🌟आज प्रत्येकाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडताना दिसतात, की सद्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे म्हणूनच की काय ?🌟
कारण "हम भी किसीसे कम नही!" हाच त्याचा स्वाभिमानी हेका असतो, तोरा असतो. परंतु त्याला हे कळत नाही, कि जाऊ दे बिचाऱ्याला! तो अंत्यत तातडीच्या कामात असेल. त्या ओव्हर टेकरची गाडी अधिक बलशाही व नवीन, कोरी करकरीत असेल. जाऊया आपण आपल्या नित्य चालीने. ओव्हर टेकरला मात्र ही सवय नित्याचीच होऊन जडलेली असते. कुठल्याच कामात तो मागे राहू इच्छित नाही. यातून त्यास खुप मोठा आनंद मिळत असावा, मात्र तो क्षणिक आणि आसुरी आनंद असतो. तो शाश्वत आनंद, ब्रह्मानंद मुळीच नसतो, हे मात्र नक्की! असेही त्याला वाटते, की आपण फार मोठे पराक्रमी वीर आहोत, म्हणून "सदैव सैनिका पुढेच जायचे!" या तोऱ्यात तो मिरवत फिरतो. ही मार्गदर्शक जाणिव जागृती श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या शब्दातून जरूर वाचा... संपादक.
आज प्रत्येकाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडताना दिसतात, की सद्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. म्हणूनच की काय ? आजचा युवकवर्ग पुढच्यास ओलांडून त्याच्या कितीतरी पुढे निघून जाण्याच्या नादात- ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात सदासर्वकाळ दिसून येतो. यातच तो आनंद मानतो, हेच आपले ध्येय समजतो. मग तो जीवनमार्ग असू द्या किंवा वर्दळीचा राष्ट्रीयमार्ग तथा आंतरराष्ट्रीय महामार्ग असू द्या. आपलाच एक बांधव आहे, आपल्यासारखाच एक मानव आहे, अशी कदाचित त्याला कल्पना किंवा बुद्धीच उमगत नसावी. असे ते ओव्हर टेकचे भयान नाट्य बघून वाटते. बरं, एकाने ओव्हर टेक केले, म्हणून दुसरा तरी शांत व आपल्या चालीने- वेगाने मार्गक्रमण असतो का? नाही. त्याला पण चेव येतो, त्याची तीव्रपणे चेतना जागृत होते. मग तो चिडून त्वेषाने इरेस पेटतो आणि आपणही त्याला मागे पाडावे, म्हणून तो गाडी अतिवेगान दामटू लागतो. कारण "हम भी किसीसे कम नही!" हाच त्याचा स्वाभिमानी हेका असतो, तोरा असतो. परंतु त्याला हे कळत नाही, कि जाऊ दे बिचाऱ्याला! तो अंत्यत तातडीच्या कामात असेल. त्या ओव्हर टेकरची गाडी अधिक बलशाही व नवीन, कोरी करकरीत असेल. जाऊया आपण आपल्या नित्य चालीने. ओव्हर टेकरला मात्र ही सवय नित्याचीच होऊन जडलेली असते. कुठल्याच कामात तो मागे राहू इच्छित नाही. यातून त्यास खुप मोठा आनंद मिळत असावा, मात्र तो क्षणिक आणि आसुरी आनंद असतो. तो शाश्वत आनंद, ब्रह्मानंद मुळीच नसतो, हे मात्र नक्की! असेही त्याला वाटते, की आपण फार मोठे पराक्रमी वीर आहोत, म्हणून "सदैव सैनिका पुढेच जायचे!" या तोऱ्यात तो मिरवत फिरतो. किंवा नुसतीच त्याला मिरवायचे असते की आपण किती कार्यतत्पर आहोत. आपली कामाची उरक लोकांच्या डोळ्यांत त्वरेने भरण्याची घाई त्याला झालेली असते. जशी आपल्याकडे झाडीबोलीतील एक म्हण प्रसिद्ध आहे तशी-
"येलपाडीचे (मिजासखोर स्त्रीचे) आले डोळे|
खाटले ठेवून खाल्या लोळे||"
ज्ञानवंतांनी भुकेल्या, तहानलेल्या, अधाशी, हपापलेल्या व्यक्तीस पुढ्यात घेऊन त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे. त्याच्यासारखेच ज्ञानवंतही करू लागले तर त्यांच्यातील फरकच कळणार नाही. म्हणून ज्ञानवंतांनी संयम, सबुरी व धीरानेच अशा प्रसंगाना सामोरे जाणे इष्ट ठरते. एकदा एका बाइकस्वाराने ओव्हर टेक केला. तेव्हा मागे पडलेला बाइकस्वार त्वेषाने पेटून उठला व बाइक वेगात दामटली. अतिवेगामुळे वळणावर ती घसरली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर जोरात आपटली. तिचा चेंदामेंदा झाला, तर बाइकस्वाराने मात्र या जगाचा कायमचा निरोप घेतला. दुसरी एक घटना अशी, की चार चाकी कारला एका बाइकस्वार युवकाने ओव्हर टेक करून मागे टाकले आणि तो शहरातील मुख्य चौकात येऊन काहीतरी खरेदी करू लागला. तेवढ्यात ती कार येऊन पोहोचली. कारचालक युवती त्याला आडवी झाली. "मला ओव्हर टेक करण्याची तुझी हिंमतच कशी झाली?" म्हणत आधी त्याच्या गालांगालावर मोजले आणि मग त्याला चांगलेच बदडून काढले. असा आपल्याला ओव्हर टेक केल्याचा वचपा, बदला घेतला. किती मोठ्ठा आनंद, परमानंद झाला असेल तिला! नाही काहो? तरीही बिच्चारा युवक शांतच! अशा या भानगडी विनाकारण जीवावर बेतत असतात. तरीही ओव्हर टेकर्सना यात काहीच कशी लाज-शरम वाटत नाही? ईश्वरप्राती करून ब्रह्मानंद प्राप्तीसाठी अशी तातडी, असे साधकांना ओव्हर टेक करणारे महाभाग मात्र क्वचितच दृष्टीस पडतात. कारण या आध्यात्मिक, भक्तिमार्गावर चालणारा लंगडालुळा होत नाही तर त्याचा थेट पुनर्जन्मच होतो, एक खरा भला माणूस म्हणूनच!
