🌟मुक्या जीवांनाही उष्माघाताचा वाढता धोका : थंड जागेसह पाण्याचा वापर करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन...!


🌟पशूंना उष्माघाताचा त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहनही डॉ.जयश्री केंद्रे यांनी केले🌟 

फुलचंद भगत

वाशिम:-उन्हाळा प्रचंड झाल्याने उष्णता वाढली आहे. यामुळे माणसांप्रमाणेच मुक्या जनावरांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. विशेषतः दुभत्या जनावरांना याचा धोका अधिक आहे. त्यामुळे शक्यतो कडक उन्हापासून पशुंचा बचाव करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

गेल्या काही दिवसापासून वातारणात वेळोवेळी बदल होत आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. मे महिन्यात तापमान आणखी वाढू शकते. सध्या ढगाळ वातावरण असल्याने उन्हाच्या झळा कमी झाल्या आहेत, परंतु वातावरणातील उष्णता कायम आहे. त्यामुळे नागरिकांप्रमाणेच पशुंच्याही शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी पशुपालकांनी काळजी घेतली पाहिजे. पशूंना ऐन दुपारच्या वेळेत मोकळे सोडल्यास किंवा त्यांना बांधलेल्या ठिकाणी उन्हाचा त्रास जाणवणार नाही याची प्राथमिक काळजी घेणे उपायकारक ठरणारे आहे. पशूंना सावलीत आणि मोकळ्या हवेशीर परिसरात बांधावे. पशूंसाठी थंड जागेसह पाण्याचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. जयश्री केंद्रे यांनी केले आहे. पशूंना उष्माघाताचा त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहनही डॉ. केंद्रे यांनी केले आहे.

* पशुपालकांची गैरसोय नको :-

पशुसंवर्धन विभागांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये उष्माघाताने जनावरे आजारी पडणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी तसेच ज्या गावातील जनावरे आजारी पडतील त्यांच्यावर त्वरित औषधोपचार करावा, कोणत्याही पशुपालकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी.

                               -वैभव वाघमारे (भाप्रसे),मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.

*पिण्यासाठी २४ तास पाणी उपलब्ध ठेवा :-

कडक उन्हाळा संपेपर्यंत  सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत शक्यतो पशूंकडून काम करून घेऊ नये, किंवा त्यांना चरण्यासाठीही बाहेर सोडू नये. त्यांना थंड सावली असलेल्या ठिकाणीच बांधावे, त्यांच्या अंगावरती किमान दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी टाकावे. तसेच त्यांना पिण्यासाठी २४ तास जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून ते आपल्या शरीरातील तापमान संतुलित करू शकतील. 

-डॉ.जयश्री केंद्रे, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.

तत्काळ प्रथमोपचार करावेत :-

उष्माघात झाल्यास शरीरातील जास्त झालेली उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच प्रथमोपचार आहे. सर्वप्रथम पहुंना शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत वा थंड ठिकाणी हलवावे. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते. तसेच शरीर ओल्या कापडाने पुसून घ्यावे, पशुंच्या अंगावर थंड पाणी टाकावे असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या