🌟परभणी जिल्हा प्रशासनाने पाणी व चाराटंचाई निवारणार्थ तात्काळ कार्यवाही करावी - पालकमंत्री संजय बनसोडे


🌟ग्रामीण भागासाठी पाणी टंचाई निवारणार्थ 1 हजार 703 योजना प्रस्तावित🌟 

परभणी (दि.30 मे 2024) : परभणी जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे यंदा उन्हाळ्यात चारा व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या चारा व पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याचे क्रीडा, युवक कल्याण व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री संजय बनसोडे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. 

निम्न दुधना प्रकल्पाचे आरक्षित पाणी 9.08 दलघमी पाणी नदीपात्राद्वारे सोडले आहे. त्यामुळे दुधना नदीकाठच्या 56 गावांना सदर पाण्यापासून फायदा झाला आहे. तसेच जायकवाडी 1.113 दलघमी, येलदरी 27.664 दलघमी तर सिध्देश्वर धरणाचे 18.315 दलघमी आरक्षित पाणी पिण्यासाठी आरक्षित असल्याचे पालकमंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यात 9 तालुक्यापैकी 8 तालुक्यांमध्ये पाणीटंचाई असून जिंतूर, गंगाखेड, सोनपेठ, परभणी या तालुक्यातील 20 गावे वाडी, तांडे यामध्ये 20 खासगी टॅकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच जिल्ह्यात 152 गावे, वाडी, तांडे यामध्ये 200 विहीर, कुपनलिकांचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा केला जात आहे. प्रशासनाकडून टँकर, कुपनलिका व विहीर अधिग्रहणाचे अधिकार क्षेत्रीय स्तरावर देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाई निर्माण झाल्यास लवकरात लवकर निवारणार्थबाबतच्या प्रस्तावांना मंजुरी प्रदान करण्यात येत असल्याचे पालकमंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. 

ग्रामीण भागासाठी टंचाई निवारणार्थ 1 हजार 703 योजना प्रस्तावित आहेत. त्यासाठी 2307.70 लक्ष निधीची तरतूद आहे. तसेच नागरी भागासाठी टंचाई निवारणार्थ 149 योजना प्रस्तावित आहेत. त्यासाठी 367 लक्ष निधीची तरतूद आहे. त्यानुसार प्रस्तावित कामांना मंजुरी देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील गुरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध असून 75 व्यक्तींकडे चारा विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यांची यादी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध आहेत. तसेच शासन स्तरावरुन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने पिण्याचे पाणीटंचाई असल्यास 1077 व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 02452-223702, 226400 या दूरध्वनी क्रमांकावर पाण्याची मागणी नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

जिल्ह्यात माहे जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्यमान 761.3 मि.मी. असून, गतवर्षी त्यापैकी 523 मि.मी. म्हणजेच 68.63 टक्के एवढेच पर्जन्यमान झाले. जिल्ह्यात मागील आठ वर्षात 2018 वगळता सर्वात कमी पर्जन्यमान आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 2 मध्यम व 22 लघु प्रकल्पांपैकी 2 लघु प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. इतर सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत. येलदरी प्रकल्पामध्ये 27.04 टक्के पाणीसाठा असून, सिध्देश्वर प्रकल्पामध्ये जिवंत पाणीसाठा नाही. तर जिल्ह्यातील सर्वच कोल्हापुरी बंधारेदेखील कोरडे आहेत......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या