🌟परभणी जिल्ह्यातील पिक विम्यापासून वंचित शेतकर्‍यांना पिक विमा मिळणार.....!


🌟आमदार डॉ.राहुल पाटील यांची माहिती : पिक विमा कंपनी व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक🌟

परभणी (दि.१४ मे २०२४) :  परभणी जिल्ह्यातील खरीप रब्बी हंगाम व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आणि पीक विमा पासून वंचित राहिलेल्या सर्व लाभार्थी शेतकर्‍यांना लवकरच पिक विमा मिळणार आहे, अशी माहीती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.

           जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गत हंगामातील खरीप आणि रब्बीचा पिक विमा मिळाला नाही, तसेच पिक विमा कंपनीला उशिरा तक्रारी केल्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना खरीप रब्बी तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पिक विमा मिळावा यासाठी आमदार डॉ. पाटील यांनी १० मे रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. तातडीने पिक विमा देण्याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना आमदार पाटील यांनी केली होती. त्यानुसार मंगळवार १४ मे रोजी शिवाजीनगर येथील आमदार डॉ. पाटील यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला आमदार पाटील यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक अनिल गवळी, उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे, आयसीआयसीआय लोबार्ड विमा कंपनीचे राज्य प्रभारी शंतनु दास, जिल्हा व्यवस्थापक शशी भूषण, तंत्र अधिकारी मुकुंद खिस्ते,शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख संदीप भंडारी, अरविंद देशमुख, प्रभाकर जयस्वाल, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

           यावेळी पीक विमा वंचित शेतकरी संबंधी विषयावर मुद्देनिहाय चर्चा करण्यात आली. खरीप हंगामातील उशिरा तक्रारी संबंधित २० हजार ४४३ लाभार्थी आहेत तसेच पोस्ट हार्वेस्ट कापूस पिकासंबंधी ६ हजार ५०० तर तांत्रिक अडचणी बाबत  पाच हजार १२७ शेतकरी वंचित आहेत. यासह नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे यावेळी सूचित करण्यात आले. रब्बी हंगामामध्ये उशिरा तक्रारी दाखल केलेली ३५९४ तसेच खरीप हंगामात ३४८६ लाभार्थी वंचित आहेत, त्यांनाही पिक विमा तातडीने द्यावा, अशी सूचना आमदार पाटील यांनी यावेळी केली.

           यावर पीक विमा कंपनीचे राज्य प्रभारी शंतनु दास यांनी सर्व वंचित शेतकर्‍यांना पिक विमा देण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकर्‍यांना लवकरच पिक विमा मिळेल, अशी माहिती आमदार डॉ. पाटील यांनी या बैठकीनंतर दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या