🌟परभणी जिल्ह्यातील पशुपालकांनो,उष्णतेपासून करा पशुधनाचा बचाव....!


🌟आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे🌟

परभणी (दि. 07 मे 2024) : जिल्ह्यात सध्या तापमानात कमालीची वाढ होत असून, पशुपालकांनी आपल्या पशुधनाची उष्णतेपासून योग्य निगा राखत बचाव करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.  

उष्ण लहरी व उष्माघाताच्या विरीत परिणामांपासून बचावासाठी पशुधन व्यवस्थापनात स्थानिक हवामानाच्या अंदाजावर व दैनिक तापमानावर लक्ष ठेवावे. चारा व वैरण यांचा पुरेसा साठा ठेवावा. पशुखाद्य देताना पुरेसे क्षार व जीवनसत्व मिश्रणे द्यावीत. उत्पादक, दुभत्या पशुधनास संतुलित आहार द्यावा. त्यांच्या सायंकाळच्या दोहनाच्या वेळा टप्प्या टप्प्यात किमान एक तास उशीराने ठेवाव्यात. जेणे करून पशुधनापासून योग्य उत्पादन मिळेल. पशुधनासाठी आधुनिक गोठे असलेल्या पशुपालकांनी स्प्रिंकलरची सोय करावी. इतर पशुपालकांनी पशुधनावर पाणी मारणे, फवारणे किंवा म्हैस वर्गीय पशुधनासाठी शक्य असल्यास पाण्यात बसण्यासाठी स्वच्छ पाण्याच्या हौदाची सोय करावी. शेती, वहनाच्या व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या (शक्यतो दिवसा 12 ते 4 या वेळी किवा स्थानिक उन्हाच्या वेळानुसार) वेळी विश्रांती द्यावी. त्यांना सावलीत अथवा थंड व भरपूर खेळती हवा असलेल्या जागेत बांधावे. स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सोय असावी. पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ ठेवावीत.

शक्यतो पिण्याच्या पाण्याचे हौद अथवा इतर सुविधा गोठ्याजवळ व सावलीत असावी. नसल्यास अशा ठिकाणी सावलीसाठी शेड उभारण्याचा प्रयत्न करावा. जेणे करून पशुधनास थेट उन्हाचा संपर्क येणार नाही. अश्ववर्गीय पशुधनास उष्णलहरींपासून बचावासाठी पायाकडून शरीराच्या वरील भागास थंड पाण्याचा हळूवार शिडकावा करावा. गाभण पशुधनास पुरेसे पशुखाद्य व चारा, वैरण द्यावे. वराह प्रजातींच्या पशुधनास पुरेसा निवारा, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि शक्य असल्यास पाण्यात बसण्याची सोय असावी. कुक्कुट पक्षांसाठी वातानुकुलीत पक्षीगृह सर्वोत्तम असतात. तथापि ज्या पक्षीगृहांना अशी सोय नाही त्यांनी पक्षीगृहाच्या शेडवर गवताचे आच्छादन करावे. पक्षीगृहाच्या जाळ्यांना पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे. तसेच पक्षीगृहात भरपूर खेळती हवा राहिल याची दक्षता घ्यावी. पाळीव पशुधनास उन्हाच्या वेळी शक्यतो घरात ठेवावे. पशुधनाच्या निवारा, छतासाठी उष्णता रोधक मटेरीयल वापरावे. मृत पशुधनाची विल्हेवाटीची जागा सार्वजनिक ठिकाणे, पाणवठे यांच्यापासून दूर असावी. तसेच ते संरक्षीत असावी तसेच तेथे फलक लावण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

* पशुपालकांनी उष्णलहरींच्या वेळी हे करू नये :-

पशुधनास उन्हात उघड्यावर बांधू नये. पाळीव पशुधनास पार्क केलेल्या गाडीत सोडून जावू नये. शेतीविषयक व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या वेळी कामास लावू नये. पशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात दूर व फार वेळ घालवू नये, याची दक्षता घ्यावी. पशुधनाची गर्दी करू नये. दाटीवाटीने बांधू नये. भर उन्हात पशुधनाची हालचाल, वाहतूक करू नये. उन्हात दुभत्या पशुधनाचे दोहन करू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना केले आहे.....

******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या