🌟यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी स्थगितीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल....!


🌟समनक जनता पार्टीचे उमेदवार प्रा.डॉ.अनिल राठोड न्यायालयात🌟

फुलचंद भगत

वाशिम :- यवतमाळ - वाशिम लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष बुथनिहाय झालेल्या मतदानाच्या आकडेवारीमध्ये फरक निघाल्यामुळे मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीस तूर्तास स्थगिती देण्यासाठी  समनक जनता पार्टी चे उमेदवार प्रा. डॉ. अनिल राठोड यांनी दि. 30 मे रोजी नागपूर येथे उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. 

                यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात दि.  26 एप्रिल रोजी मतदान पार पडले. हे मतदान 12  लाख वीस हजार 189 आणि टक्केवारी 62.87 टक्के झाल्याची आकडेवारी  यवतमाळ जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी  निवडणूक आयोगाला कळविली होती. याबाबत समनक जनता पार्टीच्या वतीने  बूथनिहाय मतदान यादी मागविण्यात आली होती. या माहिती नुसार मिळालेली आकडेवारी आणि जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या आकडेवारी मध्ये 25 मते जास्त भरल्याचे आढळून आले. यामध्ये राळेगाव विधानसभा  मतदार संघात 20 मते तर वाशिम विधानसभा मतदारसंघात पाच मते जास्त भरल्याचे दिसून आले. या गंभीर प्रकाराची तक्रार उमेदवार प्रा. डॉ. अनिल राठोड यांनी दि. 29 मे रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली. तसेच जोपर्यंत मताची आकडेवारी निश्चित होत नाही तोपर्यंत  मोजणी प्रक्रिया थांबवावी. तसेच फार्म 17 सी नुसार बूथनिहाय आकडेवारी जाहीर करावी. या मागणीसाठी  उच्च न्यायालयात धाव घेतली. वाशिम येथील ज्येष्ठ विधिज्ञ  आणि संविधान तज्ञ  ऍड. डॉ. मोहन एस.  गवई यांच्यामार्फत गुरुवारी नागपूर येथील उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे. या दाखल याचिकेवरील सुनावणी दि. 31 मे रोजी होणार आहे. याबाबत उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे यवतमाळ वाशिम मतदार संघातील जनतेचे लक्ष लागले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या