🌟श्रीराम नवमी : प्रभू श्रीरामचंद्र जन्मदिन विशेष : सर्वोत्तम पुरुष: प्रभू श्रीरामचंद्र....!


🌟श्रीराम नवमीला दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दुपारी बारा वाजता रामजन्माचा सोहळा होतो🌟

भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२ वाजता झाला. श्री राम नवमीचा सण दरवर्षी मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, राम नवमी हा हिंदू धर्मातील शुभ सणांपैकी एक आहे. हा सण चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो.

           चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. श्रीराम नवमीला दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर- दुपारी १२:०० वाजता रामजन्माचा सोहळा होतो. श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते. श्री रामांच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. श्री रामांची पूजा करताना त्याना करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात. तसेच श्रीरामांना हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात. श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.

       "श्रीराम जन्मला गं सखे;

         श्रीराम जन्मला !! 

 श्रीराम नवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते श्रीराम नवमी या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. श्रीराम हे सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी या उत्सवात सहभागी होतात.

           हिंदू धर्मग्रंथानुसार त्रेतायुगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या जगात- मृत्यूलोकात श्रीराम म्हणून अवतार घेतला. प्रभू श्रीरामचंद्रजींचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला राणी कौशल्याच्या पोटी पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्क राशीत राजा दशरथाच्या घरी झाला. रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ याला तीन बायका होत्या, परंतु फार काळ राजा दशरथला संततीचे सुख कोणीही देऊ शकल्या नाही, त्यामुळे राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे. पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याची कल्पना दिली होती. यानंतर राजा दशरथाने आपल्या जमाई महर्षी ऋषिश्रृंगासोबत यज्ञ केला. त्यानंतर यज्ञकुंडातून एक दैवी पुरुष हातात खीरीची वाटी घेऊन बाहेर आला. यज्ञ संपल्यानंतर महर्षी ऋषीशृंगाने दशरथाच्या तीन पत्नींना खीरीची वाटी खायला दिली. खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी तिन्ही राण्या गरोदर राहिल्या. बरोबर ९ महिन्यांनंतर राजा दशरथाची ज्येष्ठ राणी कौशल्याने श्रीराम- भगवान विष्णूचा सातवा अवतार, कैकेयी यांनी भरत आणि सुमित्रा यांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला. भगवान श्रीरामाचा जन्म दुष्ट प्राण्यांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला होता.

           संतशिरोमणी कबीर साहेबजी आदिरामाची व्याख्या स्पष्ट करतात, की आदिराम हा अविनाशी देव आहे जो सर्वांचा निर्माता आणि पालनकर्ता आहे. ज्याच्या एका इशाऱ्यावर पृथ्वी आणि आकाश कार्य करतात, ज्याच्या स्तुतीमध्ये तेहतीस श्रेणी देवी-देवता नतमस्तक होतात. जो पूर्णपणे मोक्षदाता आणि आत्मस्वरूप आहे. भारतभर श्रीरामजन्म हा चैत्र शुक्ल नवमीला झाला असे समजले जात असले तरी, ज्या अयोध्येत रामाचा जन्म झाला, त्या अयॊध्येतील वैश्य समाज श्रीरामाचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीला झाला, असे मानतात. त्या पंचमीला अगहन पंचमी म्हणतात. कारण मार्गशीर्षाला हिंदीत अगहन म्हणतात! याला आधार म्हणजे गोस्वामी संत तुळशीदासाच्या "रामचरित मानस" मधील पुढील उल्लेख-

       "मंगल मूल लगन दिनु आया|

        हिम रिपु अगहन मासु सुहावा||

        ग्रह तिथि नखतु जोगु वर बारू|

        लगन सोधि विधि कीन्ह विचारू||"

         श्रीराम नवमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते. तेलंगणातील भद्राचलम मंदिर हे अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे श्रीराम नवमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. चैत्र नवरात्रीचीही समाप्ती श्रीराम नवमीच्या दिवशी होते. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान श्रीरामजींचा जन्म या दिवशी झाला होता, म्हणून भक्त ही शुभ तिथी पावन श्रीराम नवमी म्हणून साजरी करतात आणि पावन नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात.

           हिंदू कॅलेंडरनुसार श्रीराम नवमी हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. धर्मग्रंथानुसार भगवान श्रीरामांचा जन्म याच दिवशी झाला, म्हणून हा दिवस श्रीराम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. प्रभू श्रीरामचंद्रजींच्या जन्मोत्सवामुळे या तिथीला श्रीराम नवमी असे म्हणतात. भगवान रामाला विष्णूचा अवतार मानले जाते. भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील राक्षसांना मारण्यासाठी त्रेतायुगात श्रीराम म्हणून मानव अवतार घेतला. प्रभू श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते, कारण त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटे सोसूनही प्रतिष्ठित जीवनाचे उत्तम उदाहरण मांडले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपला आदर्श सोडला नाही आणि जीवन सन्मानाने जगले. त्यामुळेच त्यांना सर्वोत्तम पुरुषाचे स्थान देण्यात आले आहे.

           या दिवशी विशेषत: श्रीरामाची पूजा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. भगवान श्रीरामाचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर उत्साहात साजरा केला जात असला तरी विशेषतः श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्येत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रीराम नवमीच्या वेळी अयोध्येत भव्य भक्तमेळा आयोजित केला जातो, ज्यामध्ये दूरदूरच्या भक्तांव्यतिरिक्त, भिक्षू आणि संन्यासी देखील पोहोचतात आणि श्रीराम जन्म साजरा करतात. सामान्यत: श्रीराम नवमीच्या दिवशी हिंदू कुटुंबांमध्ये उपवास, पूजा आणि इतर धार्मिक विधी आयोजित केले जातात. श्रीरामजींच्या जन्माच्या वेळी त्यांच्या जयंतीचे आयोजन करून त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाते. अनेक घरांमध्ये विशेष सजावट केली जाते, घराला पवित्र करून कलशाची स्थापना केली जाते आणि प्रभू श्रीरामजींची पूजा करून भजन-कीर्तन केले जाते. विशेष म्हणजे या दिवशी श्रीराम, माता जानकी आणि लक्ष्मणजी यांचीही पूजा केली जाते.

           माता कैकेयीने श्रीरामाचे वडील राजा दशरथ यांच्याकडून वरदान मागितल्यावर श्रीरामांनी राजवाडा सोडून १४ वर्षांचा वनवास आनंदाने स्वीकारला आणि वनवासात असतानांच अनेक राक्षसांसह अहंकारी रावणाचा वध करून सोन्याची लंका जिंकली. अयोध्या सोडताना माता जानकी आणि भाऊ लक्ष्मण हेही श्रीरामांसोबत १४ वर्षे वनवासात गेले. यामुळेच श्रीराम नवमीला श्रीरामांसोबत त्यांचीही पूजा मोठ्या भक्तिभावाने केली जाते.

|| सर्व भारतीयांना पावन श्रीराम नवमी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ||

                    - संकलन व शब्दांकन -

                    संतचरणरज: बापू- श्रीकृष्णदास निरंकारी.

                    पोटेगावरोड, गडचिरोली.

                    फक्त मधुभाष- 7132696683.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या