🌟समाज परिवर्तनासाठी सकारात्मक विचारांची दृढता आवश्यक - हभप चैतन्य महाराज देगलूरकर


(सेलू : वसंत प्रतिष्ठानच्या पसायदान या प्रवचन मालेत गुरुमाऊली मुक्तीप्रिया चैतन्य महाराज देगलूरकर यांचा सत्कार करताना वसुधा खारकर,मधुरा खारकर)

🌟सेलू येथील वसंत प्रसतिष्ठानच्या पसायदानाचे दुसरे पुष्प🌟

सेलू (दि.24 एप्रिल) - व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आवश्यक असेल,मानवाची प्रगती अलौकिकपणे व्हावी असे वाटत असेल तर पसायदानात संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले तशी विचारांची दृढता आवश्यक आहे.मानवाच्या विचारांची उंची समजणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सामाजिक परिस्थिती देखील तशी निर्माण होणे गरजेचेच आहे.म्हणजेच त्या मानवाला सत्संगती प्राप्त होणे आवश्यक आहे, असे मत सद्गुरू हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले.

येथील वसंत प्रतिष्ठान आयोजित पसायदान या तीन दिवसीय प्रवचनमालेचे दुसरे पुष्प प्रसिद्ध सगदुरु हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले.सर्वप्रथम संतपूजनानंतर अभंग गायन झाले.यानंतर देगलूरकर महाराज यांनी दुसरे पुष्प गुंफत प्रवचनाला सुरुवात केली." वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी  अनवरत भु मंडळी भेटतो या भुता "या पसायदानातील ओळीवर निरूपण करतांना देगलूरकर महाराज म्हणाले की,कोणताही माणूस आपल्यात दोष आहे हे लगेच मान्य करत नाही.आपल्या दुःखाची जबाबदारी दुसऱ्यावर तर सुखाच श्रेय स्वतःवर माणूस घेतो.परंतु हे चुकीचे आहे.म्हणून ज्ञानेश्वरांनी ईश्वरनिष्ठ मंडळींकडून अपेक्षा पसायदानातून व्यक्त केली आहे. माणसाच्या आंतरिक परिवर्तनाला वेग यायचा असेल तर संतसंगती आवश्यक आहे.संगतीचा परिणाम सखोल होतो पण संतांची संगती असेल तर माणसाची प्रगती वेगाने होते.संत या जगताला शब्द आणि कृती या माध्यमातून मार्गदर्शन करतात तेव्हाच परिवर्तन होते.धर्माची स्थापना आणि रक्षण  देखील संत करतात.प्रत्येक वेळी धर्माला ग्लानी आली की संत जन्म घेतात हे उदाहरणांसह चैतन्य महाराज देगलूरकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी पुढे बोलतांना हभप देगलूरकर महाराज म्हणाले की,संतांनी जो धर्म राखून आपल्या हातात दिला तो धर्म जपणे आपल्या मानवाचे काम आहे.कोणत्याही जीवाला ब्रह्मरुप व्हायचे तर संतांच्या सत्संगताची कडी होणे गरजेचे आहे.माणसाच्या जीवनात सत्संगतीला महत्व आहे.पसायदानातील 9 पैकी 3 ओव्यां या संत ज्ञानेश्वरांनी सत्संगतीसाठी लिहिल्या आहेत.

जीवाची ब्रह्मरूपता सत्संगतीच्या कडीशिवाय शक्य नाही असे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले आहे.यावेळी देगलूरकर महाराज यांनी विविध उदाहरणे देऊन संतांपर्यंत आपले मागणे कसे पोचवता येईल हे पटवून दिले.संत ज्ञानेश्वरांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की,संतांनी शांत न राहता सकळ मानव समाजाला सतत भेटत राहिले पाहिजे.सकळ मंगळाचा वर्षाव करत राहणे आवश्यक आहे,असेही हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांनी सांगितले.या प्रवचनमालेसाठी शहरातील नागरिकांसह मराठवाड्यातील शिष्य मंडळी उपस्थित राहत आहेत.सखाराम उमरीकर व शंतनू पाठक यांनी गायलेल्या पसायदानाने प्रवाचनाचा शेवट झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले.प्रवचनमालेच्या यशस्वीतेसाठी महेश खारकर,ऍड.उमेश खारकर,माजी प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी,प्रकाश कुरुंदकर,विनोद मोगल,नंदू धर्माधिकारी,अजित मंडलिक,जयंत दिग्रसकर,डॉ प्रवीण जोग,ऍड.किशोर जवळेकर,प्रसाद खारकर,योगेश खारकर आदींसह वसंत प्रतिष्ठानचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या