🌟राळेगाव वाशिम विधानसभेतील मतांच्या आकडेवारीत घोळ ?


🌟यवतमाळ जिल्हाधिकारी तसेच निवडणूक आयोगाकडे दि.28 मे रोजी तक्रार दाखल केली आहे🌟

फुलचंद भगत

वाशीम :- यवतमाळ - वाशिम लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीत आणि राळेगाव, वाशिम विधानसभेच्या बुथनिहाय यादीत तब्बल 25 मतांची वाढ दाखविण्यात आली आहे.  या गंभीर प्रकाराची यवतमाळ जिल्हाधिकारी तसेच निवडणूक आयोगाकडे दि. 28 मे रोजी तक्रार दाखल केली आहे. याबाबत समनक जनता पार्टी चे यवतमाळ जिल्हा प्रवक्ते भिमराव राठोड यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयाकडे दि.  27 मे 2024 रोजी अर्ज करून लोकसभेतील सहाही विधानसभेची बुथनिहाय यादीची प्रत मागीतली होती. 

जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरुवातीला ही यादी देण्यास नकार दिला मात्र या बुथनिहाय यादीची प्रत पाहिजेच या मागणीवर राठोड अडून बसले असता निवडणूक उपजिल्हाधिकारी उंबरकर यांनी निवडणूक नायब तहसीलदार यांच्या स्वाक्षरीनिशी 90 पानांची यादी पुरविली. या यादीचे अवलोकन राठोड यांनी केले असता राळेगाव विधानसभा मतदार संघात लोकसभेसाठी झालेल्या बुथनिहाय मतदान यादीत 20 आणि वाशिम विधानसभा मतदारसंघात 5 अशी एकूण 25 मतांची वाढ दाखविल्याचे प्रकर्षाने दिसून आले. या गंभीर बाबीची राठोड यांनी त्याच क्षणी  जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार करून येत्या 4 जून रोजी होणारी मतमोजणी थांबविण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी गोरसेना सुद्धा आक्रमक झाली असून त्यांनी सुध्दा तहसीलदार दारव्हा यांचे तर्फे जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे मतमोजणी थांबविण्याची एकमुखी मागणी केली आहे. या प्रसंगी समनक जनता पार्टीचे प्रवक्ते भीमराव राठोड, गोरसेना जिल्हाध्यक्ष किशोर पालतीया,जिल्हा सचिव अमोल ईसळावत, तालुकाध्यक्ष राजेश राठोड, तालुका सचिव दीपक जाधव, निलेश राठोड, गोर गावणीया कुंडलिक महाराज उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या