनपूर्व नालेसफाई न केल्यास शहरातील नाल्यांचा गाळ काढून मनपा कार्यालयात आणून टाकण्याच्या भूमिकेवर प्रहार जनशक्ती पक्ष ठाम आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, तालुका प्रमुख उद्धव गरुड, रामेश्वर पुरी, शेख बशीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या