🌟लोकसभा निवडणुक पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करणे आवश्यक....!


🌟मुख्य निवडणुक अधिकारी एस चोक्कलिंगम यांचे निर्देश🌟 

फुलचंद भगत

वाशिम:-लोकसभा निवडणुक 2024 पारदर्शक आणि शांतेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्य निवडणुक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात श्री. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूकीच्या तयारी आढावा घेण्यात आला.यावेळी अमरावती विभागाच्या आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, निवडणूक आयोगाच्यावतीने पोलिस निरिक्षक म्हणून भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी (आयपीएस) बरिंदरजित सिंह, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे ,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे, राजेंद्र जाधव, जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अभिनव बालूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशीया हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

             श्री.चोक्कलिंगम पुढे म्हणाले,जिल्ह्यातून शिक्षण आणि रोजगारासाठी तात्पुरत्या स्थलांतरित होणा-या घटकाला मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे नियोजन केल्याने जिल्ह्यातील मतदान टक्केवारी वाढवण्यास मदत होईल. राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वाशिम जिल्हा मतदानाच्या टक्केवारीत खूप मागे आहे.याचे कारण चांगले शिक्षण आणि रोजगार उपलब्ध नसल्याने लोक स्थलांतरित होतात. असे असले तरी प्रत्येक मतदारास मतदानाच्या दिवशी मतदान करता यावे याकरिता प्रशासनाने योजना आखाव्यात. तलाठी, आशा वर्कर, एएनएम, अंगणवाडी सेविका आणि बीएलओ यांच्या सहकार्याने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधन करावे. वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करुन तसेच स्थलांतर करणा-या मजूरांना निवडणुक कालावधीपुरत्या पर्यायी रोजगार किंवा कमविण्याचे साधन उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने नियोजन करावे.

निवडणुक आयोगाने शेवटच्या मतदारापर्यंत पोहचण्याच्या आणि प्रत्येक मतदाराने मतदान करण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यास आदेशित केले असल्याने वृध्द, दिव्यांग, दृष्टीहीन यांनाही मतदान करता यावा यासाठी व्हील चेअर्स,ब्रेल लिपी मध्ये वोटर स्लिप इत्यादी उपलब्ध करून देण्यात यावे. या मतदारांना घरातून मतदान केंद्र आणि मतदान केंद्रावरुन घरापर्यंत ने-आण करण्याची जबाबदारी संबंधित बीएलओ यांनी पार पाडावी.गृह मतदान करु इच्छिणा-या मतदारास एक दिवस आधी याबाबत कल्पना द्यावीआणि मतदान करून घ्यावे.

    यावेळी त्यांनी मतदान जनजागृती, स्वीप, इलेक्टोरल रोल आणि एपिक,पोलिंग स्टेशन, बजट आणि फायनान्स,मनुष्यबळ,निवडणुक व्यवस्था, वाहतुक, वेबकास्टिंग, सोशल मिडीया, माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण,मिडिया सेल,आणि आचार संहिता अंमलबजावणीबाबत सविस्तर आढावा घेतला आणि आवश्यक सूचना दिल्या.यावेळी जिल्ह्यात त्यांनी वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांची माहिती घेतली.निवडणूक प्रक्रीया शांतेत आणि पारदर्शकरित्या पार पाडाव्या या अनुषंगाने अवैध दारू , नगदी रोकड आणि इतर प्रलोभनीय वस्तूंचे वितरणावर आळा घालण्यासाठी पोलीस आणि राज्य उत्पादन शुलक या विभागांनी अत्यंत सजग राहुन कर्तव्य पार पाडणे आवश्यक असल्यचेही श्री. चोक्कलिंगम म्हणाले.पोलिंग स्टेशनच्या ठिकाणी कार्यरत कर्मचारी व अधिका-यांच्या जेवण आणि नाष्ट्याची सोय करण्याबाबतही त्यांनी आदेशित केले.

सोशल मीडिया आणि इतर प्रसारमाध्यमांद्वारे चुकीची आणि आपत्तीजनक माहिती पसरविली जाऊ नये याकडे विषेश लक्ष देण्याच्या सूचना देत हि निवडणुक शांततापूर्वक पार पाडण्यासाठी श्री. चोक्कलिंगम यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या या आढावा बैठकीस जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या