🌟राष्ट्रीय शिष्टाचार दिवस विशेष : भ्रष्टाचाराचे दुष्टचक्र खूपच दुर्दैवी....!


🌟समाजातील सभ्यतापूर्ण व्यक्तिवर्तनाची प्रथा वा संकेत म्हणजे शालिनता-शिष्टाचार होय🌟

शिष्टाचारांच्या माध्यमातून समाजातील वरिष्ठ व कनिष्ठ यांच्यातील परस्परसंबंधांना समाजमान्यता व पुष्टी प्राप्त होते. त्याचप्रमाणे समाजातील वेगवेगळ्या स्तरांमधील सामाजिक अंतर टिकून राहते. शिष्टाचारांचे स्वरूप कृत्रिम भासत असले, तरी त्यांचा सामाजिक आशय महत्त्वाचा असतो. ज्या व्यवहारांमध्ये शिस्त व औपचारिकतेची निकड असते, तेथे शिष्टाचारांचे पालन काटेकोरपणे करण्यात येते. उदा. सैनिकी दलांत शिष्टाचार काटेकोरपणाने पाळण्याची गरज असते. उद्बोधक असा श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा सदर संकलित लेख... संपादक.

         समाजातील सभ्यतापूर्ण व्यक्तिवर्तनाची प्रथा वा संकेत म्हणजे शालिनता- शिष्टाचार होय, असे सामान्यपणे म्हणता येईल. प्रत्येक समाजात शिष्टाचार आढळतो. मात्र प्रत्येक समाजातील शिष्टाचाराचे स्वरूप स्वतंत्र असते. समाजातील शिष्टजन-एलीट्स यांचा जो वर्ग असतो, त्याचे वर्तन किंवा आचार समाजातील इतर वर्गांना अनुकरणीय वाटतात. शिष्टाचाराच्या कल्पनेत असा एक अर्थ आहेच. एकाच समाजातील स्त्री-पुरुषांच्या विविध प्रकारच्या गटांत व्यावसायिक वर्गात किंवा इतर प्रकारच्या समूहातही विशिष्ट प्रकारचे शिष्टाचार रूढ असतात. समाजशास्त्रीय दृष्टीने व्यक्तीचे सामाजिक वर्तन किंवा आचार नियंत्रित करण्याचे शिष्टाचार हे एक साधन असते. किंग्जली डेव्हिस या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाच्या अभिप्रायानुसार शिष्टाचार हे विशिष्ट प्रकारचे लोकाचार होत. त्यांना सखोल अर्थ नसला, तरी सामाजिक संबंधांचे स्वरूप सुखावह व शिस्तबद्ध व्हावे, म्हणून त्यांचे पालन करण्यात येते. शिष्टाचार पाळण्याबाबत प्रत्येक व्यक्तीवर तिची जात, जमात, वर्ग, व्यवसाय इत्यादींचे दडपण असते. शिष्टाचार शिकणे व त्यांचे पालन करणे, या प्रक्रियांमुळे प्रत्येक व्यक्तीचा दर्जा, भूमिका व प्रतिष्ठा यांबाबतचे महत्त्वपूर्ण संकेत स्पष्ट होतात. शिष्टाचारांचे उल्लंघन केल्यास समाजाचा रोष व टीका ओढवून घेण्याचा धोका व बहिष्कृत होण्याची भीती असते. समाजातील श्रेणीव्यवस्थाही शिष्टाचारांतून सूचित होते. शिष्टाचारांमुळे व्यक्तीला विशिष्ट समूहातील सदस्य असल्याची जाणीव होऊन तिची अस्मिता जागृत होते.

      राष्ट्रीय दिन दिनदर्शिका- नॅशनल डे कॅलेंडरमधील रजिस्ट्रारने दरवर्षी १४ मे रोजी राष्ट्रीय शालीनता दिन अर्थात राष्ट्रीय शिष्टाचार दिन घोषित केला आहे. शिष्टाचारांच्या माध्यमातून समाजातील वरिष्ठ व कनिष्ठ यांच्यातील परस्परसंबंधांना समाजमान्यता व पुष्टी प्राप्त होते. त्याचप्रमाणे समाजातील वेगवेगळ्या स्तरांमधील सामाजिक अंतर टिकून राहते. शिष्टाचारांचे स्वरूप कृत्रिम भासत असले, तरी त्यांचा सामाजिक आशय महत्त्वाचा असतो. ज्या व्यवहारांमध्ये शिस्त व औपचारिकतेची निकड असते, तेथे शिष्टाचारांचे पालन काटेकोरपणे करण्यात येते. उदा. सैनिकी दलांत शिष्टाचार काटेकोरपणाने पाळण्याची गरज असते.

