🌟सर्वसामान्य नागरीकांनी लोकशाही वाचविण्याकरीता महाविकास आघाडीच्या मागे भक्कम ताकद उभी करावी - उध्दव ठाकरे
परभणी (दि.२३ एप्रिल) : परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारार्थ आज मंगळवार दि.२३ एप्रिल रोजी परभणी शहरातील स्टेडियमवर शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलतांना उध्दव ठाकरे म्हणाले की लोकसभेच्या या निवडणूका अत्यंत महत्वपूर्ण आहेत विशेषतः ही लोकसभा निवडणूक लोकशाही विरुध्द हुकुमशाही अशीच आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांनी लोकशाही वाचविण्याकरीता महाविकास आघाडीच्या मागे भक्कम ताकद उभी करावी असे आवाहन देखील यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले.
परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ येथील स्टेडिअम मैदानावर आज मंगळवारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार श्रीमती फौजिया खान, माजी मंत्री आमदार राजेश टोपे, उमेदवार संजय जाधव, आमदार सर्वश्री सुरेश वरपुडकर, राहुल पाटील, राजेश राठोड, माजी आमदार सर्वश्री विजय गव्हाणे, सौ. मिराताई रेंगे, सुरेशदादा देशमुख, विजय भांबळे, सुरेश जेथलिया, सितारामजी घनदाट, संतोष सांबरे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, ए.जे. बोराडे, डॉ. विवेक नावंदर, सिध्दार्थ हत्तीअंबीरे, भगवानराव वाघमारे, गंगाप्रसाद आनेराव, अतूल सरोदे यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाकरे यांनी भर पावसात केलेल्या आपल्या अल्प भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली. मोदी यांचे नाणे, मोदी यांचा चेहरा या महाराष्ट्राच्या निवडणूकीत यंदा चालणारा नाही, हे ओळखूनच या मंडळींनी हिंदुर्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरण्याचा केविलवाना प्रयत्न सुरु केला आहे, असा आरोप केला. आपल्या कुटूंबियांवर घराणेशाहीचा आरोप केला जातो आहे. हो, आपणास अभिमान आहे, आपण हिंदुर्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहोत, आपण घराणेशाहीबद्दल विरोधकांना बोलण्याचा काडीमात्र अधिकार नाही, घराणेशाहीबद्दल जनताच ठरवेल, असे नमूद करतेवेळी ठाकरे यांनी तुम्ही आमच्या घराणेशाहीबद्दल बोलत आहात आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीबद्दल सातत्याने निश्चितच बोलू.
गेल्या दहा वर्षांपासून आपण सत्तेच्या माध्यमातून एकाधिकारशाही चालविली आहे. त्या माध्यमातूनच आपण उध्दव ठाकरे यांना संपविण्याचा प्रयत्न करताहात, महाराष्ट्रातील मर्द मराठा हा आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना संपविण्याचा मोदी शहांनी वल्गना करु नयेत, दिल्लीत बसून आपण देशभर विरोधकांविरोधात कारवाया करत आहात, आपण म्हणून ती दिशा अशी भाषा करत आहात. वास्तविकतः आम्ही आपणास प्रेमानेसुध्दा मिठी मारली, आता अंगावर आला आहात, तेव्हा आम्ही वाघ नखे काढण्यास कचरणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
या महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सभेत भाजपाची पिलावळ महिलांबद्दल अपशब्द वापरत आहेत. परंतु, पंतप्रधान महिलांविरुध्दचा हा अवमान मूकपणे सहन करत आहेत. सुप्रिया सुळेंना शिवी देण्यापर्यंत विरोधकांनी मजल गाठली आहे. विरोधकांची ही पातळी म्हणजे असंस्कृतपणाचे लक्षण आहे, असे नमूद करीत ठाकरे यांनी भाजपला आता बोलण्यासारखे मुद्दे राहिले नाहीत. गेल्या दहा वर्षांपासूनची रटाळ मालिका आता बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या निवडणूकीच्या माध्यमातून जनताच ‘अब की बार भाजप तडीपार’ असा नारा देवू लागली आहे, असे ठाकरे म्हणाले.
भर पावसातील या सभेस मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.....
0 टिप्पण्या