🌟आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य समन्वय राखत जबाबदारी पार पाडा - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती मान्सूनपूर्व आढावा बैठक🌟


परभणी (दि.09 मे 2024) : आगामी पावसाळ्यात प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये सतर्क राहावे. जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा महापुरासारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी सांघिक वृत्तीने योग्य समन्वय राखून जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. 

यावेळी पोलीस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उप विभागीय अधिकारी जिवराज डापकर, दत्तु शेवाळे, श्रीमती संगीता चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजाराम माने, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील सर्व विभागांनी सांघिक भूमिकेतून योग्य समन्वय राखत आपापली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी. या काळात विभागप्रमुखाने जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे निर्देश देत, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी आपापल्या स्तरावर तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या संयुक्त आढावा बैठका दि. 13 मेपर्यंत घेऊन तसा अहवाल 16 मेपर्यंत उपविभागीय अधिका-यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. 

जिल्ह्यात नदी काठावर 118 गावे आहेत. पावसाळ्यात जिल्ह्यातून वाहणा-या नदी काठावरील या गावांना संभाव्य महापुराबाबत सतर्क करणे, क्षेत्रीय अधिका-यांना वेळोवेळी संदेश देण्याची जबाबदारी संबंधित गावातील समितीवर सोपविण्यात यावी. त्यांच्या संपर्क क्रमांकाची यादी तयार करून ती जिल्हा मुख्यालयाला कळविण्यात यावी. आपत्ती काळात तात्काळ मदत व बचाव कार्य करण्यासाठी जिल्हा स्तरावर 24 तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात 02452-223702, 226400 हे कार्यान्वित असून, 1077 हा निशुल्क क्रमांकही सुरु करण्यात आला आहे. याच धर्तीवर सर्व विभागांनी सुरु करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करावेत. विभागप्रमुखाने 24 तास हा कक्ष कार्यरत राहील, याबाबत दक्ष राहावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी दिले. 

अतिवृष्टी व पुराचा गावाला वेढा पडतो. त्यामुळे पोलीस पाटील, तलाठी यांचा गावनिहाय संपूर्ण पत्ता यादी तयार करावी. पर्जन्यमापक यंत्रे नादुरुस्त असल्यास ती यंत्रे तात्काळ दुरुस्त करून घ्या. जिल्ह्यात 52 महसुली मंडळे असून, नवीन मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत असल्याची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी खात्री करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क आणि वाहतूक व्यवस्था या बाबी महत्वाच्या आहेत. त्यामुळे तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरील आपत्कालीन कक्षांनी संपर्कात राहावे. ग्रामीण भागातील पूराची स्थिती हाताळण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी सजग व्हावे. पूरपरिस्थितीबाबत कोतवाल आणि पोलिस पाटील यांच्याकडून दवंडी देण्यात यावी. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी तालुकास्तरावर अंतर्गत बैठक घेण्यात यावी. तसेच प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा समिती स्थापन करण्यात यावी. या समितीशी आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता येईल. अतिवृष्टीच्या काळात वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. पुराच्या काळात नागरिकांना स्थलांतरीत करण्याची आवश्यकता भासल्यास निवारा केंद्राच्या ठिकाणी आरोग्यविषयक तसेच इतरही सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच मान्सूनपूर्व काळात या सर्व साहित्याबाबत सर्व तहसीलदारांनी मॉक ड्रिल घेत साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश दिले.  

पूर परिस्थितीमध्ये पावसाच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यात यावे. त्यासाठी आंतरजिल्हा समन्वय ठेवण्यात यावा. नागरिकांना मदत करण्यासाठी आवश्यक साहित्य, लाईफ सेफगार्ड जॅकेट, बोटी, पुराच्या काळात जीवितहानी वाचविण्यासाठी आवश्यक दोरखंड उपलब्ध करावेत. पुराच्या काळात सार्वजनिक उद्घोषणेची व्यवस्था करण्यात यावी. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील वाळलेली झाडे उन्मळून पडून घरे, वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी झाडे तोडण्यात यावी. धरण क्षेत्रात पाऊस जादा झाल्यास पाणी सोडण्यात येते. याची माहिती बाधित क्षेत्रातील नागरिकांना देण्यात यावी. पाणी सोडल्यामुळे शेती आणि घरांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले. 

यावेळी जिल्हा प्रशासनातील पशुसंवर्धन, अन्न व औषध प्रशासन, कृषि हवामानतज्ज्ञ, पाटबंधारे विभाग, महावितरण, आरोग्य विभाग, राष्ट्रीय महामार्ग, मनपा, नगर पालिका, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदि सर्व विभागाचे अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या