🌟मंगल पांडे पुण्यस्मरण : भारतीय सैनिकांना ब्रिटिश "पांडे" संबोधतात तेव्हा.....!


🌟मंगल पांडे हे भारताच्या १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील आद्य क्रांतिकारक मानले जातात🌟

स्वधर्मावर प्राणापलीकडे निष्ठा ठेवणाऱ्या मंगल पांडे या तरण्याबांड क्षात्रवीराला न्यायालयाने कटामध्ये सामील असलेल्यांची नावे विचारली; परंतु मंगल पांडे यांच्या मुखातून कोणाचेही नाव बाहेर पडले नाही. पांडे यांना सैनिक न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आपल्या देशबांधवांच्या अपमानासाठी स्वतःचे प्राण देणाऱ्या या क्रांतीच्या अग्रदूताविषयी लोकांत इतकी विलक्षण श्रद्धा निर्माण झाली होती की, साऱ्या बराकपूरमध्ये त्यांना फाशी देण्यास एकही जल्लाद- मांग मिळेना. शेवटी या घाणेरड्या कामासाठी कोलकात्याहून चार माणसे मागवण्यात आली. देशभक्ती जागविणारा श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा सदर संकलित लेख जरूर वाचा... संपादक.


            मंगल पांडे हे भारताच्या १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील आद्य क्रांतिकारक मानले जातात. मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात एका ब्राह्मण परिवारात झाला. ब्रिटॅनिका वरील नोंदी प्रमाणे त्यांचा जन्म १९ जुलै १८२७ रोजी झाला असावा, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मंगल पांडे यांचे वंशज भेटले असून, त्यांच्या जवळील पुराव्यानुसार मंगल पांडे यांचा जन्म ३० जानेवारी १८३१ रोजी झाला होता. त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती. नेमबाजी, तलवारयुद्ध इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते. त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते.

         ज्या वेळी १८४९ साली, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीस सुरुवात केली, त्यावेळी ते २२ वर्षाचे होते. पांडे हे बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या ३४व्या बी.एन.आय तुकडीच्या ५व्या कंपनीत काम करत होते. कोलकात्याजवळील बराकपूर येथील १९व्या पलटणीला दिलेली काडतुसे गाय वा डुक्कर यांची चरबी लावलेली आहेत, असा समज सैन्यात पसरला होता. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागे. अशा वेळी या आवरणाला लावलेली गाईची वा डुकराची चरबी तोंडात जाऊ शकेल, या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले. इतकेच नव्हे, तर प्रतिकारार्थ त्यांनी शस्त्र उपसले. त्या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी तो अपमान मुकाट्याने गिळला. त्यांनी ब्रह्मदेश- म्यानमारहून गोऱ्या सैनिकांची कुमक मागवून या पलटणीला निःशस्त्र करून अपमानित अवस्थेत हाकलून द्यायचे ठरवले. याची अंमलबजावणी बराकपूरला करण्याचे ठरले. या अपमानास्पद कारवाईमुळे मंगल पांडेने आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले. ३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. दि.२९ मार्च १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. "मर्दहो, उठा !" अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, "आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे!! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा!!!"

          हे पहाताच सार्जंट मेजर ह्यूसन याने त्यांना पकडण्याची आज्ञा केली; पण एकही सैनिक जागचा हालला नाही. उलट मंगल पांडे यांची गोळी लागून ह्यूसन जखमी झाला. हे पहाताच लेफ्टनंट बॉ घोडा नाचवत मंगलवर चाल करून आला. एवढ्यात मंगलच्या बंदुकीतून सुटलेली गोळी घोड्याच्या पोटात शिरली. घोडा लेफ्टनंटसह भूमीवर आडवा झाला. मंगल पांडे यांना पुन्हा बंदुकीत गोळया भरायचा अवसर मिळण्याआधीच लेफ्टनंट बॉ आपले पिस्तुल काढून उभा राहिला. मंगल पांडे यांनी तिळमात्रही न डगमगता आपली तलवार उपसली. बॉने पिस्तुल झाडले; पण मंगल पांडे यांनी त्याचा नेम चुकवला. आपल्या तलवारीने मंगल पांडे यांनी त्यालाही लोळवले. ह्यूसन व बॉ आपल्या निवासस्थानांकडे पळून गेले.

