🌟आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिन-१७ मे विशेष : आज प्रिय व्यक्तिहूनही अतिप्रिय मोबाइल....!


🌟संगणकाच्या आगमनाबरोबर दूरसंचार व माहिती तंत्रज्ञानाची प्रगती अफाट वेगाने होऊ लागली🌟

 जागतिक दूरसंचार दिन म्हणून दरवर्षी हा दिवस संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. इ.स.१८६५ साली आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना करण्यात आली होती. दूरसंचारचे महत्व तसेच त्याची जागरूकता पसरविण्यासाठी दरवर्षी १७ मेला जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्यात येतो. दूरसंचाराच्या क्रांतीमुळे आज विश्वभर खुप मोठ्या प्रमाणात बद्दल घडून आले आहेत. दूर असलेल्या व्यक्ती सोबत संपर्क करणे शक्य झाले आहे. पृथ्वीवर घडलेला हा एक अविस्मरणीय बदलच म्हणावा लागेल. अशी रोचक माहिती श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या शब्दांतून वाचा... संपादक.

    मानवाने बुद्धीच्या जोरावर विविध शोध लावून विस्मयकारक प्रगती केली. आज त्याची प्रचिती आपणा सर्वांना येतच आहे. यातील महत्त्वपूर्ण म्हणजे इंटरनेट, संगणक व मोबाईल यांचा शोध होय. हे शोध लागण्यापूर्वीही म्हणजेच राजे रजवाड्यांच्या युगातही संदेशवहन होत होते. मात्र त्या संदेशवहनात बराच वेळ वाया जात असे. मात्र एकोणीसाव्या शतकापासून मानवाने दळणवळणाच्या साधनांमध्ये अनेक आश्चर्यकारक शोध लावले. त्यामुळे मानवाची अधिक वेगाने कल्पनातीत प्रगती होऊ लागली. टेलिफोनच्या शोधाने संदेशवहनाचे अवघड काम सोपे झाले. याचे सर्व श्रेय अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांना जाते. ध्वनीची कंपने विद्युतप्रवाहाच्या सहाय्याने तारेतून पाठवता येणे शक्य आहे, असे लक्षात येताच बेल यांनी प्रयत्नांती टेलिफोनचे पहिले ओबडधोबड यंत्र बनवले. जगभरातील दूरसंचार क्षेत्रात नियमन करण्यासाठी दि.१७ मे १८६५ रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेची- इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनची स्थापना झाली. त्या दिवसाचे औचित्य साधून सन १९७३पासून १७ मे हा दिवस जगभर दूरसंचार दिन म्हणून साजरा होत आहे. पुढे संगणकाच्या आगमनाबरोबर दूरसंचार व माहिती तंत्रज्ञानाची प्रगती अफाट वेगाने होऊ लागली. कालांतराने संगणकाला इंटरनेटची जोड मिळून सर्व संगणक दूरध्वनीच्या माध्यमातून एकमेकांशी जोडल्याने संगणकाचे जाळे तयार झाले. या महाजालामुळेच एका गणकयंत्रावर टाईप केलेला संदेश दुसर्‍या गणकयंत्रावर दिसू लागला. अशाप्रकारे संगणक, इंटरनेट व दूरध्वनी- मोबाइलच्या शोधाने जग जवळ आले. या निमित्ताने नव्या संकल्पनांची देवाणघेवाण, राष्ट्रीय संकल्पनेवरील वादविवाद, चर्चा आदी कार्यक्रम राबविण्यात येतात. परिणामी बिनतारी संपर्क दिन व माहितीच्या पतपेढीचा दिवस हे दोन्ही एकत्रित साजरे होऊ लागले. आज विकसित तंत्रज्ञानामुळे केवळ संवादापुरते मर्यादित असलेल्या दूरध्वनीचा इतर व्यवहारोपयोगी कामांसाठीही उपयोग होऊ लागला. दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीच्या सहाय्याने त्वरीत संपर्क साधणे शक्य झाले आहे.


