🌟परभणी जिल्ह्यातील पाणी टंचाईसदृश परिस्थिती पाहता लोअर दुधनेतून ५३४६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या प्रयत्नांना यश🌟

परभणी (दि.२३ मे २०२४) : लोअर दुधना सिंचन प्रकल्पातून दुधना नदीच्या पात्रात आज गुरुवार दि.२३ मे २०२४ रोजी दुपारपर्यंत ५३४६ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

            जिल्ह्यात सर्वत्र पाणी टंचाईसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांबरोबर संपर्क साधून लोअर दुधना प्रकल्पांतर्गत नदी काठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्याबाबत विनंती केली. त्याप्रमाणे जलसंपदा विभागाने तातडीने निर्णय घेवून बुधवारी दुपारी ०३.३० वाजेच्या सुमारास ०६ दरवाजे ०.५० मीटरने उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु केला. गुरुवारी दुपारपर्यंत दुधना नदीपात्रात ५३४६ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर या धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले.

            दरम्यान, या जलाशयात १०२ दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा उपलब्ध आहे. यातून सेलू आणि मंठा या भागातील नागरीकांना जूलै अखेरपर्यंत पाणी पुरवठा होवू शकतो. दरम्यान, परतूर तालुक्यातील दहा ते बारा गावातील ग्रामस्थांनी या प्रकल्पातून पाणी न सोडण्या संदर्भात अभियंत्यांना विनंती केली. वेळप्रसंगी घेरावही घातला होता. परंतु सेलू येथील महसूल प्रशासनाने प्रकल्पाच्या अभियंत्यांना व संबंधित गावच्या शेतकर्‍यांशी संपर्क साधून पाणी सोडावेच लागेल, मृत साठ्यातील पाण्यावर कुठल्याही शेतकर्‍यांचा अथवा प्रकल्पग्रस्तांचा अधिकार नाही. सरकार, प्रशासन गरज असल्यास या मृत साठ्यातून देखील इतर शेतकरी व पशूधनाला पाणी टंचाईच्या निवारणार्थ पाण्याचा विसर्ग करु शकतो, हे निदर्शनास आणून दिले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या