      एवढ्यात शेख पालटू नावाचा मुसलमान शिपाई मंगलच्या दिशेने जाऊ लागला. तो आपल्या पलटणीतील असल्यामुळे आपल्याला मदत करायला येत असावा, असे मंगल पांडे यांना वाटले; पण तसे घडले नाही. शेख पालटूने मंगल पांडे यांना पाठीमागून विळखा घातला. पांडे यांनी त्याचा विळखा सोडवला. देशी शिपाईही शेखच्या रोखाने दगड व जोडे फेकू लागले. जिवाच्या भीतीने शेख पालटू पळून गेला. थोड्याच वेळात कर्नल व्हीलर त्या स्थानी आला. त्याने सैनिकांना मंगल पांडे यांना पकडण्याची आज्ञा केली. कर्नल व्हीलरला सैनिकांनी निक्षून सांगितले, "आम्ही या पवित्र ब्राह्मणाच्या केसालासुद्धा हात लावणार नाही. हिंदुस्थानच्या भूमीवरून वाहाणारे गोऱ्या अधिकाऱ्यांचे रक्‍त आणि समोरचे धर्माभिमानी शिपाई पाहून कर्नल व्हीलर त्याच्या बंगल्याकडे पळून गेला. नंतर जनरल हिअर्स पुष्कळसे युरोपियन शिपाई घेऊन मंगल पांडे यांच्यावर चालून गेला. तोपर्यंत दुपार झाली होती. मंगल पांडे थकले होते. आपण फिरंग्यांच्या हातात सापडणार, हे पहाताच त्यांनी बंदूक आपल्या छातीकडे रोखली व स्वतःवर गोळी झाडून घेतली. मंगल पांडे धरणीवर कोसळले आणि त्यांची शुद्ध हरपली. नंतरच ब्रिटिश त्यांना पकडू शकले. आठवडाभरातच त्यांच्यावर सैनिकी न्यायालयात अभियोग चालवण्यात आला. स्वधर्मावर प्राणापलीकडे निष्ठा ठेवणाऱ्या या तरण्याबांड क्षात्रवीराला न्यायालयाने कटामध्ये सामील असलेल्यांची नावे विचारली; परंतु मंगल पांडे यांच्या मुखातून कोणाचेही नाव बाहेर पडले नाही. पांडे यांना सैनिक न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आपल्या देशबांधवांच्या अपमानासाठी स्वतःचे प्राण देणाऱ्या या क्रांतीच्या अग्रदूताविषयी लोकांत इतकी विलक्षण श्रद्धा निर्माण झाली होती की, साऱ्या बराकपूरमध्ये त्यांना फाशी देण्यास एकही जल्लाद- मांग मिळेना. शेवटी या घाणेरड्या कामासाठी कोलकात्याहून चार माणसे मागवण्यात आली. मंगल पांडे ज्या तुकडीचे सैनिक होते, तिच्या सुभेदाराला इंग्रजांनी ठार मारले. १९ आणि ३४ या दोन्ही पलटणी त्यांनी निःशस्त्र करून खालसा केल्या. याचा परिणाम उलटाच झाला. शिपायांना धाक वाटण्याऐवजी शेकडो शिपायांनी आपणहून गुलामीचे चिन्ह असलेले त्यांचे सैनिकी गणवेश फाडून टाकले.

      हा १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. त्यांच्या नावाचा प्रभाव एवढा विलक्षण होता की, या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज पांडे याच नावाने संबोधू लागले.

!! बलिदान दिनी मंगल पांडे क्रांतिवीरास सॅल्यूट !!

                      - संकलन व सुलेखन -

                      श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                     रामनगर, गडचिरोली.

                      फक्त दूरभाष- 7132696683.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या