🌟रिसोड तालुक्यातील जोगेश्वरी या गावांतर्गत सरकारी विहिरीवरून पाण्याची चोरी....!


🌟जोगेश्वरी येथुन दोन मोटारी सह साहित्य जप्त ; सीईओ वैभव वाघमारे यांची कारवाई🌟


फुलचंद भगत

वाशिम :- रिसोड तालुक्यातील जोगेश्वरी या गावांतर्गत सरकारी विहिरीतून पाण्याची चोरी करणाऱ्यांच्या मोटारीसह इतर साहित्य जप्त करण्याची कारवाई जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांनी बुधवार दि.१५ मे २०२४ रोजी केली.

जल जीवन मिशन अंतर्गत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने रिसोड तालुक्यातील जोगेश्वरी (तपोवन) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी भेट दिली. या गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन विहिरीचे ठिकाण निश्चित करण्याबाबतच्या तक्रानिमित्त सीईओ यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान जोगेश्वरी येथील जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत तयार करण्यात आलेल्या जुन्या विहिरीची पाहणी यावेळी करण्यात आली. पाहणी दरम्यान सदर सरकारी विहिरी मधून मोठ्या प्रमाणात विनापरवाना पाण्याची चोरी होत असल्याची बाब सीईओ वाघमारे यांच्या निदर्शनास आली. या बाबीची गंभीर दखल घेऊन त्यांनी सर्वांसमक्ष सदर विहिरी मधून 2 मोटारी आणि इतर साहित्य जप्त करून ग्रामपंचायतच्या हवाली केले. यामध्ये 2 मोटार पंप, केबल, पाईप इत्यादी साहित्याचा समावेश होता. यावेळी सीईओ वाघमारे यांनी गावातील शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. जिल्हा परिषद शाळा परिसरात सुरू असलेल्या वर्ग खोलीचे बांधकामाचे पाहणी केली तसेच घरकुलाच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे, तपोवन चे सरपंच दीपक वाळूकर, ग्रामसेवक विलास शिंदे, पोलीस पाटील दिलीप वाळूकर, सहायक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक उपविभागीय अभियंता यांची उपस्थिती होती.

 “जोगेश्वरी येथील सरकारी विहिरी मधून पाण्याची चोरी होत असल्याची घटना गंभीर असून या कारवाई वरून इतरांनी बोध घ्यावा. यापुढे असा प्रकार आढळल्यास केवळ जप्तीवर न थांबता संबंधितावर पोलीस केस दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी.” 

-वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी.

जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी सरकारी विहिर अथवा सरकारी तलावांमधून अवैध पाणी उपसा करण्यात येत असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश सीईओ वाघमारे यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना दिले.

* निकृष्ट दर्जाचे बांधकाम पाडण्याचे निर्दश : जे.ई.ला कारणे दाखवा नोटीस ; ठेकेदाराला दंड :-

मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी जोगेश्वरी येथील शाळेला भेट दिली. शाळेच्या परिसरात वर्ग खोलीचे बांधकाम सुरू होते. सदर बांधकामाची पाहणी केली असता ते निकृष्ट दर्जाचे आढळून आले. तिथे उपस्थित इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीने आपल्या हाताने बांधकामाचा कॉलम अलगद उकरल्याने या कामातील फोलपणा उघडकीस आला. सीईओ वाघमारे यांनी निकृष्ट बांधण्यात आलेले कॉलम पाडून नव्याने बांधकाम करण्याचे निर्देश दिले. निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे संबंधित इंजिनीयर राम आदमने (जे.ई.) यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे तसेच संबंधित ठेकेदार नितीन केनवडकर यांना कामाच्या रकमेच्या १० टक्के एवढा दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले. या घटनेची गंभीर दखल इतर ठेकेदार व इंजिनियर यांनी घ्यावी आणि इस्टिमेट मध्ये दिलेल्या मानांकनानुसार दर्जेदार काम करावे असे  जाहिर आवाहन सीईओ वाघमारे यांनी केले.

प्रतिनीधी :- फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या