🌟तलाठी पदभरतीतील उमेदवारांच्या तक्रारी असल्यास 6 जूननंतर संपर्क साधण्याचे आवाहन....!


🌟असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे🌟

परभणी (दि.09 मे 2024) : जिल्ह्यात नुकतीच तलाठी पदभरती-2023 प्रक्रिया राबविण्यात आली असून, त्यानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार 81 उमेदवारांना नियुक्ती आदेशही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तरीही परभणी जिल्हा आस्थापनेवरील तलाठी पदभरतीबाबत नियुक्ती आदेश प्राप्त न झालेल्या निवड यादीतील 14 उमेदवारांना व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना काही अडचणी, समस्या असल्यास त्यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परभणी (आस्थापना विभाग) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी यांच्या आस्थापनेवरील तलाठी सवंर्गातील रिक्त पदांची जाहिरात जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी टीसीएस कंपनीमार्फत दि. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर, 2023 या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी दिनांक 11 मार्च, 2024 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीनुसार निवड झालेल्या 95 उमेदवारांपैकी 81 उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले असून, दिनांक 11 मार्च, 2024 अन्वये परभणी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या यादीव्यतिरिक्त कोणतीही यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. भविष्यात तलाठी पदभरती 2023 च्या अनुषंगाने झालेल्या प्रक्रियेबाबत या कार्यालयाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या