🌟मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा अन्वयार्थ लावून गायरानधारकांना हूसकावून लावण्याचे षडयंत्र....!

🌟समाजवादी जन परिषदेच्या नेतृत्वाखाली ३१ मे रोजी गायरानधारकांचे ‘जेलभरो’ आंदोलन🌟

परभणी (दि.२४ मे २०२४) : मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा अन्वयार्थ लावून गायरानधारकांना हूसकावून लावण्याचे षडयंत्र शासनाने रचले आहे याचा विरोध करण्यासाठी परभणी येथे शुक्रवार दि.३१ मे २०२४ रोजी गायरान धारकांद्वारे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

            येथील समाजवादी जन परिषदेच्या कार्यालयात आज कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जमीन अधिकार लढ्यातील सक्रिय कार्यकर्ते सुनील नेमाने होते. बैठकीत गंभीर चर्चा करून जिल्ह्यातील गायरानधारकांनी आपले गायरान वाचवण्यासाठी संघर्ष करणे गरजेचे असून त्यासाठी ३१ मे रोजी जेलभरो आंदोलन करण्याचे नियोजन ठरले आहे. झालेल्या बैठकीला विश्‍वनाथ गवारे, आप्पाराव मोरताटे, बायजाबाई घोडे, मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष पप्पूराज शेळके, गणेश जोगदंड, रमेश नितनवरे, अशोक अग्रवाल, मोहन गुंडले, भीमराव गुंडले, सोपान गुंडले, तुकाराम गव्हाले, भिवाजी गुंडले, पंढरीनाथ आडे, निर्मला भालके, राजेश देवकते, लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिसे, कॉ. ज्ञानेश्‍वर मोरे, कॉ. उत्तम गोरे, कॉ. अशोक उबाळे आदी उपस्थित होते.

            दरम्यान, बैठक संपल्यानंतर या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन जेलभरोचे निवेदन दिले आहे. त्याद्वारे जिल्हाधिकारी गावडे यांनी परभणी जिल्ह्यातील सरकारी गायरान जमिनीवर झालेली अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी १२ मे २०२४ रोजी काढलेल्या आदेशाची दुरुस्ती करावी २०२४ पर्यंत भूमिहीन जनतेने घरासाठी आणि शेतीसाठी केलेले अतिक्रमण नियमानुकूल करावे अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या