🌟वाशिम तालुक्यातील किनखेडा ते सोयता रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक....!

 


🌟किनखेडा ते सोयता अदुरूस्त रस्त्यामुळे कुणाचे हातपाय मोडले तर कुणाचे डोके फुटले सातत्याने घडताय अपघात🌟 


फुलचंद भगत

वाशिम - तालुक्यातील ग्राम किनखेडा ते सोयता या ५ किलोमिटरच्या कच्च्या रस्त्याची भिषण दुर्दशा झाली असून गेल्या पाच वर्षापासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. पावसाळ्याच्या आधी सदर रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनात व तालुका संघटक तथा किनखेड्याचे तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ खुपसे यांच्या नेतृत्वात बुधवार, २९ मे रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून देण्यात आला आहे.

  निवेदनात नमुद आहे की, किनखेडा ते सोयता हा ५ किमी. चा कच्चा रस्ता वर्ष २०१८-१९ मध्ये तयार करण्यात आला होता. या रस्त्यावर वनविभागाची मालकी आहे. तसेच किनखेडा गावाला लागूनच थोडासा घाट रस्ता आहे. तेथेही वनविभागाची जमीन आहे. मात्र या रस्त्याच्या दुर्दशेमुळे शेतकर्‍यांना आपला माल घेवून जाता येत नाही. हा घाटरस्ता वनविभागाने होवू दिला नाही. खराब रस्त्यामुळे अनेक ग्रामस्थांचे हातपाय मोडले तर काहीजणांचे डोकेही फुटले. पुढे पावसाळ्यात तर या रस्त्यावरुन साधे चालताही येत नाही. त्यामुळे खरीप हंगामाची तयारी करणार्‍या शेतकरी व ग्रामस्थांचे हाल होत असून पावसाळ्यात वाहतूक व दळणवहन पुर्णपणे बंद होवू शकते. शेतकरी व ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेवून सदर रस्ता पावसाळ्याच्या आधी दुरुस्त करावा अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल असा इशारा खुपसे यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या