🌟परभणी जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अधिकाऱ्यांची प्रमुख देवस्थानांना भेट.....!


 🌟बालविवाह मुक्त परभणी अभियाना अंतर्गत कार्यवाही🌟

परभणी (दि.१० मे २०२४) : जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात विवाह होत असतात. त्यामध्ये काही प्रमाणात बालविवाह होण्याचे नाकारता येत नाही. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. १० मे रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील विविध मंदिरांना भेटी देण्यात आल्या. यामध्ये सोमनाथ महादेव मंदिर गौर, संत जनाबाई देवस्थान, दत्त मंदिर गंगाखेड, संचारेश्वर देवस्थान मानवत, हनुमान मंदिर देवस्थान रामपुरी, भोगाव देवी मंदिर, बाबा साहेब मंदिर सेलू,  साई बाबा मंदिर पाथरी, त्रिधारा देवस्थान, नृसिंह पोखर्णी, दत्तधाम मंदिर परभणी इत्यादी ठिकाणी भेट दिली.

या भेटीदरम्यान देवस्थानांच्या ट्रस्टींना विवाहाची कागदपत्रे जतन करण्यास सांगितले. तसेच वधू-वरांच्या वयाची शहनिशा करण्यासाठी कागदपत्रे हस्तगत करण्यात सांगितले. एखादे देवस्थान, प्रार्थनास्थळ येथे बालविवाह झाल्यास संपूर्ण ट्रस्ट बरखास्त करण्यात येईल, असे आदेशही देण्यात आले आहेत.याकरिता कार्यालयातील कर्मचारी, सर्व तालुका संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी, चाईल्ड लाईन टीम, समुपदेशन केंद्राचे समुपदेशक यांनी सहकार्य केले. तसेच जिल्हा प्रशासनासह कैलास सत्यार्थी फाउंडेशन व सेवा संस्था यांनीही सहभाग नोंदवला. ही कार्यवाही जिल्हा महिला बालविकास कार्यालयाच्या वतीने करण्यात आली. जिल्ह्यातील बालविवाहाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे.......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या