🌟परभणी जिल्ह्यातील जिंतूर-सेलू तालुक्यातील शेतकरी व नागरिकांचे प्रलंबित प्रश्‍न तात्काळ मार्गी लावा....!


🌟माजी आमदार विजय भांबळे यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : आंदोलनाचा इशारा

परभणी (दि.29 मे 2024) - परभणी जिल्ह्यातील जिंतूर-सेलू तालुक्यात सन 2018 पासून असलेल्या अतिवृष्टी,सततचा पाऊस, पीकविमा, दुष्काळ या शेतकर्‍यांच्या व नागरिकांच्या प्रलंबित प्रश्‍नाच्या संदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंतूर-सेलू च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी आमदार विजय भांबळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

             जिंतूर- सेलू तालुक्यात मागील वर्षी दि.26 नोव्हेंबर 2023 यादिवशी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमध्ये शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते.  तसेच खरीपातील पिके तूर, कापूस, हरभरा, गहू, ज्वारी, फळबागा ई. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले होते. अतिवृष्टीमध्ये बाधित सर्व शेतकर्‍यांना तात्काळ मदत मंजूर करून वाटप करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच सन 2022 मध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे होणार्‍या नुकसान भरपाईसाठी प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये प्रमाणे देण्याबाबत शासन निर्णय झालेला होता. परंतु, झालेल्या नुकसानीपोटी शासनाने प्रति हेक्टरी 6 हजार 800 रुपये प्रमाणे मदत दिलेली आहे. ती संपूर्ण देण्यात यावी व जिंतूर तालुक्यात अतिवृष्टीने व सततच्या पावसाने सरसकट 100 टक्के नुकसान झालेले असताना शासन काही मंडळातील मोजक्याच गावामध्ये अनुदान देत आहे त्यासाठी सरसकट नुकसान असल्याने सर्वांना अनुदान देण्यात यावे. तसेच मागील तीन वर्षापासून शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात पिकविमा भरून देखील शासनाने ऑनलाईन तक्रार करण्याची जाचक अट घातल्याने अशिक्षित शेतकरी बांधव पिकविमापासून वंचित राहिलेले आहेत. शासनाच्या पंचनामे व झालेले नुकसान बघता जिंतूर-सेलू तालुक्यात सर्व शेतकर्‍यांना सरसकट पिकविमा मंजूर करून तो तात्काळ वितरीत करण्यात यावा. दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकर्‍यांना पिक पेरणीसाठी 7 जून पूर्वी पिककर्ज तातडीने पुरवठा करण्यासाठी संबंधित बँकांना आपल्या स्तरावरून आदेश देण्यात यावेत.  जिंतूर-सेलू तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या विविध मागण्या तात्काळ मान्य करून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन  प्रश्‍न सोडवण्यात यावेत यासह अन्य मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

         दरम्यान, यावेळी प्रसादराव बुधवंत, विश्‍वनाथ राठोड, अशोकराव काकडे, आप्पासाहेब डख, गणेशराव इलग, विजय खिस्ते, प्रकाशराव मुळे, सुधाकर रोकडे, नंदकिशोर अंभूरे, राजेभाऊ खिस्ते, विशाल देशमुख, कैलास मोगल, कल्याण जोगदंड, सुरेश राउत, राहुल घुले  इत्यादीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या