🌟साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत प्रशिक्षण ; 31 मेपर्यंत अर्ज आमंत्रित....!


🌟कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थपाक आर.एन.पवार यांनी केले आहे🌟

परभणी (दि.27 मे 2024) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी. त्यांना रोजगार व स्वयं रोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून गरजूंना आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी गरजू व पात्र उमेदवारांनी  31 मेपर्यंत अर्ज  करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या समाजातील नागरिकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होण्याकरिता प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. परभणी जिल्हा कार्यालयास सन 2024-25 या आर्थिक वर्षांकरिता एकूण 500 प्रशिक्षणार्थीचे कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट मुख्यालयाकडून प्राप्त झाले आहे. परभणी जिल्ह्यातील ज्या संस्थेने कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केली आहे. अशा प्रशिक्षण संस्थेने 31 मेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह दोन प्रतीत प्रस्ताव सादर करावेत.  त्यासाठी खालील अटी,शर्ती,निकष लागू राहतील.

प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे करण्यात येईल. नमूद कोर्सेसची निवड प्रशिक्षणार्थीने करणे बंधनकारक राहील. अभियान-१ मधील निकर्षांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परीक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्था चालकाची राहील. त्याशिवाय संस्थेची फी अदा केल्या जाणार नाही. प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधीनुसार 20, 30, 30 आणि 20 टक्के या प्रमाणात प्रशिक्षण शुल्क अदा करण्यात येईल. संस्थेने KVIC अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना PMEGP अंतर्गत निवडलेल्या व्यवसायाचा कर्जाचा अर्ज सादर करण्यासाठी सूचित करावे. जिल्हा स्तरावर एका कोर्ससाठी प्रशिक्षण देण्यासाठी एकाच प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात येईल. प्रशिक्षणार्थीची बायोमॅट्रीक पध्दतीने हजेरी पटावर स्वाक्षरीने व हजेरी घेणे बंधनकारक राहील. संस्थेने विद्यार्थीनिहाय प्रमाणित केलेली हजेरी पाठविल्याशिवाय संबधीत प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षण शुल्क अदा केले जाणार नाही.

इच्छुक अर्जदारासाठी अटी, निकष खालीलप्रमाणे आहे. अर्जदार मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील असावा. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. अर्जदार 18 ते 50 वयोगटातील असावा. अर्जदाराने यापुर्वी शासनाच्या / महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. एका कुंटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याच्या तपशिल सादर करावा.  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत कारेगाव रोड, परभणी जिल्हा कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थपाक आर. एन. पवार यांनी केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या