समजा, आपली एखादी मूल्यवान वस्तू घरातच कुठेतरी हरवली. ती जोपर्यंत आपल्या दृष्टीस पडत नाही तोपर्यंत मनास चैन पडेल तर शप्पथ! ती शोधण्यासाठी आपण एका पाठोपाठ एक साधन वापरतो. कधी काठीने, कधी झाडूने ओढून, ढकलून वा चाचपडून बघतो. तर कधी विजेरीचा प्रकाशझोत टाकून डोळे फाडफाडून पाहतो. ती वस्तू सांपडत नाही, तोवर शोध घेणे आपण थांबवित नाही. सहज एखादे सद्गृहस्थ यावे आणि वस्तू उचलून तुम्ही शोधत आहात ते हेच का? असे उच्चारताच आपली उत्सुकता शिगेला पोहोचते. झटकन ती वस्तू हातात घेऊन तिला निरखून बघतो आणि मोठ्या आनंदाने खड्या आवाज म्हणतो, "अहो, ती हीच माझी अमोलक वस्तू! मी हीलाच शोधत होतो." असे म्हणून आपण पूर्वीप्रमाणे ती वस्तू शोधत राहाल का? नाही. आधी त्या दात्या व्यक्तीस अनेक नमस्कार घालतो, धन्यवाद देऊन त्याचे स्तुतीपाठ गातो. आजीवन ऋणी व उपकृत राहण्याचे बोलून दाखवितो व वचनबद्ध होतो. आपण परत त्याच वस्तूचा शोध सुरूच ठेवला, तर लोक आपल्याला नक्कीच मूर्ख ठरवतील. मात्र त्या वस्तूची स्वच्छता, सुरक्षा, सुशोभन, कलाकुसर, काळजी आदी वेळोंवेळी चालवित असतो. अगदी असेच ब्रह्मानंद व इश्वरप्राप्तीस केल्या जाणाऱ्या भक्ती वा पुजापाठाचे आहे. विचारा, कसे? तर आपण पुजापाठ कशासाठी करतो? त्यामागील उद्देश साफ-स्पष्ट असावा लागतो. ईश्वरप्राप्ती करून ब्रह्मानंद मिळवावे, असा उद्देश असेल तर वरील दृष्टांत तंतोतंत लागू पडतो. त्यासाठीच आपण पुजापाठ, जप, तप, योगयाग करत असतो. परंतु अनेक शोध शोधांती एखादा ब्रह्मवेत्ता सद्गुरू मिळाला आणि त्याने ब्रह्मदर्शन घडवून दिले. तर मग परत तसलेच पुजापाठ करत बसणे योग्य राहील का? नाही ना! म्हणून मग केवळ ईश्वरास आमरण प्रसन्न ठेवण्यासाठी सद्गुरूच्या आदेश व वचनांचे पालन करत त्यालाच आपण सदैव हसतमुख ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे सर्वश्रूत आहे, हीच खऱ्या ब्रह्मानंदप्राप्त साधकांची परंपरा आहे. आपण जिथून सुरूवात केली होती, तिथे थांबून सांगावेसे वाटते, की ओव्हर टेक करणारास पुढे जाऊ द्या, पण मागे पडणाराने अजिबात चालाखी करू नये. पुढे जाणारास पुढ्यात घेऊन त्याच्या यशस्वीतेबद्दल सहकार्य द्यावे, यामुळे काय होईल? तर वाईट प्रसंग वा अप्रिय घटना अजिबात उद्भवणार नाही. वादंग वा हिंसाचाराला आपणच ब्रेक लावू शकाल, एवढे मात्र निश्चिंत! यात तुम्हाला जो आनंद मिळेल; तो खरोखरच ब्रह्मानंद असेल..!
- लेखक -
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी.
(मराठी- हिंदी लेखक आणि कवी)
द्वारा- प.पू. गुरुदेव हरदेव कृपानिवास.
मु. रामनगर वॉर्ड नं. २०, गडचिरोली.
फक्त व्हॉट्स ॲप- ९४२३७१४८८३.
0 टिप्पण्या