🌟वंचित बहुजन आघाडीला आलमगीर खान यांनी दिला सोडचिठ्ठी : लोकसभा उमेदवारी पासून आलमगीर खान ‘वंचित’.....!


🌟परभणी लोकसभेसाठी बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर होणार आलमगीर खान यांचा राजीनामा🌟

परभणी(दि.०३ एप्रिल) :  परभणी लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करतेवेळी पक्षश्रेष्ठींनी आपणास विश्‍वासात न घेतल्याच्या निषेधार्थ पक्षाचे नेते आलमगीर खान यांनी आज बुधवार दि.०३ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

            वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघातून बाळासाहेब उगले यांना मंगळवारी रात्री उमेदवारी जाहीर केली. या पार्श्‍वभूमीवर २०१९ ची लोकसभा निवडणूक वंचितद्वारे लढविणारे आलमगीर खान यांनी पत्रकार परिषद घेवून आपली नाराजी व्यक्त केली. व राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांच्याकडे आपण ई-मेलद्वारे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला आहे, असे नमूद केले.

           सामान्य कार्यकर्ता म्हणून गेल्या ०५ वर्षात परभणी जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी तन-मनाने  व प्रामाणिकपणे काम केले. शिवाय दोन वेळा जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. दोन वर्षापुर्वीच अ‍ॅड.आंबेडकर यांनी आपल्याला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्याचे आश्‍वासन दिले होते, असा दावाही आलमगीर खान यांनी केला आहे. बाळासाहेबांनीच आपणास ओळख दिली, वेगळे अस्तित्व निर्माण करण्याची संधी दिली. तसेच राजकारणाचा मोठा अनुभव दिला असून त्यांच्याप्रति आदरच आहे, असे खान म्हणाले. आपण लोकसभेची चांगली तयारी देखील केली होती, आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असताना दुसराच उमेदवार जाहीर  झाल्याने पक्षाचे कार्यकर्तेदेखील नाराज असल्याचे ते म्हणाले. दुसर्‍या कुठल्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवायची की अपक्ष लढायचे याचा निर्णय गुरूवारी दि.०४ घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या