🌟बोगस निविष्ठा विक्री करणाऱ्या कृषि केंद्रांवर कडक कारवाई करावी - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक संपन्न🌟


परभणी (दि.29 एप्रिल) : खरीप हंगामात शेतक-यांना बोगस निविष्ठा विक्री करणाऱ्या कृषि केंद्रांवर  कृषि विभागाच्या भरारी पथकांनी आकस्मिक तपासणी करून बोगस बि-बियाणे, खते, किटकनाशके विक्रेत्यांवर कडक कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले. 

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम सन २०२४ जिल्हास्तरीय आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे बोलत होते.यावेळी निवासी जिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल गवळी, आत्माचे प्रकल्प संचालक डी.एस.चव्हाण, उपविभागीय कृषि अधिकारी आर.बी.हरणे यांच्यासह जिल्हा यंत्रणेचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे बोगस बियाणे विक्री करणे, शेतकऱ्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त निविष्ठा खरेदी करण्यास भाग पाडले जाते. कृषि केंद्रांवर असलेला बि-बियाणे, खतांचा साठा, झालेली विक्री आणि शिल्लक याबाबतचा मोठा फलक दर्शनीय भागात लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी यंत्रणेला दिल्या मागील वर्षी राज्यातील पर्जन्यमान कमी झाला असल्याने सद्या पाणी आणि चारा टंचाईची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे. येणारा दीड महिन्याचा कालावधी अत्यंत कठीण असल्याने पाणी आणि जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन करावे.हवामान विभागाने यंदा पाऊस चांगला होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे कृषि विभागाने  खरीप पेरणी संदर्भात उत्कृष्ट बियाणे, त्याची उगवणक्षमता, पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना श्री. गावडे यांनी यावेळी दिल्या. 

जिल्ह्यात कापूस, तूर, सोयाबीन आदी प्रमुख पिकांसह मूग, उडदाखालील क्षेत्रांचाही त्यांनी आढावा घेतला. प्रधानमंत्री पीक विमा योजना, फळबाग लागवड योजना, रेशीम लागवड, वीज जोडणी, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, शेततळे, महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि नरेगाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी घेतला केंद्र व राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण, प्रधानमंत्री पिक विमा योजना, हवामान आधारित फळपिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, फळबाग लागवड, प्रधानमंत्री कृषि सूक्ष्म सिंचन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांर्गत येणाऱ्या योजना, नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (पोकरा) आदींचा यावेळी आढावा घेतला.     

तुती लागवडीखालील क्षेत्र वाढवावे, वीजजोडणी वेळेत देण्यात यावी, फळबाग लागवड योजना राबवावी, उत्कष्ट कृषि निविष्ठांचा पुरवठा करावा आणि पीककर्ज वाटपाचे उद्द्ष्टि पूर्ण करावे. तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषि केंद्रचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश ही जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी यंत्रणेला दिले.बैठकीस यावेळी संबधित सर्व विभाग प्रमुख, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.....


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या