🌟परभणी लोकसभा निवडणूक निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि स्वच्‍छंदी वातावरणात पार पाडावी....!


🌟निवडणूक निरिक्षक (सामान्य) कृष्णकुमार निराला यांचे आवाहन🌟 

परभणी (दि.10 एप्रिल) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाने निवडणूकीच्या अनुषंगाने खुप चांगली पूर्वतयारी केली आहे. आपण निवडणूकीच्या महत्वाच्या टप्प्यावर असुन ही निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि स्वच्छंदी वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडण्याचे सूचना 17-परभणी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) कृष्णकुमार निराला यांनी दिल्या.



जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत श्री. निराला बोलत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक (पोलीस) विष्णुकांत, निवडणूक निरीक्षक (खर्च) अनुराग चंद्रा, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन,  अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उप जिल्हा निवडणुक अधिकारी जनार्धन विधाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री. निराला म्हणाले की, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या टीमने लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने करावयाची सर्व प्रक्रीयेची पुर्वतयारी खुप चांगल्या प्रकारे तयारी केली आहे. परंतू केलेल्या पुर्वतयारीची प्रत्यक्षात योग्य अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आपण निवडणूकीच्या महत्वाच्या टप्प्यावर अहोत, त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना चांगले प्रशिक्षित करावे. भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. यात ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्प, व्हिलचेअर, मतदारांसाठी उन्हापासून संरक्षणासाठी शेड व्यवस्था, वैद्यकीय उपचार किट, मदत कक्ष, प्रसाधनगृह, आदीं सुविधा सहायक निवडणूक अधिकारी यांनी आपल्या मतदार संघात आहेत का ? याची खात्री करुन घ्यावी. प्रामुख्याने ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा आहेत का? ज्या क्रिटीकल मतदान केंद्रावरुन वेबकास्टींग होणार आहे तेथील इंटरनेट सुविधा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. तसेच दूरस्थसह इतर सर्व मतदान केंद्राची मार्गाची देखील तपासणी करावी. ज्या ठिकाणी त्रुटी आहेत त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधीत यंत्रणेला यावेळी निवडणूक निरिक्षक (सामान्य) श्री. निराला यांनी दिले. 

निवडणूक कालावधीत मतदार संघात प्रसारीत होणाऱ्या राजकीय पेड न्यूज आणि राजकीय पुर्वप्रमाणिकरण न केलेल्या जाहिरातीं, तसेच सोशल मिडीयावरील जाहिरातीवर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने (एमसीएमसी) लक्ष ठेवावे. तसेच संशयीत पेड न्युज किंवा जाहिराती प्रसारित झाल्यास संबंधीत उमेदवाराला खुलासा करण्याची नोटीस द्यावी. तसेच एफएसटी, एसएसटी, व्हीएसटी आणि व्हिव्हिटी भरारी पथकांनी यांनी वेळोवेळी आपली स्थाने बदलून तपासणी करावी. निवडणूक प्रक्रिया सर्व पथकांनी निपक्षपणे पार पाडावयाची आहे. निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी योगदान द्यावयाचे आहे. आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे. आपल्या मागण्यासाठी ज्या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. त्या गावात सहायक निवडणुक अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी प्रत्यक्ष जावून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा. तसेच येणाऱ्या कालावधी काही महत्वाचे उत्सव साजरे होणार असुन, उत्सवात मतदारांमध्ये जनजागृती करत, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना ही श्री. निराला यांनी यावेळी दिल्या.

यावेळी निवडणूक निरीक्षक (पोलीस) विष्णुकांत म्हणाले की, निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने तयारी पुर्ण केली आहे. परंतु जे नियोजन केले आहे, त्याची योग्य अंमलबजावणी करावी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी निवडणुक प्रक्रियेमेध्ये व्यत्यय आणणाऱ्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. निवडणुकीच्या प्रचाराला आता मोठ्या प्रमाणात सुरुवात होण्याची शक्यता असल्याने विना परवाना प्रचार करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी निवडणुकीच्या अनुषंगाने तपासणी वाहनाची तपासणी करणाऱ्या नाक्यावर काही त्रूटी निदर्शनास आले असुन, त्या लवकरात दूर करुन प्रत्येक वाहनाची कसुन तपासणी करावी. तसेच तपासणी  करण्याची स्थाने वेळोवेळी बदलून तपासणी करण्यात यावी अशा सूचना निवडणूक निरीक्षक (खर्च) अनुराग चंद्रा यांनी दिल्या. 

सर्व सहायक निवडणुक अधिकारी यांनी आपल्या मतदार संघातील सर्व मतदान केंद्रात सर्व सोयी सुविधा आहेत का याची प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच निवडणुकीच्या अुनषंगाने करावयाची सर्व कामकाजाची प्रक्रीया अचुकरित्या वेळेत पार पाडावीत आशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुना्थ गावडे यांनी यावेळी दिल्या.प्रांरभी निवडणूक निरीक्षक श्री. निराला यांनी सर्व सहायक निवडणुक अधिकारी आणि नोडल अधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून सविस्तर आढावा घेतला.यावेळी बैठकीस सर्व सहायक निवडणुक अधिकारी, नोडल अधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या