🌟वाशिम तालुक्यातील ग्राम मौजे शिरपूटी येथील व्यायामशाळेच्या बांधकामात भ्रष्टाचार....!


🌟चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी🌟

फुलचंद भगत

वाशिम - तालुक्यातील ग्राम मौजे शिरपूटी येथे दलित वस्तीत असलेल्या व्यायाम शाळेेचे बांधकामात मोठा भ्रष्टाचार करण्यात आला असून बांधकामाचे खोटे पुरावे जोडून ७ लाख रुपयाचा निधी हडप करण्यात आला आहे. सदर भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी सामाजीक कार्यकर्ते मधुकर कांबळे यांनी ८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन देवून उपोषणाचा इशारा दिला आहे.

निवेदनात नमूद आहे की, तालुक्यातील मौजे शिरपूटी येथे आंबेडकर सेवा संस्था अंतर्गत दलित वस्तीत व्यायाम शाळेच्या बांधकामाकरीता वर्ष २०१० मध्ये शासनाच्या क्रीडा विभागाकडून ७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. मात्र या व्यायामशाळेचे बांधकाम अर्धवट तसेच अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. तसेच व्यायामशाळेचे बांधकाम पूर्ण झाल्याचे दाखविण्यासाठी दुसर्‍याच व्यायामशाळेची छायाचित्रे देयकासोबत जोडून क्रीडा विभागाला देण्यात आले. त्यामुळे संस्था अध्यक्ष जगन्नाथ कांबळे यांनी शासनाची दिशाभूल करुन तसेच खोटे पुरावे सादर करुन ७ लाख रुपयाचा निधी हडप केला आहे. त्यामुळे व्यायामशाळा बांधकामात झालेल्या भ्रष्ट्राचाराची सखोल चौकशी करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे. कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा मधुकर कांबळे यांनी संबंधीत विभागाला दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या