🌟नैसर्गिक आपदा विशेष : निसर्गाचा प्रकोप: माणसाची उडवताहे झोप.....!


🌟चक्रीवादळ हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे🌟

माणसाच्या उपद्व्यापाला निसर्ग आता पूरता कंटाळला आहे. जगाच्या पाठीवर माणसाचे पाप भारी झाले. त्यामुळे निसर्ग आदमुसून गेला  आणि तो आता खडबडून मोकळा श्वास घेऊ पाहातोय. माणसाने चालवलेले उपद्रव त्याला नकोसे वाटू लागले आहेत. म्हणून तो कड फेरत- कुस बदलत आहे, असे ग्रामीण बुजूर्ग  लोक चावडीवर एकत्र बसून चर्चा करताना दिसत आहेत. नैसर्गिक आपदांवर भाष्य करणारा श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा सदर लेख अभ्यासा... संपादक.

       चक्रीवादळ हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये होणाऱ्याला हरिकेन आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला टायफून या नावाने ओळखले जाते. सर्वसाधारणपणे चक्रीवादळाचा पुढे सरकण्याचा वेग ताशी २० किलोमीटरपेक्षा बराच कमी असतो. चक्रीवादळाची तीव्रता या प्रकारांनी मोजण्यात येते- ● वातावरणशास्त्र- क्लायमॅटॉलॉजी, ● सामान्य सरासरीचे अवलोकन, ● उपग्रहाची मदत घेऊन, ● रडार वापरून. चक्रीवादळाचे नामकरण- 

सध्या चक्रीवादळाला नाव देण्याची पद्धत आहे. हवामानतज्ज्ञ व त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना संवाद करण्यास सोपे जावे, म्हणून त्याचे नामकरण करतात. या पद्धतीचे जनक ऑस्ट्रेलियातील हवामानतज्ज्ञ आहेत. ● ते आपल्याला न आवडणाऱ्या राजकारणी लोकांचे नाव देत असत. ● अमेरिकन सैनिक आपल्या पत्नीचे किंवा मैत्रिणीचे नाव देत असत. ● १९७९मध्ये जागतिक हवामान संघटनेने स्त्री पुरुषांची प्रचलित नावे देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यासाठी एक यादीच बनविली होती. ● सन २०००पासून एका वेगळ्या पद्धतीने नावे देण्यात येतात. निसर्गाशी संबंधीत, खाद्यपदार्थांची ती नावे आहेत. जेथे चक्रीवादळे येतात, त्या देशांची यादीही तयार करण्यात आलेली आहे. साधारणतः सहा वर्षांनी या यादीतील नावे वापरणे प्रथमपासून सुरू करतात.

         माणसाच्या उपद्व्यापाला निसर्ग आता पूरता कंटाळला आहे. जगाच्या पाठीवर माणसाचे पाप भारी झाले. त्यामुळे निसर्ग आदमुसून गेला  आणि तो आता खडबडून मोकळा श्वास घेऊ पाहातोय. माणसाने चालवलेले उपद्रव त्याला नकोसे वाटू लागले आहेत. म्हणून तो कड फेरत- कुस बदलत आहे, असे ग्रामीण बुजूर्ग  लोक चावडीवर एकत्र बसून चर्चा करताना दिसत आहेत. कारण यंदा जगभरातच उष्णतेने उच्चांक गाठलेला असल्याच्या बातम्या पेपरात धडकत आहेत. मागील आठवड्यात मेक्सिको देशात उष्माघाताच्या तडाख्याने कहरच केला म्हणे. झाडावर बसलेली माकडे  पाडाची आंबे पडावी तशी एकापाठोपाठ एक खाली मरून पडली. बर्‍याच ठिकाणी माणसंसुद्धा उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे दगावल्याचे ऐकिवात आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात तर रानटी श्वापदांचा धुडगूस- धुमाकूळ सुरूच आहे, तो कायम बंद होण्याचं नावच घेत नाही. वाघ, सिंह, अस्वल, कोल्हे मानवमात्राच्या रक्ताचे घोट घेऊन जीवितहानी करताहेत. तर महाकाय हत्तींचा कळप शेतशिवार आणि घरेदारे तुडवून धूळधाण करत ते मातीमोल करताहेत. राखणीविना शेतातील उभ्या पिकांची नासाडी झालेले दृश्य उघड्या डोळ्यांनी निमूटपणे बघावे लागते, त्यांना हाकलण्यास जावे तर ते माणसावर चवताळून येतात. माणसाला आदळून, आपटून आणि कुचलून ठार मारतात. हे शेतकऱ्यांचे किती म्हणावे दुर्दैव!

           असह्य उष्णतेने बेजार माणूस पहाटेच्या मंद मंद गार हवेने साखरझोपेत असताना भूस्खलनाच्या  एका नव्याच संकटाट सापडतो. काही हाक ना बोंब करताच तो कायमचा झोपतो आणि सोयऱ्या- धायऱ्याविणाच त्याची मूठमाती होते.  असेच एका देशातील टेकडीच्या पायथ्याच्या वसलेल्या खेड्यात घडले आहे. पहाटे लोक गाढ झोपलेले असतांना टेकडी गावावर कोसळली आणि शेकडो जण दबून मृत्यूमुखी पडली तर बाकी सारे जखमी होऊन उपचार घेत आहेत. तर गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आदी विदर्भातील जिल्ह्यांना चक्रीवादळाच्या तांडवाचा आणि अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. घरदार, पीक यांची अतोनात हानी झाली आहे. जनजीवनात विस्कळीत झाले. निसर्गाच्या अनिश्चिततेसमोर मानवी सामर्थ्य कधीच टिकाव धरू शकत नाही. अशातच महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांवर चक्रीवादळाची सावली पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या जीवनावर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. राज्यात एकीकडे तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना विदर्भात सलग आठवडाभर पावसाची हजेरी लागताना दिसत आहे. पुढील तीन दिवसही विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह ३०-४० किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे केवळ शेतकरी समाजालाच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवस राज्यावर मुसळधार पावसाची सावली पसरण्याची शक्यता आहे. म्हणूनच बर्‍याच लोकांच्या ओठांतून किंचाळी उमटत आहे, "अरंऽऽऽ... देवा! तुझ्या मनात हाय तरी कायरं? काय होईल कोण जाणे ?"

            हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. या चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांच्या किनारपट्टी प्रदेशांत मोठ्या हवामान बदलाची शक्यता आहे. ताशी ७० किलोमीटर वेगाने हे वादळ किनारपट्टी प्रदेशांना धडकणार असल्याने, या भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास, येत्या दोन ते तीन दिवसांत या वादळाचा काहीप्रमाणात परिणाम राज्यावर होण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात राज्यात ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे. पिकांच्या नुकसानीबरोबरच घरेदेखील उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांचे पिके भुईसपाट झाली असून त्यांच्यासमोर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील विविध ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून, अनेक गावे वाहून गेली आहेत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शासनाने बचाव कार्य हाती घेतले असून, विविध भागांतून नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात येत आहे. शासनाने सर्वतोपरी नागरीकांना मदत करावी, असे सुचवावेसे वाटते.

!! नागरिकानो, सावधान! स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि दक्ष वागा !!

                                                - एक शेतकरीपुत्र -

                     श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                     रामनगर वॉर्ड, गडचिरोली, जि. गडचिरोली.

                     फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या