🌟व्यक्तीवर प्रारंभिक शिक्षणाचा प्रभाव जीवनभर कायम राहतो - डॉ. प्रशांत पेशकार


🌟असे प्रतिपादन असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.प्रशांत पेशकार यांनी केले🌟

नांदेड,- विद्यापीठाच्या माध्यामातून शेवटच्या टप्प्यातील उच्च शिक्षण देण्यात येते. तरीही याला शेवटचा टप्पा म्हणता येणार नाही. त्यानंतरही व्यक्तीचे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण जीवन असेपर्यंत अविरतपणे होतच असते. मात्र या सर्वांमध्ये जीवनभर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर ज्याचा प्रभाव कायम राहतो ते प्रारंभिक शिक्षण आहे. या सुरुवातीच्या प्रारंभिक आणि प्राथमिक शिक्षणाचा खोल प्रभाव व्यक्तीवर पडत असल्याने त्याला अनन्य साधारण महत्व आहे असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. प्रशांत पेशकार यांनी केले. विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थानच्या वतीने नांदेड येथे देवगिरी प्रांताच्या आचार्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन डॉ. पेशकार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर विदर्भ आणि देवगिरी प्रांताचे विद्याभारतीचे संघटन मंत्री तथा 1997 पासून पूर्णवेळ प्रचारक असलेले शैलेश जोशी, विद्याभारती देवगिरी प्रांताचे अध्यक्ष विवेकजी काटदरे, विद्याभारतीचे नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. देवदत्त देशपांडे यांची उपस्थिती होती.

डॉ. प्रशांत पेशकार पुढे म्हणाले की, लौकिक अर्थाने पदवी मिळवण्यापुरते शिक्षण विद्यापीठांमधून होत असले तरी खर्‍या अर्थाने गर्भापासूनच व्यक्तीच्या शिक्षण आणि संस्काराचा प्रारंभ होतो हे आता विज्ञानानेही मान्य केले आहे. प्रारंभिक शिक्षण हे महत्वाचे ठरते; ते सहसा विसरत नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी 2020) तिसर्‍या वर्षापासूनच शैक्षणिक सुरुवातीला महत्व दिले आहे. संपूर्ण जगातील शिक्षण प्रवाह आणि शिक्षण पध्दती याचा मागोवा घेत शिक्षण हे भारत केंद्रीत झाले पाहिजे यावर एनईपीने भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.देवगिरी प्रांत आणि विदर्भ प्रांताचे विद्याभारतीचे संघटन मंत्री शैलेश श्रीराम जोशी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, विद्याभारतीने शिक्षणाची रचना तयार केली आहे. शिक्षणातले विविध प्रवाह याचा अभ्यास करुन प्रयोगजन्य शिक्षण, हसत खेळत शिक्षण, कसे शिकवले पाहिजे याची पध्दत विद्याभारतीने विकसित केली आहे.विष्णुपुरी नांदेड येथील इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल,सहयोग कॅम्पस येथे हे आचार्य प्रशिक्षण वर्ग 2मे ते 12 मे 2024 दरम्यान होणार आहेत. 2 मे रोजी सकाळी 9 वाजता या वर्गाचे उद्घाटन संपन्न झाले. बालकांच्या समग्र विकासात जीवनाचा घनिष्ठ अनुभव, संस्कार, चरित्र निर्माण, क्षमतांचा विकास घडवून आणण्यासाठी शिक्षकांना (आचार्य) प्रशिक्षित करण्यासाठी विद्याभारती गेल्या 22 वर्षांपासून अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करते. शिक्षक, प्राधानाचार्य असे मिळून 145 प्रशिक्षणार्थी आचार्य या वर्गात सहभागी झाले आहेत. त्यापैकी महिला आचार्यांची संख्या शंभरपेक्षा जास्त आहे. निवास व भोजनव्यवस्थेसह पूर्णवेळ स्वरुपाचे हे वर्ग सुरु आहेत. विद्याभारती देवगिरी प्रांत सहमंत्री दिनेश देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या