🌟प्रथम आर्यभट्ट प्रक्षेपण दिन विशेष : अंतरिक्ष संशोधनास इस्रोची स्थापना.....!


🌟भारताला स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे भाग पडले दि.१९ एप्रिल १९७५ रोजी सोडलेला पहिला कृत्रीम उपग्रह आर्यभट्ट होय🌟

पर्यावरण, हवामान, कृषी, भूकंप, त्सुनामी यांसारख्या क्षेत्रांचीही माहिती क्षणात मिळवून देणारे स्वदेशी तंत्रज्ञान आमच्या बहाद्दर शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. त्यात त्यांनी भरघोस यश मिळविले. प्रामुख्याने अमेरिका, चीन आणि रशिया या देशांकडे असलेल्या संरक्षण विषयक आणि टेहळणी करणारे उपग्रह असल्यामुळे भारतालाही अशा टेहळणी उपग्रहांची गरज भासू लागली. इ.स.१९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने हे युद्ध जिंकले. भारताच्या लष्कराला टेहळणी उपग्रहाची जोड देण्याचा विचार तेव्हाच सुरू झाला होता. परंतु ज्या वेळी हा विचार पुढे आला, भारताला सहकार्य न करण्याची भूमिका त्या वेळी हे तंत्रज्ञान जवळ असलेल्या देशांनी घेतली. परिणामी भारताला स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे भाग पडले. याचाच परीणाम म्हणजे दि.१९ एप्रिल १९७५ रोजी सोडलेला पहिला कृत्रीम उपग्रह आर्यभट्ट होय. श्री. एन. कृष्णकुमार, से.नि.अध्यापक यांच्या लेखात ही महत्वपूर्ण माहिती वाचा...संपादक.

    दि.१९ एप्रिल १९७५ रोजी भारतीय शास्त्रज्ञांद्वारे जो पहिला उपग्रह अंतरिक्षात झेपावला तो आर्यभट्ट होय त्याची संरचना विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद रिसर्च सेंटरमध्येच केली होती. आर्यभट्टाने यशस्वीपणे उड्डान केल्यानंतर त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी विक्रम साराभाईंचे अभिनंदन केले होते. आर्यभट्टाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह आकाशात झेपावले आणि ते यशस्वीपणे काम करत होते. या अंतरीक्ष संशोधनामध्ये साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी कारणीभूत आहे. ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी विक्रम साराभाईंसोबतच हजारो शास्त्रज्ञांनी अहोरात्र परिश्रम घेतले. नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले. क्रायोजेनिक इंजिन मिळवण्यात येणार्‍या अडचणी लक्षात घेता भारतातच हे इंजिन तयार केले. नवनवीन इंधनांचा प्रयोग केला आणि आपली ही मोहीम पुढेच नेली. त्यामुळेच आज या दिवशी या मोहिमेत आपले योगदान देणारे सर्व जण अभिनंदनास पात्र आहेत.

   दि.२७ नोव्हेंबर १९६३ रोजी थुंब्याहून नाईके ऍपची नावाचा अमेरिकन अग्निबाण सोडण्यात आला. ही इस्रोच्या आगमनाची नांदी होती. थुंबा हे केरळमधील सागरकिनारी वसलेले एक लहानसे खेडे आहे. तेव्हा थुंबा या गावाजवळ साधी सडकसुध्दा नव्हती. मात्र या संशोधन केंद्रात रशियामधून आलेले एक यंत्र घेऊन जाण्याची गरज होती. तेथे मोटार जात नव्हती, म्हणून हे रशियन यंत्र बैलगाडीतून तेथे नेण्यात आले होते. त्या बैलगाडीतून भारताचा अंतराळ संशोधन प्रवास सुरू झाला आणि आज भारत हा जगातला या क्षेत्रातला आघाडीचा देश ठरला आहे. अवकाश संशोधनावर गेल्या पन्नास वर्षात आपण केलेला खर्च केवळ बारा अब्ज डॉलर एवढा आहे. या उलट अमेरिकेचा या कार्यक्रमासाठीचा एका वर्षाचा अर्थसंकल्प सतरा अब्ज डॉलर एवढा आहे. याचा विचार केला तर या कार्यक्रमावर आपण केलेला खर्च किती कमी व तरीही किती उपयोगी आहे? हे लक्षात येऊ शकेल. अमेरिका, रशिया आणि जपान या पाठोपाठ खगोलीय उपग्रह अवकाशात पाठवणारा आपला भारत हा जगातला चौथा देश ठरला आहे. इस्रोची स्थापना दि.१५ ऑगस्ट १९६९ रोजी झाली. प्रारंभीच्या काळात इस्रोची उद्दिष्टे मर्यादित होती. परंतु पुढे इंदिरा गांधी यांच्या काळात अन्नधान्याच्या उत्पादनापासून ते अंतराळ संशोधन क्षेत्रात स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट निश्‍चित केले गेले. त्यातून अंतराळ संशोधनासाठी इस्रोची स्थापना केली गेली. त्यानंतर अवघ्या सहाच वर्षांत आर्यभट्ट या उपग्रहाची जुळणी देशातील शास्त्रज्ञांनी यशस्वी करून दाखवली. इस्रोच्या वाटचालीचा हा पहिला टप्पा होता. इन्सॅट उपग्रहांची मालिका कार्यरत करणे हा दुसरा आणि सन १९९०पासून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान- पीएसएलव्ही तसेच भूसंकलिक उपग्रह प्रक्षेपण यान- जीएसएलव्ही हे पूर्णत: भारतीय संशोधनातून बनले. यासाठी क्रायोजेनिक इंजिनही इस्रोने स्वत: बनवणे, हा तिसरा टप्पा होता. चांद्रयान ते मंगळयान या चौथ्या टप्प्यावर आता आपण आहोत. या सर्व टप्प्यांत कोणतीही वाच्यता न करता देशाच्या संरक्षणाची गरज भागेल, असे कामही इस्रो करीत आली आहे. मुख्य म्हणजे या सर्व वाटचालीत तिची स्वायत्तता कधीही धोक्यात आली नाही.