         मध्ययुगीन यूरोपीय समाजामध्ये शिष्टाचारांचे स्तोम माजले होते. एमिली पोस्ट या प्रतिष्ठित घराण्यातील स्त्रीने सामाजिक आंतरसंबंधांमध्ये परस्परांचा आदर केला जावा, यासाठी कोणते शिष्टाचार अंगी बाणवावे, असे सांगितले आहे. भारतीय समाजातील विविध वर्ग, जाती, जमाती, धार्मिक संप्रदाय व पंथ यांच्या वर्तनांवर कठोर बंधने होती. विशेषतः स्त्री व पुरुषांमधील परस्परसंबंधांचे शिष्टाचार पाळणे अत्यावश्यक समजले जाई. उच्चवर्गीय स्त्रियांच्या बाबतीत निर्बंध अधिक कडक असत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सामाजिक परिवर्तनाला गती लाभून वर्ग, जात, जमात यांमधील पारंपरिक अंतर कमी झाले. प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा मान ठेवून व अधिकारांची जाणीव राखून कसे वर्तन करावे, याबद्दल माणसाने नेहमी जागरूक असले पाहिजे. विसाव्या शतकातच राजकारण, धर्म व लष्करांसारखी क्षेत्रे सोडता, सर्वसामान्य व्यक्तीवरील सर्वच पारंपरिक वर्तनप्रकारांची दडपणे हळूहळू कमी होत गेली. आधुनिक समाजात व्यक्तिस्वातंत्र्य, वैयक्तिक हक्क, सामाजिक समता व न्याय यांसारख्या मूल्यांना महत्त्व प्राप्त झाले. लोकशाही समाजात वर्तनपद्धती कालबाह्य होत गेल्या. परंपरागत शिष्टाचारांचा प्रभावही कमी होत गेला. अर्थात नवे शिष्टाचारही याबरोबरच रूढ होत आहेत, हेही खरे. त्यातून व्यक्तीच्या सामाजिक व्यवहारातील वर्तनासंबंधीचे काही प्रतीकात्मक संदर्भ टिकून राहिले आहेत.

          भारतात आपण पिळवणूकीच्या अर्थकारणात बांधलो गेलो आहोत, तेथून जेव्हा सर्वांची सुटका होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र होईल. पिळवणुकीचे अर्थकारण राज्यकर्त्यांपासून सुरु होते. पोलिस, आयकर, अबकारी, कर, सीमाशुल्क आदी विभागात ठराविक जागी बदली होण्यासाठी लाखॊ रूपयांची राज्यकर्त्यांना लाच दिली जाते. जो पोलिस अधिकारी अथवा आयकर आधिकारी एवढा खर्च करतो, त्याला त्याची वसुली करायची असते. त्यातूनच भ्रष्टाचाराचा उगम होतो. समाजाच्या वरच्या मजल्यावरून सुरू झालेला भ्रष्टाचार हळूहळू खाली पसरतो. जेव्हा सामान्य नागरिकांचा सरकारी यंत्रणेशी संबंध येतो तेव्हा प्रत्येक कागदासाठी त्याला किंमत मोजावी लागते. शाळा, इस्पितळे, व्यापार, अशा जीवनावश्यक सेवांमध्येही नागरिकांची पिळवणूक होते. हे अगदी योग्य शब्दांत भारतातील भ्रष्टाचाराचे विश्लेषण आहे. पिळवणुकीचे अर्थकारण राज्यकर्त्यांपासून सुरु होते, हे त्यांचे वक्तव्य अचूक आहे. आज  निवडणुकांत आचारसंहिता लागू असूनही, मी निवडून आलो पाहिजे म्हणून उमेदवार मतदारांना पैशांच्या रूपात लाच देत आहेत, कपडेलत्ते, अन्नधान्याचे मोफत वाटप करीत आहेत. सध्या राज्यातच नव्हे तर अवघ्या देशात गाजत असलेला आदर्श इमारतीचा घोटाळा याचे मूर्तीमंत उदाहरण ठरावे. एक आजी, दोन माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री असे कितीतरी राजकीय नेते या घॊटाळ्यात अडकले आहेत. जर मंत्री एवढे खोलवर रुतले असतील तर सनदी अधिकारी व इतर वेगवेगळ्या प्रशासकीय विभागाचे कितीतरी अधिकारी अडकले असतील. राष्ट्र वा राज्य चालविणारे प्रतिनिधी जर भ्रष्टाचारी निघाले तर अधिकारी वर्ग मागे कसा राहील? हे दुष्टचक्र खूपच दुर्दैवी आहे. जणू भ्रष्टाचारच हा शिष्टाचार झाला आहे, असे वाटते; नाही का?

!! राष्ट्रीय शिष्टाचार दिनाच्या सर्व भावाबहिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

                      - संकलन व सुलेखन -

                    श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                    द्वारा- श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिराजवळ, 

                   रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                   फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या