  सन १८८०मध्ये ओरिएंटल टेलिफोन कंपनी लिमिटेड आणि अँग्लो-इंडियन टेलिफोन कंपनी लिमिटेड यांनी भारतात टेलिफोन एक्सचेंजची स्थापना करण्यास भारत सरकारशी संपर्क साधला. टेलिफोन स्थापित करणे ही सरकारची मक्तेदारी आहे व सरकारच हे काम सुरू करेल, या कारणावरून ही परवानगी नाकारली गेली. पुढे सरकारने आपल्या निर्णयाच्या विरोधात जाऊन इंग्लंडच्या ओरिएंटल कंपनी लिमिटेडला कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि अहमदाबाद यांत टेलिफोन एक्सचेंज सुरु करण्याचे लायसेंस देण्यात आले. सन १८८१मध्ये देशात पहिली औपचारिक टेलिफोन स्थापन झाली. २८ जानेवारी हा दिवस भारताच्या टेलिफोन इतिहासात रेड लेटर डे आहे. या दिवशी भारतीय परिषदेचे तत्कालीन गव्हर्नर जनरल मेजर ई.बेरिंग यांनी कोलकाता, चेन्नई व मुंबई येथे टेलिफोन एक्सचेंज सुरू करण्याची घोषणा केली. कोलकाता एक्सचेंजला सेंट्रल एक्सचेंज असे नाव देण्यात आले. या सेंट्रल एक्सचेंजचे सुमारे ९३ ग्राहक होते. मुंबईत देखील एक वर्षात अशाच एका टेलिफोन एक्सचेंजचे उद्घाटन करण्यात आले. सद्या दूरसंचारचा महत्त्वाचा एक भाग इंटरनेट आहे. ज्यामुळे मानवी जीवनाला सुरेख कलाटणी मिळाली आहे. इंटरनेटने आपले आयुष्य बदलून टाकले आहे. कोणतीही सूचना आपण काही सेकंदातच मिळवून घेतो. इंटरनेट हे सोशल नेटवर्किंग पासून ते स्टॉक  एक्सचेंज, बँकिंग, ई-शॉपिंग इत्यादीसाठी महत्त्वाचे आहे. याचे सर्व श्रेय गुगलसारख्या सर्च इंजिनला जाते. गुगलमुळे हजारो किलोमीटर दूर असलेली व्यक्ती चॅटिंग, व्हिडीओ, व्हॉइस चॅटिंग यांद्वारे काही सेकंदातच जवळ आलेली जाणवते. हे अंतर आता खुप कमी झाले आहे. ज्याप्रकारे इंटरनेटने आपले जीवन सहज केले; तर आव्हानही समोर उभे ठाकले आहे. आज इंटरनेटवरील काम कमी मात्र त्याचा गैरवापर अधिक होत आहे. पोर्नोग्राफीसारख्या समस्या इंटरनेटच्या प्रत्येक भागात पोहोचल्या आहेत. सायबर गुन्हेगारी तर वाढतच आहे. या सर्व नकारात्मक गोष्टी असूनही आज भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांत टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञान समृद्धीसाठी उपयुक्त ठरत आहे. याक्षेत्रातील सतत होणाऱ्या विकासाचा परिणाम म्हणून अनेक तरुण चांगल्या करिअरचे स्वप्न घेऊन पुढे येत आहेत.

     वर्ल्ड टेलिकॉम डे किंवा जागतिक दूरसंचार दिन दरवर्षी १७ मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आधुनिक युगात फोन, मोबाइल, इंटरनेट ही माणसाची पहिली गरज बनली आहे. याशिवाय जीवनाची कल्पना करणे अवघड आहे. वैयक्तिक ते व्यावसायिक जीवनापर्यंत याचे महत्त्व खुप आहे. पूर्वी लोकांना एकमेकांशी संपर्क साधण्यास खुप संघर्ष करावा लागत असे. आज इंटरनेट, मोबाइल यांमुळे हे सहज शक्य झाले. आपण काही सेकंदातच आपले मित्र, कुटुंबिय, नातेवाईक यांच्याशी सहज बोलू शकतो, त्यांना बघू देखील शकतो. हे सारे दूरसंचार क्रांतीमुळे शक्य झाले. यामुळेच भारताची गणना विकसनशील देशांमध्ये केली जाऊ लागली. त्याबरोबरच भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढतेय. त्यासह नोव्हेंबर २००६ साली तुर्कीमध्ये पूर्ण झालेल्या परिषदेत जागतिक दूरसंचार, माहिती व सोसायटी हे तिनही एकत्रितपणे साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी केवळ महत्त्वाच्या कामासाठीच दूरध्वनीचा वापर होत असे. आता मात्र स्वस्त कॉल रेटमुळे त्वरीत संपर्क केला जातो, मग काम महत्त्वाचे असो वा नसो.  दूरसंचार माध्यमांमुळे एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीच्या खुपच जवळ आली, ही माध्यमे मानवाची नितांत गरजच नव्हे तर गळ्यातील ताईत बनली आहेत. प्रिय व्यक्ती तासनतास दूर असली तरी काही वाटणार नाही. मात्र आज मोबाइल आपल्यापासून क्षणभरही दूर असलेले चालत नाही. परिणामी केवळ शहरी नागरिकांपर्यंत मर्यादित राहिलेला मोबाइल आज देशातील ग्रामीण जनतेच्या हातातही सर्रासपणे आढळतो. इंटरनेटच्या ४जी, ५जीपर्यंत वाढलेल्या वेगाने आर्थिक-बँकिंग व्यवहार, आरोग्य सेवा-सुविधा एका क्लिकवर मिळविणे सोपे झाले आहे. दूरसंचार क्षेत्रातील प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली व खर्चही वाढला. असे असले तरी दूरसंचार क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा दूरगामी परिणाम दिसतो, तशाच आज मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत असल्याच्याही घटना समोर येत आहेत. यालाच थोडक्यात सायबर क्राईम असे म्हणतात. सायबर क्राईम रोखण्यास दूरसंचार क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आपण जबाबदारीने करायला हवा. आजच्या दूरसंचार दिनी याचेही भान आपण ठेवले पाहिजे. ही दूरसंचार क्रांती आज कामाचा वेग वाढविण्यास तसेच एका व्यक्तीचा दुसर्‍या व्यक्तीशी त्वरीत संपर्क होण्यास महत्त्वाचा दुवा ठरली आहे.

!! आंतरराष्ट्रीय दूरसंचार दिनाच्या सर्वांना प्रेरणादायी हार्दिक शुभेच्छा !!

                     - संकलन व सुलेखन -

                       श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                       (भारताच्या वैभवशाली इतिहास-अस्मितेचे गाढे अभ्यासक.)

                       मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.

                      जि. गडचिरोली, फक्त व्हॉ. नं. ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या