     भारतात माहिती-तंत्रज्ञान क्रांतीची मशाल या मोहिमेनेच पेटविली. त्या काळात टीव्ही, इंटरनेट यांसारख्या सेवा नव्हत्या. त्यामुळे भारताला रेडिओवरच समाधान मानावे लागत होते. पण इस्रोने या सेवा भारताला प्रदान करण्यासाठी अंतराळात अनेक उपग्रह सोडले. त्यामुळेच आज संपूर्ण भारतीय या अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहेत. केवळ माहिती आणि तंत्रज्ञानच नव्हे, तर पर्यावरण, हवामान, कृषी, भूकंप, त्सुनामी यांसारख्या क्षेत्रांचीही माहिती क्षणात मिळवून देणारे स्वदेशी तंत्रज्ञान आमच्या बहाद्दर शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. त्यात त्यांनी भरघोस यश मिळविले. प्रामुख्याने अमेरिका, चीन आणि रशिया या देशांकडे असलेल्या संरक्षणविषयक आणि टेहळणी करणारे उपग्रह असल्यामुळे भारतालाही अशा टेहळणी उपग्रहांची गरज भासू लागली. इ.स.१९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने हे युद्ध जिंकले. भारताच्या लष्कराला टेहळणी उपग्रहाची जोड देण्याचा विचार तेव्हाच सुरू झाला होता. परंतु ज्या वेळी हा विचार पुढे आला, भारताला सहकार्य न करण्याची भूमिका त्या वेळी हे तंत्रज्ञान जवळ असलेल्या देशांनी घेतली. परिणामी भारताला स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करणे भाग पडले. याचाच परीणाम म्हणजे दि.१९ एप्रिल १९७५ रोजी सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट होय.

     आर्यभट्ट हा भारताचा ३६० किग्राॅ वजनाचा पहिला उपग्रह कापुस्टीन यार या रशियन अंतराळ स्थानकावरुन प्रक्षेपित करण्यात आला. ही इस्रोची पहिली मोहीम होती. थोर भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्टांचे नाव या उपग्रहाला देण्यात आले. तो फक्त पाच दिवसच कार्यरत होता; कारण त्याचे आयुष्यच मुळी काही दिवसांचे होते. सुमारे पाच दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर उपग्रहाचा इस्रोशी संपर्क तुटला. स्वतःचा पहिला उपग्रह रशियाच्या मदतीने पाठवणाऱ्या आपल्या भारताने आतापर्यंत वीस देशांचे ५१ उपग्रह प्रक्षेपित करून ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. अ‍ॅस्ट्रोसेटच्या यशस्वी प्रक्षेपणाने जागतिक अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही नवा इतिहास रचला गेला आहे. पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल- पीएसएलव्ही या प्रक्षेपकाद्वारे इ.स.२०१०मध्ये एकाच वेळी दहा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित करायचा नवा विक्रम तथा इतिहासही इस्रोनेच लिहिला. इंग्लंड, अमेरिका, रशिया, फ्रान्स या देशांची अवकाश संशोधनाच्या क्षेत्राची मक्तेदारी भारताने मोडून तर काढलीच, पण या क्षेत्रात दबदबाही निर्माण केला. ज्या अमेरिकेने हे तंत्रज्ञान आपल्याला देण्यास नकार दिला, त्याच अमेरिका व ब्रिटनसह काही देशांचे एकूण अकरा उपग्रह भारताने अवकाशात सोडले होते. यालाच म्हणतात काळाचा महिमा! अडचणीशिवाय सन्मानर्ग गवसत नाही, हेच शेवटी खरे ठरले.

!! प्रथम आर्यभट्ट प्रक्षेपण दिनाच्या सप्ताहभर सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा !!                       

श्री. एन. कृष्णकुमार, से.नि.अध्यापक.

 (वैभवशाली भारताच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक)

 मु.पोटेगावरोड, एमएसईबीच्या मागे, गडचिरोली. 

 जि. गडचिरोली, फक्त व्हॉ. नं. ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या